संजय राऊतांची मुंबई महापालिका निवडणूक खेळी

संजय राऊतांची मुंबई महापालिका निवडणूक खेळी

एकाच दगडात भाजप, किरीट सोमय्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर लक्ष्य भेद करत आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा अजेंडा लोकांसमोर विशेषतः मराठी लोकांसमोर ठेवला. हे ठेवताना राऊत यांनी चलाखीने मुंबईतील भाजपचा चेहरा हा किरीट सौमय्या असल्याचे सांगितले आहे.

१४३ जिल्ह्यांत एकही आयसीयू बेड नाही
संजय राऊत यांना ईडीकडून अटक
टूलकिट प्रकरणः दिशा रवी यांना अटक

भाजपचे साडे तीन शहाणे हे लवकरच तुरुंगात असतील त्यांची नावे लवकरच समजतील अशी एक विलक्षण आणि अचूक राजकीय खेळी करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मरगळलेल्या शिवसैनिकांमध्ये पुन्हा जान फुंकली. एकाच दगडात भाजप, किरीट सोमय्या आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर लक्ष्य भेद करत आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा अजेंडा लोकांसमोर विशेषतः मराठी लोकांसमोर ठेवला. हे ठेवताना राऊत यांनी चलाखीने मुंबईतील भाजपचा चेहरा हा किरीट सौमय्या असल्याचे सांगत आशिष शेलार यांच्यासह अतुल भातखळकर यांनाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

राज्यात गेली काही महिने महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांच्या घरी ईडीच्या धाडी पडण्याचे सत्र सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेले हे सरकार साम-दाम-भेद-दंड या कूट नीतीचा अवलंब करून पाडायचे या हेतूने केंद्रीय तपास यंत्रणेला हाताशी धरून भाजप ही खेळी करत असल्याचा आरोप शिवसेनेसह राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या घटक पक्षाच्या नेत्यांनी वारंवार केला आहे. अमुक तारखेला सरकार पडणार अशी आवई उठवत अस्थिरता माजविण्याचा प्रयत्नही सुरू आहे. संजय राऊत यांच्या बरोबर त्यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवारावर ईडीने चौकशीचा ससेमिरा गेल्या काही दिवसात लावला होता. राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा तपास ईडी अधिकाऱ्यांनी केला. एकीकडे हे सुरू असतानाच किरीट सोमय्या यांनी थेट ठाकरे कुटुंबियांना शिंगावर घेत त्यांच्यावर गैर व्यवहाराचे आरोप करण्याचा सिलसिला सुरू केला. येनकेन प्रकारे शिवसेनेला डिवचले तर कार्यकर्ते राज्यात राडा घालतील आणि मग कायदा व सुव्यवस्था प्रश्न उपस्थित करत राष्ट्रपती राजवटीची शिफारस करता येईल असा सुप्त हेतू या मागे आहे. पण उद्धव ठाकरे यांनी संयमाने स्थिती हाताळत भाजपच्या या मनसुब्याला कसलाही प्रतिसाद दिला नाही.

संजय राऊत यांना तपास यंत्रणेचा धाक दाखवत सरकार पाडण्यासाठी दबाव केला जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. नेमकी हीच वेळ साधत राऊत यांनी थेट ईडी व तपास यंत्रणा तसेच भाजपवर हल्लाबोल करत ललकारले आहे. अचूक राजकीय वेळ साधणे ही कला साधत राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या बाजूने वातावरण निर्माण करताना मराठी अस्मितेला हात घातला. किरीट सौमय्या आणि त्यांचा मुलगा नील यांच्यावर पीएमसी घोटाळा मधील पैसा वापरल्याचा थेट आरोप करतानाच सौमय्या यांनीच मुंबईत मराठी भाषा सक्तीची करू नये म्हणून न्यायालयात धाव घेतली होती असे सांगत मराठी कार्ड खेळले. त्याच बरोबर महापालिका निवडणुकीत भाजपचा चेहरा हा किरीट सौमय्या हाच असल्याचे मुद्दाम ठसवून देत मराठी प्रेमींना शिवसेनेकडे वळविण्याचा राऊत यांचा उद्देश होता. भाजपच्या आशिष शेलार यांचे महत्त्व पक्षात कसे कमी आहे हेही दाखवून देण्यात राऊत यांनी राजकीय चाणाक्षपणा दाखवला आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना आणि शिवसैनिक कधीही कोणासमोर झुकले नाहीत की झुकणार नाहीत असे सांगून राऊत यांनी शिवसैनिकांमध्ये अंगार चेतवण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना त्यांनी शिवसेनेच्या मूळ स्वभाव धर्माला सुद्धा हात घातला.

ईडीचे अधिकारी कसे वागतात तसेच नवलानी नावाचा इसम हा ईडीच्या नावाने मुंबईत असलेल्या बिल्डरांना धमकी देत खंडणी गोळा करत असल्याचा सनसनाटी आरोप करत राऊत यांनी थेट ईडीला संशयाच्या जाळ्यात उभे केले आहे. हे करताना राऊत यांनी या तपास यंत्रणेचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

मोहित कंबोज या व्यक्तीचा खास उल्लेख करत तो देवेंद्र फडणवीस यांचा ब्ल्यू आईड आय असल्याचे नमूद करत राऊत यांनी त्याला पीएमसी बँक घोटाळ्यात सहभागी असल्याचे स्पष्ट केले. फडणवीस यांचा उल्लेख करत हा कंबोज त्यांना एक दिवस डुबवेल असे सांगताना फडणवीस यांच्या भोवती संशयाचे जाळे उभे करण्यात राऊत यांनी संधी दवडली नाही. भाजप अंतर्गत दुफळी माजविण्याचा हा त्यांचा प्रयत्न होता हे यातून स्पष्ट होते. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या विवाहाचा वारेमाप खर्चाचा उल्लेख करत राऊत यांनी फडणवीस गटाला चुचकारण्याचा अल्प प्रयत्न केला.

राऊत यांच्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण रोख हा किरीट सौमय्या यांच्या वर असला तरी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून असंख्य गोळ्या त्यांनी झाडल्या आहेत. साडेतीन शहाणे कोण हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले असले तरी याच साडेतीन शहाण्याचा खुबीने वापर करत राऊत यांनी शिवसेनेच्या आगामी वाटचालीची आणि मुंबईवर पुन्हा सत्ता स्थापन करण्याची वाट आपसूक तयार करून ठेवली आहे.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0