नवी दिल्लीः केवळ सार्वजनिक सरकारी कंपन्या, सार्वजनिक बँका, अन्य सरकारी खात्यांकडून नव्हे तर देशाच्या तिन्ही सैन्यदलातील सैनिकांचे एक वेळचे वेतन कापून
नवी दिल्लीः केवळ सार्वजनिक सरकारी कंपन्या, सार्वजनिक बँका, अन्य सरकारी खात्यांकडून नव्हे तर देशाच्या तिन्ही सैन्यदलातील सैनिकांचे एक वेळचे वेतन कापून ते वादग्रस्त पीएम केअर्स फंडामध्ये जमा करण्यात आले आहे. ही रक्कम २०३.६७ कोटी रु. इतकी असून भारतीय हवाई दल व नौदलाने माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे पण भारतीय भूदलाने माहिती अधिकाराचा अर्ज फेटाळून लावला आहे. मात्र भूदलाने १५ मे रोजी ट्विटरवरून पीएम केअरमध्ये पैसे दिल्याची माहिती दिली होती.
भारतीय हवाई दलाच्या सैनिकांचे एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एक दिवसांचे वेतन २९.१८ कोटी रु. व भारतीय नौदलाच्या सैनिकांचे एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान एक दिवसांचे वेतन १६.७७ कोटी रु. पीएम केअर फंडमध्ये जमा केले गेले आहे.
भारतीय भूदलाच्या एडीजी पीआय विभागाने १५ मे रोजी ट्विटरवर आपल्या सैनिकांचे एक दिवसाचे १५७.७१ कोटी रु. वेतन पीएम केअरला दिल्याचे म्हटले होते.
संरक्षण खात्याच्या २९ मार्चच्या प्रसिद्धीपत्रकात संरक्षण दलातील जवानांचे व अन्य कर्मचार्यांचे एक दिवसाचे वेतन पीएम केअरमध्ये जमा करण्यास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिल्याचे नमूद केले होते. या प्रसिद्धी पत्रकात संरक्षण मंत्रालयांतर्गत येणार्या अन्य सार्वजनिक उद्योगातून ५०० कोटी रु. जमा केले जातील असे म्हटले होते. पण ही रक्कम कर्मचार्यांसाठी ऐच्छिक असून ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी जमा करावी अशी सवलत देण्यात आली होती.
या अगोदर आरबीआय व अन्य सार्वजनिक बँकांच्या कर्मचार्यांकडून पीएम केअरसाठी २०४.७५ कोटी रु. जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारच्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्यांकडून २१.८१ कोटी रु. व १००हून अधिक सार्वजनिक उद्योगांमध्ये काम करणार्या कर्मचार्यांच्या वेतनातून १५५ कोटी रु. रक्कम पीएम केअरमध्ये जमा करण्यात आले आहेत.
त्याव्यतिरिक्त सरकारने ३८ महारत्न व नवरत्न कंपन्यांकडून २१०५ कोटी रु.ही पीएम केअरसाठी घेतले आहेत.
मूळ बातमी
COMMENTS