शेतकरी आत्महत्या, पत्रात पंतप्रधान मोदींवर आरोप

शेतकरी आत्महत्या, पत्रात पंतप्रधान मोदींवर आरोप

जुन्नर तालुक्यातील ४५ वर्षीय शेतकरी दशरथ लक्ष्मण केदारी यांनी सुसाईड नोटमध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला आहे. चिठ्ठीत केदारी यांनी पिकाला किमान आधारभूत किंमत न मिळाल्याबद्दल आणि कर्ज वसुली एजंटांकडून छळ केल्याबद्दलही लिहिले आहे.

नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आत्महत्येसाठी ठपका ठेवला आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, दशरथ लक्ष्मण केदारी (४५) असे मृताचे नाव असून, तो जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या गावातील होता.

एका पत्रात त्याने पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि नंतर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की त्यांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये केदारीने पिकासाठी किमान आधारभूत किंमत (MSP) न मिळणे आणि कर्ज वसुली एजंटांकडून छळ केल्याबद्दल लिहिले आहे.

केदारी यांनी आपल्या चिठ्ठीत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यांनी कोरोना विषाणूच्या साथीमुळे शेतकऱ्यांची बिकट स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख केला. कोणतेही पाऊल न उचलण्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींना जबाबदार धरले असून एमएसपीची मागणी केली.

हाताने लिहिलेल्या चिठ्ठीत केदारीने लिहिले, आहे की ‘आमच्याकडे पैसे नाहीत, सावकार थांबायला तयार नाहीत. काय करायचं? कांदा बाजारात नेण्याचा खर्चही आम्ही उचलू शकत नाही. मोदी साहेब तुम्ही फक्त तुमचाच विचार करत आहात. पिकाला हमी भाव द्यावा लागतो. तुम्हाला शेती सांभाळता येत नाही. शेतकऱ्यांनी काय करावे? फायनान्सचे लोक धमकावतात, पतपेढी (सहकारी संस्थेचे) अधिकारी शिवीगाळ करतात. न्यायासाठी आम्ही कोणाकडे जायचे?… तुम्ही काहीच करत नसल्यामुळे आज मला आत्महत्या करायला भाग पाडले आहे. पिकांना भाव द्या, हा आमचा हक्क आहे.’

त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठून केदारीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, केदारीच्या मृत्यूनंतर स्थानिक तहसीलदार आणि अन्य सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी भेट दिली.

या संदर्भात आळेफाटा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून केदारी यांच्या मृत्यूमागील कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, की केदारीच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. रविवारी रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दशरथकडे एक एकर शेती आणि एक दुचाकी होती. त्यांनी अडीच लाख रुपयांचे कर्ज घेऊन गेल्या मे महिन्यात कांद्याचे पीक घेतले होते. तेव्हा त्याची किंमत सुमारे १० रुपये होती, त्यामुळे कांदा विकण्याऐवजी त्यांनी तो साठवून ठेवला, त्यासाठी काही रक्कमही मोजावी लागली.

मात्र नंतरही भाव वाढला नाही आणि याच दरम्यान पावसात अर्धा कांदा खराब झाला. यानंतर त्यांनी पुन्हा त्याच शेतात टोमॅटो आणि सोयाबीनची लागवड केली. मात्र पहिल्याच पावसात टोमॅटो खराब झाला आणि गेल्या आठवड्याच्या पावसात सोयाबीनचे पीकही खराब झाले.

वृत्तानुसार, या पिकाचा पंचनामा करण्यासाठी दशरथ १७ सप्टेंबर रोजी शासकीय कार्यालयात नुकसान भरपाईसाठी गेले होते, तेथे काही तास बसूनही पिकाचा पंचनामा होऊ शकला नाही. त्यानंतर दुपारी विष प्राशन करून नंतर शेत तलावात उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

(छायाचित्र प्रतिकात्मक स्वरूपाचे)

मूळ वृत्त

COMMENTS