शामुआजोचा रॉबिन्सन क्रुजो – भाग ३

शामुआजोचा रॉबिन्सन क्रुजो – भाग ३

ज्या ओगोम्तमेलीला स्वत:च्या संपुर्ण प्रतिमेच्या रेखाटणीसाठी दुसऱ्या मनुष्याच्या नजरेची नितांत गरज होती तसा मनुष्य म्हणजेच गोरा क्रुजो समोर येऊनही ओगोम्तमेली तटस्थच राहतो. तो क्रुजोला स्वत:च्या भूतकाळाविषयी प्रश्न विचारत नाही. ‘डॅनिएल डफो’ने १७१९ साली लिहिलेल्या ‘रॉबिन्सन क्रुजोच्या भन्नाट साहस कथा’, या इंग्रजीतील आद्यकादंबरीची जगामध्ये अनेक भाषांमध्ये अनेक रूपांतरणे झाली. फ्रेंच भाषेमध्ये ‘पात्रिक शामुआजो’ने ‘क्रुजोच्या पाऊलखुणा’, या नावाने २०१२ साली कादंबरी लिहिली. या कादंबरीतील ‘रॉबिन्सन क्रुजो’, हा अतिशय वेगळा आहे. त्याची जीवनमूल्ये आणि जगण्याची आसोशी वेगळी आहे.

कार्टूनिस्टवर बेअदबीची कारवाई करण्यास संमती
अपघात, पिस्तुल चोरण्याचा प्रयत्न मग एनकाउंटर
भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील वृद्धीत लक्षणीय घट

शहरातील एक माणूस ग्रामीण भागात फिरता फिरता वाट चुकतो. वाटेत भेटलेल्या धनगराला तो वाट विचारतो. हवापाण्याच्या गोष्टी झाल्यावर शहरी माणूस धनगराच्या शेळ्यांकडं बोट दाखवून विचारतो, “किती जनावरं आहेत तुमच्याकडे?”

“काय माहिती? आपल्याला कुठं मोजता येतयं? शेळ्या बदलत राहतात. कुणी मरतं, कुणी नवीन पैदा करतं, कुणी विकलं जातं…” धनगर आपल्या परीने समजावतो.

“पण मग तुम्ही त्यांना सांभाळता कसं? कुठली शेळी आजारी पडली, मेली किंवा हरवली तर कसं कळतं तुम्हाला?

“त्यांचं बोलणं कान देऊन ऐकतो ना आपण. मग कळतं सगळं.”

“हॉ! असं कसं?? काहीही काय अहो! त्यात सगळ्याच शेळ्या काळ्या आहेत. रंगावरून पण ओळखता यायच्या नाहीत…!” शहरातल्या माणसाने आश्चर्याने विचारले.

धनगर शहरातल्या माणसाच्या हातातल्या पुस्तकाकडं बोट करुन विचारतो, “वाचता येतं काय?”

“हो तर!” शहरातला माणूस आपली छाती किचिंत फुलवून म्हणतो.

“बघू द्या”, धनगर पुस्तक मागतो.

पुस्तक थोडे चाळून धनगर म्हणतो, “मला तर काय कळत नाय, कसं काय वाचताय तुमी. सगळी अक्षरं सारखीच दिसतायत. ती पण सगळी काळीचेत की!”

पात्रिक शामुआजो

पात्रिक शामुआजो

शामुआजोचा क्रुजो वाचताना शहरी माणूस आणि मेंढपाळ यांच्यातले हे संभाषण मला एका गोष्टीची आठवण करुन देते; ती म्हणजे साक्षरता केवळ पानावरील भाषा लिहता वाचता येण्यापुरती मर्यादीत नसते, तर आपल्या अवती भवतीचे जग वाचता येणेही तितकेच महत्वाचे आहे. धनगराला नुसतीच आकडेमोड करता आली असती, परंतु त्याच्या शेळ्यांची भाषा त्याला कळली नसती, तर असंख्य शेळ्यांचा कळप त्याला राखता आला नसता. त्याच्या व्यवसायात त्याला शेळ्यांची भाषा कळणे आणि त्याच्या शेळ्यांना अक्षरांसारखे वाचणे, हे आकडेमोड करुन त्यांचा हिशेब ठेवण्यापेक्षाही महत्वाचे वाटते.

परंतु अशा प्रकारच्या साक्षरतेचे प्रशिक्षण शाळा-महाविद्यालयात कधीच दिले जात नाही. ‘डफो’चा क्रुजो त्याचे बेट व्यापार, शेती आणि उद्योगासाठी लागणाऱ्या मालाची गणिते करत वाचतो. अशा साक्षरतेची पाळेमुळे आजही दृढ आहेत.

क्रुजोची कहाणी हिच मुळी त्याचे स्वत:शी आणि त्याच्या ‘ईल’शी म्हणजेच त्याच्या भवतालाशी असलेले नाते यावर आधारीत आहे. क्रुजोच्या आयुष्यात एका अनामिकाची पाऊलखूण येईस्तोपर्यंत त्याला ना स्वत:ची ओळख पटत होती, ना त्याच्या ईलची. पाऊलखूण पाहण्याआधी त्याच्या ‘ईल’ला तो ‘जमिनीचा निर्जीव तुकडा’, अशाच नजरेने बघत असे. पाऊलखुणेच्या निमित्ताने मात्र ‘दुसऱ्याच्या नजरेत आपण कसे आहोत?’, हा प्रश्न त्याला पडतो व तो ‘ईल’कडेही वेगळ्या नजरेने पाहू लागतो.

‘जाक् लाकां’ नावाच्या सायकोअनॅलिस्टने ‘मिरर स्टेज’, ही संज्ञा निर्माण केली. लहान बाळाचे आई/बाबा किंवा इतर नातेवाईक बाळाला तिची आरशीतली प्रतिमा दाखवून ‘ती बघ तू!’ अशी बोट दाखवून स्वत:च्या ‘ईमेज’ची ओळख करुन देतात. हळू हळू बाळाला आरशातली प्रतिमा स्वत:ची म्हणून ओळखता येते. स्वत:ची प्रतिमा आपल्या मनात असणे ही मनुष्यत्वाची व्याख्या आहे, असे ‘लाकां’ मानतो. परंतु हे लक्षात घ्यायला लागते की आरशातली बाळाची प्रतिमा ही संपूर्ण, सर्व अवयवांसकट आणि एकरूप अशी असते. आरशात दिसणाऱ्या तिच्या परिपूर्ण प्रतिमेकडे बघून तिला ‘मी’ ची जाणीव होते. (आरशातल्या परफेक्ट इमेजला ‘लाकां’ आयडीयल म्हणतो) परंतु बाळ जेव्हा आपल्या आरशाबाहेरील शरीराकडे नजर टाकते, तेव्हा तिला तिच्या सद्य स्थितितील परावलंबित्व आणि दुर्बलतेची जाणीव होते. कारण बाळ स्वत:कडे पाहते तेव्हा तिला आपले फक्त हात, पाय, नाक, पोट, मांडी वा पाय एवढेच दिसते. आरशात दिसणाऱ्या संपूर्ण शरीराची प्रतिमा तिला आरशाबाहेर दिसत नाही. स्वत:ची अखंड आणि संपूर्ण प्रतिमा बघायला तिला स्वत:ला आरशात पहावे लागते. याचा अर्थ स्वत:ची ओळख करुन घेण्यासाठी तिला आयडीयलच्या प्रतिमेचा आधार घ्यावा लागतो. ‘लाकां’ म्हणतो की माणूस मोठा झाल्यावरही आपण कसे असावे (आयडीयल) आणि आपण काय आहोत (रियल) या चढाओढीत तो/ती गुंतलेला असतो.

बेटावर वाहून आलेल्या आणि मागचे आयुष्य पूर्णपणे विसरलेल्या क्रुजोची अवस्था अशा बाळासारखी आहे. ज्याला स्वत:कडे पाहिले, तरी स्वत:ची पूर्ण ओळख होत नाही. कारण ती तुकड्यात विभागली गेली आहे. विस्मृतीमुळे त्याच्या तुकड्यात विभागलेल्या प्रतिमेला सांधणारा दूवा मिळत नाही. त्याला स्वत:ची पूर्ण प्रतिमा पाहण्यासाठी दुसऱ्या माणसाच्या नजरेच्या आरशाची नितांत गरज असते. (जशी बाळाला आरशाची गरज भासते) त्या आरशाची शक्यता त्याला पाऊल खूणेत दिसते. पाऊल खूणेच्या अस्तित्वामुळे क्रुजोच्या मनात स्वत:विषयी वेगवेगळ्या ओळखींच्या शक्यता निर्माण होतात. पाऊलखूणेच्या मालकाचा शोध लावताना क्रुजोचा एकच उद्योग होऊन बसतो- तो म्हणजे स्वत:ची पारख करणे आणि ‘त्या’ला आपण कसे वाटू, कसे दिसू याचे मनन. क्रुजोची अवस्था पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या पौगंडावस्थेतील मुला/मुलींसारखी होते. जी आरशात बघत आपल्या प्रेमी/प्रेमिकेला आपण कसे दिसत असू, याचे चिंतन करण्यात दिवस घालवतात किंवा स्वत:च्या प्रतिमेची कल्पना  प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या मतावर करतात. ‘जाक् लाकां’च्या मते माणसाची आपल्या आयडीयल इमेजशी मिळते-जुळते होण्यासाठीची स्पर्धा कधीही संपत नाही. (प्रेमात पडणे हा त्या संघर्षाचाच एक भाग असतो, असे मला वाटते) क्रुजोच्या गोष्टीतली मेख ही आहे, की जिला पाहून तो स्वत:ची ओळख बांधू शकेल, अशी एकसंघ आयडीयल इमेज त्याला कधी मिळतच नाही.

क्रूजोचा पाऊलखुणेच्या मालकासाठी चाललेला शोध अचानक संपतो. एके दिवशी त्याने वेगवगळ्या क्लुप्त्या करुन जपून ठेवलेल्या ‘त्या’च्या पाऊल खूणेशेजारी चिंतन करीत असताना, क्रुजो झटकन उठतो आणि आपला पाय त्या पाऊलखूणेवर ठेवतो. त्याचा पाय त्या पाऊलखूणेशी तंतोतंत जूळतो आणि क्रुजो शक्तिपात झाल्यासारखा कोसळतो. ती पाऊलखूण त्याचीच आहे हे त्याला उमजते. इतकी वणवण करण्याआधी ही पाऊलखूण आपलीच आहे कि नाही, हे तपासून बघण्याची अक्कल आपल्याला सुचली नाही. या पश्चातापाने कोलमडतो. इतके दिवस चाललेला आपला प्रेमाचा लपंडाव खोटा आहे, ज्याच्या भेटीसाठी आपण वणवण करीत होता तो अस्तित्वातच नाही. ‘ईल’ ना आपली होती, ना इतर कुणाची, तिचे फुलणे आणि मोहरणे हे तिच्या स्वत:साठीच होते, हे समजल्यावर क्रुजो पाठीचा कणा मोडल्यासारखा किनाऱ्यावर पडून राहतो. कित्येक दिवसांनंतर तो उठून जगण्याच्या प्रयत्नांना लागतो.

आपल्या बेटावरचा ‘तो’ आपणच आहोत, हे कळल्यानंतरही आपली ओळख आपल्यालाच पटवून देणाऱ्या कुणाच्या तरी संगतीची गरज त्याला भासतेच. मात्र ती संगत एका व्यक्तीकडून मिळावी हा त्याचा अट्टाहास हळूहळू संपतो. आपल्याच पाऊल खूणेमुळे बहकलेल्या क्रुजोला स्वत:मध्येच वास करत असलेल्या परकीयत्वाची (radical alterity) ची जाणीव होते. जसा आपल्या भोवतीचा निसर्ग म्हणजेच त्याची ‘ईल’ एकसंघ आणि चीरकाल स्थिर राहणारी नाही, जशी ती क्षणाक्षणाला बदलत जाते तशीच आपली एकच ओळख निर्माण होऊ शकणार नाही, हे तो शिकतो. स्वत:च्या एकसंघ आणि परिपूर्ण ओळखीचा हट्ट तो सोडून देतो. अशी ओळख आपल्याला कुणी एक व्यक्ती करुन देऊ शकणार नाही आणि तसे घडलेच तरी त्या व्यक्तीने निर्मिलेले चित्र पूर्ण नसेल याची खात्री त्याला पटते.

क्रुजोचे स्वत:शी असलेले नाते जसे बदलते तसेच त्याचे त्याच्या भवतालाशी म्हणजेच ‘ईल’शी असलेले नातेही बदलते. स्वत:बरोबर आणि ‘ईल’ बरोबरील बदललेल्या नात्यामुळे तो स्वत:ला फुटून विखुरलेल्या आरशाच्या असंख्य तुकड्यांमध्ये बघतो. या बदलामुळे त्याच्या दैनंदिन जीवनातही अमूलाग्र बदल घडतात. तो आता शेती, पशू पालन, ‘ईल’वरील प्रशासन या सर्व कामामधून अंग काढून घेतो. त्याची दिनचर्या वेगळ्याच कामांमध्ये बुडून जाते.

संध्याकाळच्या निशब्द शांततेत कलत्या सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघणाऱ्या झाडांच्या पानांचा नाच पाहणे, झाडाच्या मुळांमध्ये विसावलेल्या छोटुकले निळे खडे हातात धरुन तासनतास चिंतन करणे, समुद्र किनाऱ्यावरील वाळूतल्या एकाच कणाचे आपल्या दृष्टीने बोट धरुन त्याची पाण्याच्या लाटेबरोबरील सळसळ धावपळ पहात राहणे, झाडा-वेलींवरील पाने विणून त्यांचे आकार-उकार नसलेल्या कलाकुसरींमध्ये रुपांतर करणे या आणि अशा कित्येक कामांमधे क्रुजो गढून जातो. त्याला ‘ईल’वरले अत्यंत छोटे जीवही लुब्ध करतात. त्याचे छोट्या छोट्या तपशीलांनी भारलेले दिवस, त्याला अनंत विश्वाची झलक दाखवतात. आरशातल्या आपल्या एकसंघ प्रतिमेच्या शोधात असलेला क्रुजो, स्वत:च्या भाषेला एक आकार देऊ इच्छिणारा क्रुजो, स्वत:च्या भूतकाळाला एका सरळ रेषेत ओढलेल्या गोष्टीचे रुप देऊ पाहणारा क्रुजो, कणा ताठ करुन ‘ईल’वर चीरकाल राज्य करु पाहणारा क्रुजो, आता यापैकी कुठल्याच चिंतेत थांबलेला नाही. त्याची स्वत:ची ओळख ही ‘ईल’वरील वाळूच्या कणांमध्ये विखूरलेली तरीही संपूर्ण वाळूच्या समुदायाचा एक भाग आहे. त्याचा भूतकाळ, त्याचा वर्तमानकाळ, त्याचे मनुष्यत्व हे सारे ‘ईल’वरती पसरलेले, माशांच्या पोटात विसावलेले, अजूनही टीकून असलेल्या त्याच्या पाऊल खूणेत निजलेले आहे.

क्रुजो लिहतो, की त्याचे ‘ईल’वर तरंगत येणे म्हणजे ऑॅयस्टरच्या घट्ट मिटलेल्या शिंपल्यामध्ये वाळूच्या कणाने अलगद प्रवेश करण्यासारखे आहे. त्याच्या येण्याने त्याच्या ‘ईल’ला झालेल्या जखमेवरील उपाय म्हणून ‘ईल’ने त्याला आपल्या मांसल गोधडीत घट्ट गुंडाळून ठेवले. त्याला त्याच्या ताठ कण्याचे, दोन पायांवर उभे राहून ‘ईल’वर राज्य करु पाहणारे मनुष्यत्व मिळवू दिले नाही. वाळूच्या कणासारखी असलेली त्याच्या अस्तित्वाची ठसठस ‘ईल’ हळूहळू कमी करुन त्याचे मोत्यात रुपांतर करते. मोत्यासारखा गोलगोल आणि थंड पडलेला क्रुजो ‘ईल’च्या शिपंल्यात शांत जगतो.

या शांततेत क्रुजोच्या कहाणीचा अंत व्हायला हवा. पण तो होत नाही, कारण शिंपल्यामधल्या मोत्याला शिंपल्यातच पडू राहू देणं जगाला क्वचितच मान्य होते. काळाशी फारकत घेऊन जगणाऱ्या क्रुजोला आणि त्याच्या ‘ईल’ला एके दिवशी डोळे उघडून बाहेरील कल्लोळाकडे पहावे लागते. युरोपातला एक गोरा कप्तान ‘ईल’वरती आपल्या सवंगड्यांसोबत उतरतो. त्याचे नाव रॉबिन्सन क्रुजो.

आता इतका वेळ मी क्रुजोचीच तर गोष्ट सांगत होते. मग हा कोण नवीन क्रुजो? हा प्रश्न वाचकास पडेल. इथे पहिल्या लेखाच्या सुरवातीस सांगितलेला तपशील आठवावा लागेल. ‘ईल’वर तरंगत आलेल्या क्रुजोला आपले नावही आठवत नसते पण फुटलेल्या बोटीच्या तुकड्यामध्ये त्याला ‘रॉबिन्सन क्रुजो’, असे नाव लिहिलेला पट्टा मिळतो. तो पट्टा आपलाच आणि ते नावही आपलेच असे समजून तो स्वत:चे नामकरण करतो. कादंबरीच्या शेवटी कादंबरीचा नायक वा खलनायक, म्हणजे ‘खरा’ राबिन्सन क्रुजो अवतरतो. युरोपातील गोरा क्रुजो ‘ईल’वर इतकी वर्ष अडकलेल्या क्रुजोचा भूतकाळ वाचकास कथित करतो. बोट बुडून ‘ईल’वर आलेला क्रुजो हा क्रुजो नाही तर पश्चिम आफ्रिकेतल्या माली देशातल्या डोगन आदिवासींच्या जमातीत जन्माला आलेला ओगोम्तमेली नावाचा माणूस आहे.

डोगन जमातीचा खूप सूरस इतिहास आहे. ही जमात स्व:ताची ओळख शेवटपर्यंत टिकवून ठेवून होती. परंतु फ्रेंचांच्या आक्रमणात तिचे स्वातंत्र्य संपुष्टात आले. या जमातीचे गणिती, वैद्यकिय, अवकाश या विषयांमधील ज्ञान, त्यांचा १९४६ मध्ये अभ्यास करणाऱ्या फ्रेंच मानववंशशास्त्रज्ञांनाही अचंबित करुन गेले. तर ओगोम्तमेली अशा सुसंस्कृत जमातीचा मुलगा होता ज्याच्या जग फिरण्याच्या खुमखुमीमुळे १७ व्या शतकात तो माली सोडून गोऱ्या क्रुजोच्या बोटीवर कामाला लागतो. गोऱ्या क्रुजोबरोबर जग हिंडून, हर तऱ्हेचे ज्ञान प्राप्त करतो. खरे तर क्रुजोची बोट आफ्रिकेतील लोकांना गुलाम बनवून त्यांना युरोप व अमेरीकेत विकण्याचे काम करीत असते. ओगोम्तमेली स्वत: आफ्रिकेचा असूनही ज्ञानाच्या लालसेने क्रुजोच्या गुलामांच्या बोटीवर काम करण्यास राजी होतो.

असा शिकलेला आणि जग फिरलेला बहुप्रादेशिक ओगोम्तमेली एक दिवस डोक्याला लागलेल्या जोरदार मारामुळे भ्रमिष्ट बनतो आणि त्याला प्रथमच बोटीच्या तळाशी बांधून ठेवलेल्या गुलामांबरोबर साखळदंडात बांधून  ठेवले जाते. पण गुलामांचे अत्यंत भयाण हाल जवळून पाहताच, आधीच वेडा झालेला ओगोम्तमेली जास्तच चवताळतो. त्याला काबूत ठेवणे अशक्य झाल्यावर गोरा क्रुजो त्याला भूलीचे औषध देऊन बोटीवरुन समुद्रात फेकून देतो. त्याच्याबरोबर तो ओगोम्तमेलीला स्वत:चे ‘क्रुजो’ हे नाव बहाल करतो व काही जीवनावश्यक गोष्टी, पुस्तके त्याच्या बरोबर समुद्रात फेकतो. या विशाल समुद्रात त्याचा टिकाव लागणार नाही याची खात्री असूनही बारा वर्षांनी क्रुजो ओगोम्तमेलीचा शोध घेण्याचे ठरवितो व शोध घेता घेता त्याच्या ‘ईल’वर दाखल होतो.

ज्या ओगोम्तमेलीला स्वत:च्या संपुर्ण प्रतिमेच्या रेखाटणीसाठी दुसऱ्या मनुष्याच्या नजरेची नितांत गरज होती तसा मनुष्य म्हणजेच गोरा क्रुजो समोर येऊनही ओगोम्तमेली तटस्थच राहतो. तो क्रुजोला स्वत:च्या भूतकाळाविषयी प्रश्न विचारत नाही. क्रुजोही त्याला त्याच्याविषयी आणि स्वत:विषयी काही सांगत नाही. ओगोम्तमेली खूप उत्साहाने आपल्या ‘ईल’ विषयी आणि त्याच्या तिथल्या वास्तव्याविषयी सांगतो. परंतु ओगोम्तमेलीला क्रुजोच्या बोटीवरील साखळदंडात बांधलेले गुलाम पुन्हा दिसताच त्यांच्या संवादाचे वितंडात रुपांतरीत होते. गुलामांना पाहताच जूनी जखम सोलवटल्या प्रमाणे ओगोम्तमेली वेदनेने किंचाळू लागतो. त्याला शांत करण्याचे प्रयत्न असफल ठरल्याने क्रुजो ओगोम्तमेलीला ठार मारतो. ‘ईल’ने मोत्याप्रमाणे जपून ठेवलेल्या ओगोम्तेमलीला गोरा क्रुजो उचकटवून टाकतो.

पण इथेही कादंबरीचा शेवट होत नाही. क्रुजो ओगोम्तमेलीला मारुन आपल्या गुलामांच्या विक्रीस पुनःश्च सुरुवात करतो. मात्र काहीच दिवसात त्याची बोट वादळात अडकून फुटते व तो ओगोम्तमेली प्रमाणे एकटाच तरंगत एका बेटावर पोचतो. त्याच्या बरोबर वहात आलेल्या कागदांवर तो आपली कहाणी लिहायला सुरुवात करतो, “हाय रे देवा! मी जे नशीब दुसऱ्यावर लादले तेच नशीब आता माझ्या माथी चिकटले”, अशा हळहळीने गोरा क्रुजो सुनसान बेटावर आपले जीवन सुरु करतो. ‘डफो’ने ज्या क्रुजोची कहाणी आठराव्या शतकात लिहिली, ती कहाणी तर शामुआजोने २०१२ मध्ये लिहिलेल्या कांदबरीतील गोष्टी नंतर घडते. म्हणजेच शामुआजोचा क्रुजो डफोच्या क्रुजो आधिच एका सुनसान बेटावर राहीला, असे शामुआजो सुचित करतो. ‘डफो’चा क्रुजो हा आफ्रिकेतील ओगोम्तमेलीचा अत्याचारी कप्तान असूनही, तो ओगोम्तमेलीचा नरेटिव्ह (narrative) वंशज आहे असे शामुआजो सुचवतो.

या लेखाच्या सुरुवातीला सांगितलेल्या गोष्टीतले धनगर व शहरी माणूस मला शामुआजोच्या कादंबरीतल्या दोन क्रुजोंची आठवण करुन देतात. आफ्रिकेतील ओगोम्तेमेली रॉबिन्सन क्रुजोचे नाव घेतो खरे, पण त्याचा दृष्टीकोन त्याला बाळगता येत नाही. गोष्टीतला धनगर आपल्या शेळ्यांना आकड्यात बांधू शकत नाही. कारण त्याच्यासाठी त्याच्या शेळ्या पूर्णत्वास न पोचलेल्या कवितेतील अक्षरांप्रमाणे अर्थ बदलत राहतात. तसेच ओगोम्तेमेली देखिल आपल्या ‘ईल’ला एकपदरी कथेत बांधत नाही. पाण्यातून मासा बाहेर न काढताच त्याला जिवंत ठेवून व अलगद हातात धरुनच त्याचे निरिक्षण करावे, त्याला प्रश्न विचारावे तसे तो ‘ईल’चे कल्ले न कापता, तिला मृत करुन टेबलवर न आंथरता शब्दांत पकडण्याचा प्रयत्न करतो. परंतु चपळ मासोळी सारखी त्याची गोष्ट हातातून निसटते व तो ती आनंदाने निसटू देतो.

समाप्त

जाई आपटे, या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिस इथे फ्रेंच साहित्यात पी. एच्. डी करत आहेत. फ्रेंच भाषेतील साहित्यात प्रतित होणारे मानव आणि निसर्ग/पर्यावरण यांच्यातले संबंध, हा त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे.

या लेखमालेतील अगोदरचे भाग वाचण्यासाठी जाई आपटे या नावाने सर्च करावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0