संहितेची सौन्दर्यमीमांसा

संहितेची सौन्दर्यमीमांसा

अनिकेत जावरे यांनी एक वर्षापूर्वी लिहिलेल्या प्रॅक्टीसिंग कास्ट : ऑन टचिंग अॅन्ड नॉट टचिंग (‘Practicing Caste: On Touching and Not Touching’ जातीयतेचा परिपाठ: स्पर्श करण्या आणि न करण्या विषयी) या त्याच्या पुस्तकाची विभिन्न अंगांनी ओळख करून देत त्यातल्या विचारालापांना प्रतिसाद देणाऱ्या, तीन स्वतंत्र लेखांचे मराठी अनुवाद.

सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे शाहू
इंदिरा जयसिंग यांचे सरन्यायाधिशांना पत्र
मोदी झिंदाबाद न म्हंटल्याने मुस्लिम व्यक्तिस मारहाण

अनिकेत जावरेचं पुस्तक, वाचन क्रियेमध्ये कलात्मकतेची पुनर्रचना करतं.  विचार आणि भाषा यातला साधेपणा हेच त्याच्या शैलीचं सौदर्यस्थळ आहे.  शिक्षणक्षेत्रातली  दिग्गजांच्या किंवा विश्वविद्यालयीन विभूतींच्या विद्वत्तापूर्ण  लिखाणांचे संदर्भ देणं बंधनकारक ठरेल अशा नैतिक जबरदस्तीला पुस्तकात छाट दिली आहे. तरूण संशोधकाना स्वत:च्याच बौद्धिक अंतरंगात प्रवेश मिळवण्यासाठी ह्या देवदैवता जणू कॉम्प्युटरवर फाइल्स उघडण्यासाठी लागणाऱ्या पासवर्डसारख्या कळीची भूमिका बजावतात.

…………………………………………………………………………………………………………………………………………………..

समकालीन कल्पनाविश्वातल्या बौद्धिक व्यवहाराच्या कितीतरी पुढचा विचार अनिकेत करत होता. आपल्यातल्या विचारवंतांशी आणि कृतिशील बुद्धीमंतांशी संवाद साधण्यासाठी अनिकेतनं  केलेल्या विलक्षण लिखाणात ते जाणवल्या शिवाय रहात नाही. संहितेच्या संगतीनं, वाटलं तर संहितेच्या विरोधात, खुल्या वैचारिक देवाणघेवाणीचं आमंत्रण अनिकेत आपल्याला देतो. त्याच्या जीवनकालाच्या किंवा शारीरिक दुरवस्थेच्या पलीकडचा विचार करून त्यानं पुस्तकातल्या मजकुराचा उपयोग करण्यासाठी वाचक-लेखकांना त्याच्या संमतीची आवश्यकता नाही असंही जाहीर करून ठेवलंय.

किमानतत्त्वप्रणाली (minimalism) मध्ये अमूर्त संकल्पनांना नमतं रूप देण्याची नैतिक प्रतिबद्धता आहे. त्यामुळं संकल्पनांचा दरारा वाटत नाही की त्यांच्या मलीन होण्याचं भय. Practicing Caste  विषयी किमानतत्त्वप्रणालीसुलभ विचार करायची विनंती अनिकेत करतो. तो वाचन क्रियेमधल्या सौन्दर्यशास्त्रीय घटकांचं पुनर्संचयन करतो. त्याच्याच शब्दात म्हणायचं तर, विचार आणि भाषेतल्या  साधेपणात ह्या शैलीचं सौन्दर्यतत्त्व विद्यमान आहे. अवतरणं, संदर्भ आणि तळटीपांच्या सविस्तर विद्वत्तापूर्ण सामग्रीची त्यामुळे गरजच उरत नाही.  शिक्षण क्षेत्रांतील दिग्गजांच्या  किंवा विश्वविद्यालयीन विभूतींच्या विद्वत्तापूर्ण लिखाणांचे संदर्भ देण्याची  नैतिक जबरदस्ती त्यामुळं बंधनकारक राहत नाही. ही दैवतं तरूण संशोधकाना स्वत:च्याच फाईली उघडण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या  बौद्धिक परवलीच्या  शब्दांची भूमिका बजावतात. असा बौद्धिक कळीचा मंत्र होऊन बसण्याची अकादेमीक  महत्त्वाकांक्षा अनिकेत बाळगत नाही असं पुस्तकात सुचवलं आहे.  समानतावादी विद्याव्यासंगाविषयीची त्यानं घेतलेली ही नैतिक भूमिका ज्ञानसंपादन प्रक्रियेतील असमतोलाच्या निर्मूलनाची दिशा दाखवते.

सुखापुरीत खळबळ    

जातीयतेवर चर्चा करणं हे एक मोठं धर्मसंकट आहे आणि अशा चर्चेनं स्थिर स्थावर झालेली सामाजिक घडी बिघडेल अशी आशंका बाळगणारे, Practicing Caste : On Touching and Not Touching  या पुस्तकाच्या नुसत्या मथळ्यानेच अस्वस्थ झाले आहेत.

जातीयता प्रश्नावर उठलेल्या तीव्र प्रतिक्रिया पाहता एक वैध प्रश्न पडतो: सद्य स्थितीत जातीयतेचं पिशाच्च जरा जास्तंच चवताळलं आहे का?  उच्च सामाजिक थरातले बहुतांशी लोक परिसंवाद आणि परिषदांमधल्या चर्चां आणि वादविवादात जाताजाता होणाऱ्या जातीच्या उल्लेखानेही भयभीत होतात. जातीयतेची अशी उघड चर्चा टाळणं हे, खरं म्हणजे, जातीयता प्रश्नाचं मूळ असलेल्या उच्चवर्णीयांशी असलेल्या तीव्र मतभेदांचं अप्रत्यक्ष लक्षण आहे. तरीही  जातीयतेच्या मुळावर घाला घालायचं सोडून असे लोक जातीय जाणिवांची जाहीर टीका करणाऱ्यांवर हल्ला चढवतात. आडमुठी ध्येयधोरणं असलेल्या संस्थांनी जातीयतेच्या मुद्द्यावर चर्चा करणं फारसं अपेक्षितच नाहिये. पण  संविधानात अंतर्भूत असलेल्या समतेच्या पुरस्कारास जबाबदार असलेल्या आधुनिक सार्वजनिक

अनिकेत जावरे (१९६०-२०१८), छायाचित्र श्रेय - सुब्रता सिन्हा

अनिकेत जावरे (१९६०-२०१८), छायाचित्र श्रेय – सुब्रता सिन्हा

संस्थांनी  जातीयता प्रश्न विचारात घ्यावा अशी अपेक्षा आपण नक्कीच बाळगू शकतो. अनिकेतनं लिहिलेल्या  जातीयतेविषयीच्या संयुक्तिक आणि विद्वत्तापूर्ण पुस्तकावर  चर्चा करण्यासाठी सार्वजनिक संस्था त्यांच्या संस्थात्मक सुविधा उपलब्ध करून देतील अशी माफक अपेक्षा आपण बाळगू शकतो. पण शैक्षणिक आणि इतर सार्वजनिक संस्थांमधला बौद्धिक आत्मविश्वास इतका ठिसूळ झाला आहे की त्यांचे व्यवस्थापक जातीयता प्रश्नाचा सामना करायलाच कचरतात. पुस्तक न वाचताच त्यावरच्या चर्चेला सपशेल नकार देणं हा त्या संहितेवर घोर अन्याय आहे. पुस्तकावर आधारित परिसंवादाच्या आयोजनाला  नकार देणाऱ्या संस्थांना पुस्तकविषयाच्या भीतीने पछाडलं आहे. अलिकडच्या काळात वादविवाद प्रक्रियेच्या तंत्राविषयी उत्सुकता आणि उत्तरदायित्व  ह्या दोन्ही बाबत संस्थात्मक आणीबाणी निर्माण झाली आहे ह्याची नोंद घ्यायला हवी.

अशा परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या काही संस्थांनी पुस्तकाचे  महत्व जाणून त्यावर चर्चा करण्यासाठी संस्थात्मक सहकार्य देऊ केलं ही मोठ्या समाधानाची बाब आहे.

एक गोष्ट मानायलाच हवी की, अनिकेतच्या पुस्तकाचं सखोल वाचन केल्यास जातीयता प्रश्नाचा नव्या सैद्धांतिक दमाने खल करण्याचं बौद्धिक आव्हान ते आपल्याला देतं. जातीयता आणि दलित साहित्य या विषयीच्या संतृप्त  समाजशास्त्रीय संभाषितांना प्रतिसाद देणारं हे पुस्तक आहे. खरंतर, हे पुस्तक म्हणजे जातीयता आणि दलित साहित्याविषयीच्या समाजशास्त्रीय संभाषितांच्या संतृप्ततेची फलश्रुती आहे. जातीयता आणि दलित साहित्य यांविषयीची चर्चा गोठून ठप्प का झाली असावी याविषयी अनिकेत एक अचूक निरीक्षण करतो. साहित्यिक, राजकीय आणि नैतिक विचारांमध्ये झालेल्या गोंधळानं दलित साहित्याविषयीच्या चर्चांना पछाडलं आहे अशी  रास्त आणि नेमकी टिप्पणी अनिकेत करतो.

महाराष्ट्रात, जिथं दलित साहित्याचा प्रथम अविष्कार झाला, तिथं कुणीही हा  गोंधळ दूर करायचा प्रयत्न केला नाही, असा रास्त दावा अनिकेत करतो. अनिकेत असंही सुचवतो की, या क्षेत्रातल्या अनेकांना ती सरमिसळ तशीच ठेवणं जास्त सोयीचं ठरेल असं वाटून, त्यात सुस्पष्टता आणण्यातलं अपयश किंवा असमर्थता यांकडे काणा डोळा केला गेला. हा  गोंधळ दूर करणे सैद्धांतिक दृष्ट्या जिकिरीचं (अनिकेतची संहिता अप्रत्यक्षपणे सुचवते तसं) पण नैतिकदृष्ट्या समाधानकारक मानलं गेलंय. वैयक्तिक हेतूपूर्तीवर आधारलेलं असं  उसनं समाधान सूचित करतं की: साहित्य ही मुळातच एक राजकीय आणि क्रांतिकारी घटना ठरली आहे  आणि त्यामुळे याला सैद्धांतिक स्पष्टीकरणाची गरज उरली नाहीये. आणि खरं तर, अशा आत्मसंतुष्टीपोटी साहित्य आणि मुक्ती सिद्धांत यांच्यातल्या  ज्ञानमीमांसक दुव्याच्या शोधाची गरजही उरली नाहीये असं भासतं.

मौनभंग

आपलं नैतिक प्राबल्य सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्रातील दलितांनी साहित्याचा राजमार्ग पत्करला असा युक्तिवाद अनिकेत करतो. सैद्धांतिक आणि राजकीय दृष्ट्या संपृक्त संभाषितांमध्ये रुजू झालेला अनिकेतचा हा एक अभिनव प्रस्ताव आहे.  एकामागून एक विलक्षण निरीक्षणांद्वारा तो दलित ज्ञानमीमांसेच्या तत्वांवर प्रकाश टाकतो. दलितांचा स्वतःसमोर आणि इतरांसमोर होणारा आविष्कार हाच त्यांच्या ज्ञानप्रांतातल्या “प्रवेशाचा क्षण” असतो. किंवा दलितांचा मौनभंग हाच त्यांचा आकलन क्षण असतो असंही म्हणता येईल. ब्राह्मणाशी संवाद साधताना चांभाराला स्वतःविषयीचं सत्य सापडतं. दुसऱ्या कुणाच्या नाही तर स्वतःच्या शब्दात चांभाराचं स्वत्व प्रगट होतं.

तसं तर, चांभाराला त्याच्या आविष्करणातच  ज्ञानाची आणि अज्ञानाची, विशेषत: ब्राह्मणाच्या अज्ञानाची जाणीव होते. जसं, १८५७ च्या युद्धात वापरलेल्या काडतुसांवरच्या चामडी आवरणाचे रहस्य केवळ चांभारालाच माहीत होतं.  चांभार आणि ब्राह्मण यांच्यातल्या संवादाचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्या संवादांमधली निःशब्द देवाणघेवाण या ज्ञाननिर्मिती प्रक्रियेविषयीच्या सामायिक आकलनामधल्या अनिकेतच्या योगदानाच्या मोक्याच्या कड्या आहेत.

ज्योतिराव फुले आणि बी. आर. आंबेडकर यांच्या लिखाणाचं अनिकेतनं केलेलं मार्मिक वाचन नाविन्यपूर्ण आहे.  अनिकेतच्या विवेचनानुसार, फुले व्यावहारिकतेवर किंवा समस्या निराकरणावर भर देतात तर जातीयतेच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आंबेडकर आधुनिक काळातलं सार्वत्रिक साधन म्हणून न्यायव्यवस्थेवर भर देतात. आंबेडकरांनी सुचवलेला मार्ग मागासवर्गाला पुन्हा एकदा जातीव्यवस्थेच्या खाईत लोटतोसा वाटतो. आरक्षणाचे धोरण एक प्रकारे जातीव्यवस्थेला नवी कुमक पुरवताना दिसतं. आंबेडकरांनी जातींना लावलेली मागासलेपणासारखी बिरुदं जातीयतेचं चालू राहणारं सत्र किंवा न बदलणारं रूपंच अधोरेखित करतात असा युक्तिवाद अनिकेत करतो. मागासलेपणाचा पुनरुच्चार करण्यामागच्या विरोधाभासावर अनिकेत बोट ठेवतो. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या मागासलेपणाच्या भाषेचं मूळ जातीयतेत असलं तरी आधुनिकतेच्या ऊर्जेमध्ये वितळून जाईल असं मागासलेपण सगळंच्या सगळं जातीयतेच्या साच्यात बसत नाही. अनिकेतच्या लिखाणाचा रोख लक्षात घेता आपण अजूनही काही निरीक्षणे नमूद करू शकतो. जातीयतेच्या अस्तित्वात कदाचित बदल होतील, पण त्याच बरोबर, तीत अंगभूत असलेली उच्चनीचता शाबूत राहते. या बाबतीत, अनिकेतनं केलेलं भारतीय मार्क्सवाद्यांविषयीचं निरीक्षण विचार करण्याजोगं आहे. उदाहरणार्थ, तो सुचवतो त्या नुसार, मार्क्सवादातली भौतिक बलतत्त्व ही त्यांच्या प्रकट स्वरूपांपेक्षा कितीतरी दूरगामी आहेत. जातीयतेचा भौतिक आधार मार्क्सवाद क्षीण करतो असं अनिकेत सुचवतोसं वाटतं. मार्क्सवादाच्या एका धारेत जातीयतेला वरपांगी किंवा बिनबुडाचं सामाजिक वास्तव मानलं जाण्यानं अशा समजुतीला दुजोरा मिळतो. अनिकेतने केलेल्या या विवेचनाला जोडून असंही म्हणता येईल की जातीयतेच्या परिभाषेत नुसते शाब्दिक फेरबदल केले तर जातीयतेविषयीच्या परिभाषेत खचित बदल होतील, पण तिची धारणा बदलणार नाही.  बाबासाहेब आंबेडकरांचा विचार लक्षात घेता असंही म्हणता येईल की “शाब्दिक खेळी खेळून नुसती धूळ उडेल, स्तर उंचावणार नाही.” मुळातच, दलितांची भौतिक स्थिती सुधारली तरी सवर्णांच्या नजरेत किंवा त्यांनी केलेल्या मूल्यमापनात दलितांचा दर्जा कधीच सुधारणार नाही.

Practicing Caste: On Touching and Not Touching, हा ताज्या दमानं जातीयतेचा विचार करण्याचा एक खटाटोप आहे. जातीयतेविषयीच्या संपृक्त सामाजिक संभाषिताला दिलेला हा एक प्रतिसाद आहे.

जातीयता प्रश्नाचं अनिकेतनं केलेलं संवेदनशील अवलोकन आपण आपल्या सहजप्रेरणांच्या पलीकडे जाऊन वाचायला हवं.  जातीयतेविषयीचा त्याचा दृष्टिकोन प्रचलित समाजशास्त्रीय आकलनाला संपूर्णतया छेद देत जातो. आत्तापर्यंत, जातीयता ही वस्तुनिष्ठतेवर नाही तर भावनेला दिलेल्या आव्हानांवर  किंवा वैयक्तिक समजुतींवर आधारित आहे (post fact reality)  किंवा एकामागून एक उलगडणाऱ्या एकरेषीय संरचनात्मक सामाजिक प्रक्रियांमधून निष्पन्न होते, यावर समाजशास्त्रज्ञांनी भर दिला आहे. असा दृष्टिकोन त्यांना जातीयतेच्या बदलत्या धारणेचा दावा करायची सवलत देतो. म्हणूनच काही आघाडीच्या समाजशास्त्रज्ञांच्या मते जातीयता ही आता केवळ प्रणाली राहिली नसून तिनं अस्मितेचं रूप धारण केलं आहे. अनिकेतच्या मते जातीयता सामाजिक प्रक्रियांमधून संक्रमित होत असली तरी ती त्या प्रक्रियांच्या आधीच अस्तित्व पावते. व्यक्तींवर जातीचं शिक्कामोर्तब तिच्या लग्नापूर्वी केलं जातं ज्यामुळे त्यांच्या जन्माला ठोस पार्श्वभूमी मिळते.

आघाडीचे लेखक आणि विचारवंत बाबुराव बागूल सुद्धा जातीयतेचं मूळ मनुष्यजन्माच्या पूर्वकाळात असतं असं मानण्यातलं राजकारण अधोरेखित करतात. बागूल म्हणतात, “हे मानवा, तू तर वेदांच्या आधीपासून अस्तित्वात आहेस.” बागुल मानव जातीला सत्-तत्त्व-मीमांसक (ontological) प्राधान्य देतात आणि  त्यांच्या मते माणसाच्या अस्तित्वाचं मूळही माणसामध्येच आहे, वेदांमध्ये किंवा एखाद्या अमूर्त समाजरचनेत नाही. आपल्या कल्पनाविश्वाच्या केंद्रस्थानी माणूसच असला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. बागुलांच्या मते जातीयतेचा प्रश्न सुरुवातीपासूनच मानव कल्पनेवरच हिंदोळतो, एखाद्या गैरमानावी संरचनेवर नाही. बागूल आणि अनिकेत एकाच मुक्ती परंपरेचे पुरस्कर्ते आहेत. अखेरीस, अनिकेत सामाजिक, सामाजिकता आणि सामाजिकतेच्या शक्यता  यांत सूक्ष्म फरक करतो. त्याच्या मते भारताच्या संदर्भात एकसंध सर्वसमावेशक सामाजिकतेची शक्यता प्रत्यक्षात आणणं अशक्य होऊन बसलं आहे, ज्यामुळे वास्तवात अखंड समाज रुजू होणंही तितकंच अवघड झालं आहे. त्याऐवजी आपल्याकडे भारतात विखंडित स्वरूपाची सामाजिकतेची शक्यता प्रत्ययास येते. सगळ्या प्रमुख महानगरांमध्ये स्तोम माजलेल्या गेटेड कम्युनिटींच्या डोलणाऱ्या पिकात त्या विभाजित सामाजिकतेच्या शक्यतेचा आविष्कार होताना दिसतो. एवढंच काय, काही बिल्डर, गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी अशा बेटांसारख्या अलिप्त वसाहतींची लालूच दाखवतात. भारतीय महानगरांमधली अशी विभागणी, ब्रिटिश राजवटीतल्या शहरांच्या आखीवरेखीव सिव्हील लाइन आणि बजबजपुरीची बाजार लाईन अश्या विभागणीची आठवण करून देते. एक चिंताकुल विचारवंत म्हणून, अनिकेत, एका विभागातून आरपार दुसऱ्या विभागात जाता येण्याची संभाव्यता आजमावतो. Practicing Caste  विभाजित सामाजिकतेच्या शक्यतांच्या मर्यादा पार करण्याच्या वाटा जोखतं.

गोपाळ गुरु ‘इकॉनॉमिक अॅन्ड पोलिटिकल  विकली’चे संपादक आहेत.

अनुवाद – माया निर्मला

अनुवाद सहयोग – उर्मिला भिर्डीकर

मूळ लेख- ‘Aesthetics of a Text’, Economic & Political Weekly, EPW July 13, 2019 vol lIV no 28, (https://www.epw.in/practicing-caste) इथे प्रसिद्ध झाला आहे.

‘Practicing Caste’ विषयी आणखी लेख

विस्थापित विचारालाप
केवळ आपण

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0