लखनऊ: उत्तर प्रदेशातील रेशनच्या दुकानात गरीबांसाठी मोफत वाटप करण्यात येणार्या डाळ, मीठ व तेलाच्या पाकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उ. प्रदेशचे मुख्यम
लखनऊ: उत्तर प्रदेशातील रेशनच्या दुकानात गरीबांसाठी मोफत वाटप करण्यात येणार्या डाळ, मीठ व तेलाच्या पाकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या छायाचित्रांची छपाई करण्यात आली आहे. ही पाकिटे राज्यातल्या ८० हजाराहून अधिक रेशन दुकानांद्वारे वाटप करण्यात येत आहे. या पाकिटांवर मोदी व आदित्य नाथ यांच्या छायाचित्राबरोबर ‘सोच ईमानदार-काम दमदार’ अशा घोषणाही छापल्या आहेत. राज्यात मीठ, रिफाइंड तेल व हरभरा डाळीची पाकिटे रेशनच्या दुकानातून मोफत वाटण्यात येत आहे. यावरही मोदी व आदित्य नाथ यांची छायाचित्रे आहेत. या सर्व वस्तू राज्य सरकारच्या मोफत रेशन धान्यांतर्गत वितरित करण्यात येत आहेत.
२० दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत मार्च २०२२ पर्यंत वाढवली होती. ही योजना कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये चालू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांना ५ किलो धान्य मोफत मिळत आहे.
या योजनेबरोबर उ. प्रदेश सरकारने लाभार्थ्यांना एक किलो तूरडाळ, मीठ व हरभरा डाळही मोफत वाटण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात अनेक रेशन दुकानातून मोफत धान्य वाटप करण्यात येत असल्याची छायाचित्रे व व्हीडिओ सोशल मीडियातून पसरवण्यात आली आहेत.
राज्य सरकारने २०२२ पर्यंत १५ कोटी लोकसंख्येला हे मोफत धान्य मिळेल असे उद्दिष्ट्य ठेवले आहे.
येत्या दोन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत.
COMMENTS