कर्नाटकात विद्यार्थ्यांकडून बाबरी मशीदीचा प्रतिकात्मक विध्वंस

कर्नाटकात विद्यार्थ्यांकडून बाबरी मशीदीचा प्रतिकात्मक विध्वंस

नवी दिल्ली : येत्या चार महिन्यात अयोध्येत भव्य राम मंदिर उभे करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केली असता  रविवारी कर्ना

मुस्लिम पक्षकारांचा कोणत्याही मध्यस्थीला नकार
रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सुनावणी पूर्ण
‘बाबरी मशीद प्रकरणी ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय द्या’

नवी दिल्ली : येत्या चार महिन्यात अयोध्येत भव्य राम मंदिर उभे करण्यात येईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी केली असता  रविवारी कर्नाटकातील एका शाळेतल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या कार्यक्रमात बाबरी मशीदीचा प्रतिकात्मक विध्वंस केला. ही शाळा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कल्लाडका येथील असून तिचे नाव श्री राम विद्याकेंद्र हायस्कूल असे आहे. या शाळेतल्या ११ वी १२ वीत शिकणाऱ्या मुलांकडून बाबरी मशीदीचा प्रतिकात्मक विध्वंस शालेय प्रशासनाने करवून घेतला. बाबरी मशीदीचा एक फलक मुलांपुढे ठेवण्यात आला व त्यावर हल्ला करण्याचे आवाहन ११ वी व १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ध्वनीक्षेपकावरून केले जात होते. या मुलांनी पांढरा शर्ट व भगवी लुंगी परिधान केली होती. त्यांची आक्रमक अशी ‘हनुमान सेना’ही उभी करण्यात आली होती. या मुलांना उत्तेजित करण्यासाठी ध्वनीक्षेपकावर ‘बोलो श्री राम की जय’ अशा आरोळ्या ठोकल्या जात होत्या. तसेच भगवे झेंडे फडकवले जात होते. मुलांनी प्रतिकात्मक बाबरी मशीदीच्या पोस्टरवर हल्ला केला व ते फाडले आणि नंतर जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. नंतर मुलांनी राम मंदिराचीही प्रतिकृती उभी केल्याचे वृत्त आहे. ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रभाकर भट यांच्या मालकीची आहे.

महत्त्वाचे म्हणजे शालेय विद्यार्थ्यांकडून बाबरी मशीदीच्या या प्रतिकात्मक विध्वंसाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री सदानंद गौडा हे प्रमुख पाहुणे होते तर पुड्‌डूचेरीच्या राज्यपाल व माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या उपस्थित होत्या. गौडा यांनी या प्रसंगी आपण उपस्थित नव्हतो पण नंतर कार्यक्रमाला आलो असे उत्तर दिले तर किरण बेदी यांनी ट्विटरवर या घटनेला वगळून अन्य स्पष्टीकरण दिले.

या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर खळबळ उडाली. या घटनेबाबत संघस्वयंसेवक प्रभाकर भट यांची प्रतिक्रिया ‘द न्यूज मिनिट’ने घेतली. त्या प्रतिक्रियेत भट म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीदीसंदर्भात दिलेल्या निर्णयावर आपण समाधानी नाही. न्यायालयाने जो काही निर्णय दिला त्यामधील अनेक मुद्द्यांवर आपण असहमत आहोत.’

ते म्हणाले, आमच्या शाळेच्या कार्यक्रमात मुलांनी फक्त इतिहासातील घटनांचे सादरीकरण केले आहे व त्यात काहीच गैर नाही. आम्ही यापूर्वी जालियनवाला बाग हत्याकांडाचे सादरीकरण केले होते त्याची कुणी दखल घेतली होती का?

दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांनी घेतले होते आक्षेप

कट्‌टर हिंदुत्ववाद्यांच्या लक्ष्य ठरलेल्या नीडर पत्रकार गौरी लंकेश यांनी यापूर्वी संघस्वयंसेवक प्रभाकर भट यांच्या कार्यप्रणालीवर आपल्या लेखणीतून आक्षेप घेतले होते. दक्षिण कन्नड व उडुपी जिल्ह्यात हिंदुत्ववादी शक्तींचा जोर वाढण्यात भट यांचे कार्य कारणीभूत असल्याचे लंकेश यांचे म्हणणे होते. भट यांनी या दोन्ही जिल्ह्यात मुस्लिम व ख्रिश्चन समुदायाविरोधात विखार पसरवण्याचे संघटित प्रयत्न केले होते. ज्या शाळांशी भट संबंधित आहेत त्या शाळांमधील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना कडव्या हिंदुत्वाचे धडे शिकवले जात असून विद्यार्थ्यांना संघस्वयंसेवकाचा पोशाख घालावा लागतो, त्यांना लाठी शिकवली जाते व अल्पसंख्याकांविषयीचा मनात तिरस्कार निर्माण केला जातो असे लंकेश यांनी समप्रमाण सिद्ध करून दाखवले होते. या शाळांना सरकारी अनुदान मिळत असूनही त्यावर कोणत्याही पक्षाच्या सरकारकडून कारवाई केली जात नव्हती असाही मुद्दा लंकेश यांनी उपस्थित केला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0