विस्थापित विचारालाप

विस्थापित विचारालाप

अनिकेत जावरे यांनी एक वर्षापूर्वी लिहिलेल्या प्रॅक्टीसिंग कास्ट : ऑन टचिंग अॅन्ड नॉट टचिंग (‘Practicing Caste: On Touching and Not Touching’ जातीयतेचा परिपाठ: स्पर्श करण्या आणि न करण्या विषयी) या त्याच्या पुस्तकाची विभिन्न अंगांनी ओळख करून देत त्यातल्या विचारलापांना प्रतिसाद देणाऱ्या, तीन स्वतंत्र लेखांचे मराठी अनुवाद.

लाल महालातील लावणी आणि जात संघटनांची पुरुषसत्ताकता
“तो सदैव बोलतच राहिला! ” : रसेलची तत्त्वज्ञानाकडे वाटचाल
कोविडमध्ये ३० हजार मुले अनाथ

Practicing Caste, जातीयतेच्या जडणघडणीतल्या लघुतम सूक्ष्म घटकांना किमानतत्त्वप्रणालीच्या (minimalism) धैर्यधीर काठीनं  टोकत शिवाशिवीच्या परिपाठातून हुडकून काढतं आणि त्या घटकांना पुन्हा समाज या कल्पनेशी ताडून पहातं. नवी विचारसरणी आणि नवी जीवनशैली साकारताना संपूर्ण  नैतिक दारिद्र्य  हीच पूर्वअट आणि तोच त्यांचा प्रथम आविष्कार ठरेल, असं पुस्तकात मांडलं आहे. असं विस्थापन सामाजिकतेच्या नव्या रुपांच्या शोध मोहिमेची सुरुवात करतं.

…………………………………………………………………………………………………………………………………………………..

Practicing Caste: On Touching and Not Touching च्या पानांमधून आपल्याशी बोलणाऱ्या स्वरात एक विरळा कळकळ जाणवते. त्यातून अनिकेतच्या बोलण्यातला ओळखीचा — सौम्य दृढ धारदार — अनुनाद तर जाणवतोच, पण संहितेतून संपर्क साधणारा त्याचा कधी खालच्या पट्टीतला हलका स्वर तर कधी वरच्या पट्टीतला हाकाराही जाणवतो. वाचकांना संबोधित करणारा जो “आपण” आहे, तो कधी एका व्यक्तीपेक्षाही संकुचित असतो तर कधी आपल्याला विचारालापांच्या सान्निध्यात केवळ श्रोते म्हणून नाही तर सहभागी म्हणून सामावून घेणारा तो प्रशस्त “आपण” असतो. एकीकडे औद्धत्यपूर्ण असणारा आणि जोखीम स्वीकारणारा, पण दुसरीकडे विरत जाणारा बोलणारा कर्ता हा अनिकेतच्या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.  “हा एक लेखन शैलीचा असा सराव आहे जो लिहिता लिहिताच संहितेवर विचार करण्याची मुभा देतो” असं Practicing Caste विषयी अनिकेत लिहितो. पुढे लिहितो, “खरं तर हे लिखाण करणारी व्यक्ती, मी असायला नको होतं. पण विचारांची दिशा आणि साजेसा युक्तिवाद शोधण्यासाठी, जमल्यास चार गोष्टी सुचवण्यासाठी मी या शैलीचा पाठपुरावा केला, आणि हे लिखाण घडत गेलं.” किमानतत्त्वप्रणालीचा शोध घेतल्यानं आणि तिचा पाठपुरावा केल्यानं, अनिकेत शब्दांचा कर्ता-करविता किंवा कैवारी  नसतानाही त्याला शब्दांमध्ये वसता आलं आणि त्यांना भविष्याचं एक अनागत अनपेक्षित कवाड उघडून देता आलं असं जाणवतं.    

एकूणेक बौद्धिक ओझं उतरवून टाकणं, विद्वत्तापूर्ण व्यासंगाशी आपलं नातं कमी करणं, आणि एडमंड हुसर्लच्या पहिल्या वर्जनाप्रमाणे (First Reduction) “निःसंगतेची आणि निर्धनतेची”वाट जोखणं या प्रक्रिया  किमानतत्त्वप्रणालीमध्ये अंतर्भूत आहेत.  इथं रूपविवेचनवाद (phenomenology) किंवा संरचनावाद (structuralism) आणि वीरचना (deconstruction) यांचा संदर्भ देण्याने आपली दिशाभूल होऊ शकते: कारण आपल्याला संसाधनं आणि अधिकार यांचे संकेत देण्याऐवजी वरील विचारप्रणाली आपल्याला  सांकल्पनिक अनवगुंठनाची (stripping down) क्रिया मात्र दाखवतात. पुस्तकात विचाराधीन असलेल्या या प्रस्तावित सरावाला अनिकेतनं “Oubliering” (“भुलणंचुकणं”) असं आकर्षक नाव दिलं आहे, जे जाणूनबुजून विसरणं आणि चुका करणं अशा मिश्रखेळीद्वारा आपल्याला हेतुपुरस्सरतेपासून संपूर्ण मुक्त करतं. अनिकेत या खेळीच्या मर्यादाही ओळखून आहे: सर्वार्थानं संपूर्ण विस्मरण अशक्यच आहे. काही गोष्टी तशाच रेंगाळतात ज्या कदाचित चिकित्सा आणि निरसन प्रक्रियांना उपलब्ध नसलेल्या मनाच्या “नैसर्गिक” स्वभावात शाबूत असतात. अनिकेत सुचवतो की त्यानं — संभाषितं, अर्थालंकार आणि साहित्यप्रकार यांच्यायोगे— निर्देश केलेली व्यापक अर्थाची साहित्यिक  संकल्पना  मनाच्या “नैसर्गिक” स्वभावाकडे निर्देश करते.  मानव्यशास्त्रांच्या अखत्यारीत असलेला हा प्रांत महत्त्वाचा आहे कारण तो समाजशास्त्रांतर्गत घडणाऱ्या जातीयतेविषयीच्या विचारविनिमयबाहुल्यात अनिकेतच्या ह्या पुस्तकाचं वेगळेपण सिद्ध करतो. पुढे जाता लक्षात येईल की, अनिकेतनं निर्देश केलेल्या साहित्य संकल्पनेला, अविचल अनुभवोत्तरतेचा दर्जा देणं, जातीविषयक  निर्विकल्प सिद्धांतासाठी एक पर्यायी पाया  मानणं, चुकीचं ठरू शकतं. अनिकेतला जातीयतेचं स्पष्टीकरण देण्यात नाही तर तिच्या निर्मूलनात रस आहे हेही आपण लक्षात ठेवायला हवं.  जातीयता ही समजून घ्यायची गोष्ट नाही, तर ती एक असा परिपाठ आहे ज्याच्या उच्चाटनासाठी तो विस्मरणात ढकलणं आणि नव्यानं मूलभूत विचार करणं जरुरी आहे.

अनिकेत जावरे (१९६०-२०१८), छायाचित्र श्रेय - सुब्रता सिन्हा

अनिकेत जावरे (१९६०-२०१८), छायाचित्र श्रेय – सुब्रता सिन्हा

स्पर्श आणि सामाजिकतेच्या शक्यता

अगदी मुळाचाच वेध घेणं म्हणजे काय? अनिकेत कॉम्प्युटर आणि प्रोग्रॅमिंगच्या भाषेचं उदाहरण देतो: जातीयतेचा परिपाठ ही जर उच्चस्तरावरची संयुक्ती (composite) मानली तर “जिथे ‘जोडाजोडीचं’ (assembly चं) काम होतं तिथपर्यंत पोचून ती त्याला समजून घ्यायची आहे”.  इथं हेतू हा की त्यातले सूक्ष्म, निम्नस्तरीय घटक शोधून काढून त्यांची आपल्याला समजेल अशा क्रमवारतेत मांडणी केली तर त्या जटिल संयुक्तीचं विघटन करता येईल आणि नवं काही घडवायचा मार्ग  मोकळा होईल. Practicing Caste हे स्पर्श करण्या न करण्याविषयी आहे  —  तसंच, दोन दशकांपूर्वी लिहिलेल्या त्याच्या मसुद्याचा मथळा “Touch: A Study ” असा होता.  याचं कारण असं की स्पर्श, त्याच्या मूलभूत स्वरूपातून, प्रकार आणि पद्धतींमधून, आपल्याला अशा अतिसूक्ष्म घटकांपर्यंत पोचवतो, जे एकमेकांत मिसळल्यानं त्यांची बेसुमार वाढ होऊन ती फक्त जातीयतेलाच नाही तर बहुतेक सर्व मानवी व्यवहारांना जबाबदार ठरते आणि त्यांना व्यापून उरते.  पण, जातीयतेच्या पर्यायी स्पष्टीकरणासाठी एखाद्या पायाभूत  संकल्पनेसारखी ”स्पर्शाची” खुंटी भक्कम आहे असं मानण्यात कदाचित गफलत होईल. पुस्तकाच्या दरम्यान, पुस्तकाचे लक्ष स्पर्शाकडून समाजिकतेच्या शक्यतांकडे वळते हे महत्वाचं आहे. अनिकेतच्या मते जातीयतेच्या समूळ उच्चाटनासाठी हा दिशाबदल अत्यावश्यक आहे. ”स्पर्शा” ची “दुधारी तलवार”  तत्त्वज्ञान आणि  सामाजिकतेच्या शक्यता यांच्या “परस्पर शरीर-विग्रहातून” त्यांच्या विषयीच्या चर्चांना  एकत्र गोवण्याचं आणि  छेद  देण्याचं काम करते.

Practicing Caste  मध्ये स्पर्शाचं सार संपर्कामध्ये आहे, जो स्पर्शाचं रूपही आहे आणि आशयही. स्पर्श ही मानव आणि त्याचं/तिचं जग यांच्या मधली अंतर्त्वचा आहे. केवळ संपर्कासाठीचा स्पर्श आणि वस्तू हाताळताना केलेला स्पर्श यात इथं फरक केलेला दिसत नाही कारण सक्रियता आणि निष्क्रियता यातल्या तथाकथिक द्वैताच्या उचिततेविषयीची सर्जनशील साशंकता  पुस्तकात दिसून येते. त्या ऐवजी तिथं आपल्याला शब्दशः आणि लाक्षणिक स्पर्श, स्वतःला स्पर्श करणं आणि इतरांना स्पर्श करणं, आणि चांगला आणि वाईट स्पर्श यांतला फरक ठळक केलेला दिसतो. ही द्वैतं इथं जितकी मूलभूत मानली गेली आहेत असं वाटतं तितकी ती नसावीत. स्वतःला स्पर्श करणं आणि दुसऱ्याला स्पर्श करणं यातला विरोध अगदी लक्षणीय वाटला तरी त्यात मानवांसकट सगळी चलसृष्टी आणि अचलसृष्टी यातलं द्वैत गृहीत धरलेलं दिसतं.  चांगल्या आणि वाईट स्पर्शातला विरोध अगदी सुस्पष्ट आहे, त्याला स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही असं मानलं तरी स्पर्शाचं मूल्यांकन करणं आपल्याला कसं शक्य होतं किंवा स्पर्शेन्द्रियाला मूल्यांकनाची आंतरप्रज्ञा कशी प्राप्त होते ते समजून घ्यायला हवं. महत्त्वाचं हे की स्पर्श प्रसंगाच्या संदर्भात आधिनियम आणि प्रतिलेख यांना कोणत्याही प्रकारचं तार्किक प्राधान्य अनिकेत देत नाही.

इथं केलेला “शब्दशः” आणि “लाक्षणिक” स्पर्श यातला विरोध तुलनेनं जास्त कुतूहलजनक वाटतो, जो आपल्याला Practicing Caste मधे अभिप्रेत असलेल्या साहित्य-संकल्पनेच्या जास्त जवळ नेतो. “आपण वस्तूला स्पर्श करण्याच्या हेतूनं शिवतो” तेव्हा “शब्दशः” केलेला स्पर्श स्पष्टपणे ओळखता येतो. “वडिलधाऱ्यांना, गुरुजनांना, किंवा ईश्वर प्रतिमांना”केलेला चरणस्पर्श हा पावित्र्याच्या प्रांतात केलेला लाक्षणिक स्पर्श असतो,  जो त्या स्पर्शाचा अर्थ किंवा स्पर्श वस्तूचं स्वरूप पालटून टाकतो.  इथं स्पर्शाचा अर्थ आणि स्पर्श केलेली वस्तू लक्षणीय कशामुळं ठरतात? स्पर्शाच्या संदर्भात शब्दशः आणि लाक्षणिक अर्थातल्या द्वैताचं प्रयोजन कशामुळे समर्पक ठरतं? मानवी कृती किंवा अनुभवामध्ये अंगभूत असं काही आहे का ज्यामुळे ते अपरिहार्यपणे लाक्षणिक व्यवहारांच्या प्रांतात शिरतात? या प्रश्नांची प्रत्यक्ष चर्चा Practicing Caste मध्ये आढळत नाही, पण जातीभेद वाईट लाक्षणिक स्पर्शावर आधारलेले असल्याकारणानं,  या प्रश्नांच्या लांब सावल्या पुस्तकात सर्वदूर पसरलेल्या आहेत. लाक्षणिक स्पर्शाची संकल्पना अलंकारशास्त्र,  संभाषितं  आणि साहित्य प्रकारांचे  प्रांत आपल्याला खुले करते. अलंकारशास्त्राचं  प्राथमिक कार्य वर्गवारी करणं असावं असं वाटतं ज्यामुळे आपल्याला निरनिराळ्या लक्षणांमधला फरक ओळखता येतो, आणि  त्यांचं नव्यानं वर्गीकरण करून साहित्यप्रकारांसारखी उच्चस्तरीय सुसंगतता प्रस्थापित करणं  शक्य होतं. पॉल दि मन चा संदर्भ देऊन अलंकारशास्त्र आणि संकेतशास्त्र यातही इथं फरक केला आहे, ज्यामुळे  शब्दशः आणि लाक्षणिक यामधला विरोध पद्धतशीर आणि सुसंगतपणे प्रस्तुत करणं अवघड होऊन  बसतं. आपण ज्याला शब्दशः केलेला स्पर्श समजतो, तो लाक्षणिकतेच्या व्यापक क्षेत्रामधली एक घटना असेल का? तो अर्थाच्या बलक्षेत्रातला एखादा क्षण असेल का? Practicing Caste मध्ये  अशा शक्यतेचं सूतोवाच करणारे क्षण आहेत.

जातीभेदाच्या संदर्भात, वाईट लाक्षणिक स्पर्श नेहमी, शारीरिक संपर्क किंवा शब्दशः स्पर्श असावा लागत नाही; दलिताचा आभासी सावलीस्पर्शही लाक्षणिक असू शकतो. मेट्रोसारख्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या धक्काबुक्कीत, जिथं कोणत्याही उद्दिग्न होऊन केलेल्या विरोधी कारवाई शिवाय जातियतेत निषिद्ध मानल्या गेलेल्या सर्व व्यवहारांचे राजरोस उल्लंघन होतं, तिथं शरिरांच्या रेटारेटीत लाक्षणिक स्पर्श कसा आकरसून जातो याचं  लक्षवेधक आणि अभिनव विश्लेषण अनिकेत सादर करतो. तथापि लाक्षणिकतेचं स्वेच्छेनं केलेलं हे निलंबन रुढीबाह्य मानलं जातं, ज्याला लोकलट्रेनच्या प्रवासानंतर अंघोळ करून होणाऱ्या शुद्धीकरणरुपी भरपाईची गरज असते, आणि त्यानंतर स्पर्शातली लाक्षणिकता पुन्हा प्रस्थापित होते.  जातीय हिंसेमधे अनिकेतला दडपशाही पुन्हा नांग्या वर काढताना दिसते. सार्वजनिक  संपर्कातल्या स्पर्शाच्या आकरसून जाण्यातून त्याला दिसते ती लाक्षणिकतेची निकराची अघोषित उपस्थिती, तिचं निष्क्रियीकरण, त्यातून चालू राहणारी लाक्षणिकतेची भरती ओहोटी.  आश्चर्य हे की, लाक्षणिकतेचं  निराकरण मात्र वाईट आणि हिंसक अशा शब्दशः स्पर्शाच्या रूपात होतं. स्पर्शाच्या आकरसून जाण्याविषयीचं अनिकेतचं भारावून टाकणारं स्पष्टीकरण इलियास कनेटीच्या  Crowds and Power  मधल्या सलामीच्या  विधानांच्या अगदी विरुद्ध आहे, जिथं दाट गर्दीतल्या शरीरांच्या रेटारेटीच्या अनुभवात “माणसाची”— व्यक्तिची — अंधारात काही/कोणी अज्ञात आपल्याला शिवेल की काय अशा आदिम भितीतून सुटका होते.

Practicing Caste  सांस्कृतिक सिद्धान्तामधली आपल्या सवयीची विगूढीकरण (demystification) पद्धत अवलंबत नाही आणि ते सामाजिक संरचनावादाविषयी साशंक असल्यासारखं वाटतं. कर्त्याच्या संरचनेच्या आख्यानांविरुद्ध, एक निम्नस्तरीय  Bildungsroman (म्हणजे प्रमुख पात्राच्या सांस्कृतिक आणि नैतिक उन्नतीचा आलेख मांडणारी कादंबरी), शरीराची नवजात अर्भकापासुन सुरु होणारी उत्पत्ती, माणसाची जगातली लघुतम सुरुवात, ते सादर करतं.  स्पर्शाचे अगदी प्राथमिक स्वरूपाचे अनिकेतनं रेखाटलेले अनुभव — अनोळख्या जगात येऊन पडल्यावर वाटणाऱ्या  जपणूक, संगोपन इत्यादी — मूलभूत  गरजांचं विश्व विचारात घेतात. पुस्तकातल्या तुरळक उद्धरणांमध्ये जॉन बॉस्वेलच्या Kindness of Strangers  चा एकापेक्षा जास्त वेळा उल्लेख आहे. पहिल्या वहिल्या, संरक्षक, कवेत घेणाऱ्या स्पर्शाचा अनुभव, इथं हिंसक स्पर्शाचा प्रतिवाद म्हणून उल्लेखला आहे. आणि तो युक्तिवादही जातीयतेविषयीच्या जन्मावर आधारित विचारप्रणालींच्या प्रतिवादात उभा केला आहे. जन्माला प्राधान्य देणाऱ्या जातीवादाच्या भाषेतच नाही, तर, वैधतेचा स्रोत जन्मामध्येच निश्चित करणाऱ्या अस्मितावादी (identitarian) चळवळी सुद्धा अधिप्रामाण्याचं मूळ जन्मकुळामध्येच शोधतात हे अनिकेत अधोरेखित करतो. प्रतिवादार्थ, ज्योतिराव फुलेंचा उल्लेख करून तो लिहितो, एखाद्याच्या जन्मापूर्वीपासून, किंवा गर्भधारणेपूर्वीपासून जात निश्चित होत असते, आणि मरणानंतरही अबाधित राहते ती जैविक विघटन न होणारी जात! नवजात अर्भकाविषयीची निरूपणं एकात्मभावाच्या इतर मंडळांकडे निर्देश करतात: स्थळकाळ मंडळात घडणारा परार्थात्मक स्पर्श हा एकात्मभावाचा पहिला स्रोत आहे.

अनुभवाचे निम्नतम सूक्ष्म घटक जातीयतेविषयीचा विचारविनिमय ज्या  समाज संकल्पनेच्या परिघात घडतो तिच्या प्रतिवादात उभे केले आहेत. अनिकेत समाज या संकल्पनेचा तीव्र निषेध करतो: तो प्रतिवाद करतो की सर्वसमावेशक एकात्म असा समाज अस्तित्वात नसतो, आणि आपण सामाजिकतेच्या नव्या शक्यतांचा शोध घेणं अनिवार्य आहे. सामाजिकतेच्या नव्या शक्यतांचा  प्रस्ताव, इथं जातीयता समजून घेण्यासाठी समाजशास्त्रज्ञ नेहमी ज्या रोटीबेटी व्यवहारांकडे वळतात त्यांच्या आधारावर केलेला नाहीए.  त्यांची जागा, एकात्मता आणि नैतिकता याविषयीचा नवा विचार दृष्टीपथात आणतील अशा, नवजात अर्भकांची भिरकावलं गेल्यासारखी स्थिती आणि त्यांच्या जैविक गरजा, या विषयीच्या कथनांनी  घेतली आहे. अनिकेतनं केलेली अनुवंशिकता आणि संपादन, एकांतवास आणि समाज याविषयीची उदंड मौलिक चर्चा इथून उद्भवते.

नैतिक विस्थापन

आता परत आपण “साहित्य संकल्पने”कडे वळूया. Practicing Caste मध्ये ती स्थिर आणि अतिरक्त अर्थाचं उगमस्थान ठरत नाही.  अनुप्रासासारख्या उच्चारांची पुनरावृत्ती असणाऱ्या अलंकाराविषयीच्या चर्चेत ते सुस्पष्ट होतं. या बाबींचं अर्थाच्या स्तरावर केलेलं पुनर्मूल्यांकन अनिकेत समोर ठेवतो, आणि बाबुराव बागुलांच्या कथांमधल्या कथन-घटकांचं कथासूत्र आणि  पात्रं यांच्या पातळीवर केलेल्या पुनर्मूल्यांकनाविषयीच्या त्याच्या अचूक निरीक्षणांमध्ये त्याचा विस्तार करतो. त्या निमित्तानं कदाचित अनिकेतनं केलेल्या साहित्यिक अर्थालंकारांच्या प्रयोजनाविषयी काही संकेत आपल्याला मिळतात. अर्थोत्पत्तीसाठी एक ठोस आधार देऊकरण्याऐवजी, एका स्तरावरच्या सुसंगतीचे विघटन करून तिचे दुसऱ्या स्तरावर पुनर्मूल्यांकन करणे त्यामुळे शक्य होते. यापूर्वी इथं नमूद केलेल्या अनिकेतच्या अर्थालंकारातल्या व्यस्ततेला, अर्थालंकारांमधले अंगभूत अर्थ सोलून काढणाऱ्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियांचा मागोवा घेत त्यांना परिणाम देण्याचं साधन म्हणून विचारात घेणं जास्त श्रेयस्कर ठरेल.  त्या अर्थानं, प्रभावी धोरणांची उपाययोजना करण्यासाठी  अलंकारशास्त्र  उपयोगाचं नाही, परंतु अलंकारशास्त्रामुळे वाचन व्यवहाराच्या नैतिक अवकाशात भूमिका घेणं आणि योजना आखणं या प्रक्रियांना छाट देण्यासाठीची पूर्वतयारी होते.

कदाचित अनिकेतचा विस्थापनाविषयीचा युक्तिवाद (जो, तो प्रस्थापिततेच्या प्रतिवादातून विकसित करतो ) या पार्श्वभूमीवर समजावून घ्यायला हवा. त्याचे दलित साहित्याविषयीचे विचार दुःखमयतेचे चित्रण  किंवा प्रस्थापित न्यायव्यवस्थेला दिलेले आव्हान यांवर आधारलेले नाहीत. बागुलांच्या कथा नैतिक विस्थापनातून,  वाचकांच्या नैतिक दारिद्र्याच्या अनुभवातून आणि कथांमधल्या पात्रांच्या नैतिक आधाराशिवाय वागण्याच्या अनुभवातून, अपेक्षित परिणाम साधतात असा युक्तिवाद तो करतो.  नैतिक दारिद्र्य — वाचकांना नैतिक प्रतिसादाचे साधार समर्थन करणं सुकर करतील अशी संसाधनं उपलब्ध नसणं — याच्या  जोडीला बागुलांच्या आई  या कथेतल्यासारखा, बागुलांच्या पात्रांना नैतिक हतबलतेचा सामना करावा लागतो.  कथन हा कथाकाराने सादर केलेला सर्वाधिक सहजमान्य दस्ताऐवज मानला तर कथनक्रियेची सार्थकताच डळमळते, असंभवनीय ठरते. साहित्यातील अकथनीयाच्या साक्षीने वाचकांना नैतिक दारिद्र्याशी  करावा लागलेला सामना, प्रत्यक्ष आयुष्यात अनेकदा तातडीने कराव्या लागणाऱ्या कारवाईपोटी डावलल्या गेलेल्या मननचिंतनाला चालना देतो.

Practicing Caste  मध्ये विचार करताना काही गोष्टी सोडून देणं आणि काहींना सोडून जाणं अभिप्रेत आहे, आणि पुस्तकात शेवटाला ह्या कृती शैलीच्या पातळीवर राबवल्या आहेत. वारशानी अंदण मिळालेल्या आणि स्वतः संपादन केलेल्या विचार आणि कृतींना जाणीवपूर्वक दूर सारणं ही पुस्तकातल्या विचार व्यवहाराची पूर्वअट आणि प्रथमाविष्कार आहे. अशा तऱ्हेचं विस्थापन सामाजिकतेच्या नव्या  शक्यतांच्या विकासाची पायाभरणी करतं.  Practicing Caste च्या शेवटच्या काही प्रकरणांमधल्या विचारातला थरार, प्रवेग आणि जोम प्रभावित करणारे आहेत.  औद्धत्यपूर्ण शैली दारिद्र्यापरत्वे ज्ञाताच्या रेट्यापासून विचार मुक्त कराण्याचा आणि जातीयतेमुळं झालेल्या पडझडीपायी आतापर्यंत अज्ञात राहिलेल्या सामाजिकतेच्या शक्यतांपर्यंत पोचण्याचा मार्ग अनिकेतनं आखला आहे.

उदय कुमार, नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास केंद्रात प्राध्यापक आहेत.

अनुवाद – माया निर्मला

अनुवाद सहयोग – उर्मिला भिर्डीकर

मूळ लेख, ‘Destitute Thinking’, Economic & Political Weekly, EPW July 13, 2019 vol lIV no 28, (https://www.epw.in/practicing-caste) इथे प्रसिद्ध झाला आहे.

‘Practicing Caste’ विषयी आणखी लेख

संहितेची सौन्दर्यमीमांसा 
केवळ आपण

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1