चकवा देणारा नोबेल

चकवा देणारा नोबेल

गेल्या अनेक वर्षांत नोबेल पुरस्कार विजेत्यांबाबत व्यक्त होणारे अंदाज आणि पुरस्कार विजेत्यांची यादी पाहिली तर, स्वीडिश समिती चकवे देण्यात निपुण आहे असे दिसते. यावर्षी तर त्यांनी दोन चकवे देऊन जगभरच्या वाचकांना चकित केले आहे.

केजरीवाल यांचा पारंपरिक सिद्धांतांना छेद
धर्म बदलला तरी जात बदलत नाहीः मद्रास हायकोर्ट
डॉ. कफील खान अखेर राज्य सेवेतून बडतर्फ

गुरुवारी १० ऑक्टोबरला साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे स्वीडिश अकॅडमीने जाहीर केली. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी पुरस्कारांच्या घोषणेआधी संभाव्य विजेत्यांबाबत अंदाज बांधले जात होते. त्यात प्रसिद्ध जपानी लेखक हारुकी मुराकामी यांचे नांव आघाडीवर होते. जगभर विखुरलेल्या मुराकामीच्या चाहत्यांना यावर्षीचा नोबेल पुरस्कार मुराकामीलाच मिळेल अशी आशा होती. केवळ याचवर्षी नव्हे तर मागील काही वर्षांपासून मुराकामीचे नांव नोबेलसाठी सर्वाधिक चर्चेत आहे. आणि प्रत्येक वर्षी मुराकामीला नोबेल मिळण्याची चाहत्यांना जेवढी अधिक संभावना वाटते तेवढा नोबेल मुराकामीपासून दूर जाताना दिसत आहे.

वस्तुतः खुद्द मुराकामीने दोन वर्षांपूर्वीच नोबेलसह साऱ्या पुरस्कारांच्या स्पर्धेतून स्वतःला अलग केले आहे अशी घोषणा केली होती. त्याच्या चाहत्यांनी मात्र अजूनही मुराकामीला पुरस्कार मिळण्याची आशा सोडलेली नाही. २०१७ सालचा नोबेल काझुओ ईशीगुरो या लेखकाला मिळाला. तो निर्णय योग्यच होता. मात्र तेव्हाही ईशीगुरोला पुरस्कार मिळू शकतो तर मुराकामीला का नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. एखाद्या रॉकस्टारला मिळावी अशी त्याची लोकप्रियता तर नोबेल पुरस्काराच्या आड येत नाही ना? अशीही शंका त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली.

अर्थात केवळ नोबेल पुरस्कारानेच लेखकाचे श्रेष्ठत्व सिद्ध होते असे नाही. विसाव्या शतकातील अनेक थोर लेखक फ्रान्झ काफ्का, होर्हे लुई बोर्हेस, जेम्स जॉईस या दिग्गज आणि प्रतिभावंतांना नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. मात्र लेखक म्हणून त्यांचे श्रेष्ठत्व आज विश्वमान्य आहे. फ्रान्झ काफ्काला तर लेखकांचा लेखक असे म्हटले जाते. समकालीन लेखकांतही अर्नेस्तो कार्देनाल, इझाबेल अलेंदे, कॉरमॅक मकार्थी, नगुगी वा थिओंग असे लेखक आहेत ज्यांना अजून नोबेल पुरस्कार मिळालेला नाही. ज्याँ पॉल सार्त्रने तर नोबेल पुरस्कारासाठी त्याच्या नावाचा विचार सुरू आहे असे समजताच आपल्या नावाचा विचार पुरस्कारासाठी करू नये. मी तो पुरस्कार स्वीकारणार नाही असे पत्र समितीला लिहिले होते. मात्र तत्कालीन वाहतूक व्यवस्थेत ते पत्र समितीपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला आणि तोवर सार्त्रच्या नावाची घोषणा नोबेलसाठी झालेली होती. नंतर अर्थातच त्याने पुरस्कार नाकारला. पुरस्कार नाकारण्यामागील त्याची धारणाही त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केली आहेत. आपल्याकडे भालचंद्र नेमाडेंनी तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळेल असे वाटते का या प्रश्नाचे उत्तर देताना, त्यांनी नोबेल पुरस्कार मिळवण्यापेक्षा, पुरस्कार न मिळालेल्या श्रेष्ठ लेखकांच्या पंक्तीत बसायला आवडेल असे म्हटले आहे.

गेल्या अनेक वर्षांत नोबेल पुरस्कार विजेत्यांबाबत व्यक्त होणारे अंदाज आणि पुरस्कार विजेत्यांची यादी पाहिली तर, स्वीडिश समिती चकवे देण्यात निपुण आहे असे दिसते. यावर्षी तर त्यांनी दोन चकवे देऊन जगभरच्या वाचकांना चकित केले आहे. यावर्षी पुरस्कारासाठी एकूण दोघांची निवड समितीने केली आहे. २०१८सालच्या साहित्यासाठी नोबेल पुरस्काराची घोषणा केली गेली नव्हती. त्यामुळे यावर्षी २०१८ आणि २०१९ या दोन्ही वर्षांच्या पुरस्काराची घोषणा १० ऑक्टोबरला करण्यात आली. २०१८सालचा पुरस्कार ओल्गा तोकारझुक या पोलिश लेखिकेला जाहीर झाला. लेखनाबरोबरच चळवळीत सक्रिय असणाऱ्या बुद्धिवंत अशी त्यांची ओळख आहे. तर २०१९सालच्या पुरस्कारासाठी पीटर हँडके या ऑस्ट्रियन लेखकाची घोषणा करण्यात आली.

नोबेल पुरस्कार जाहीर केल्यानंतर त्यावर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. एकाचवेळी ओल्गा तोकारझुक यांच्या निवडीने लेखक/ वाचकांनी आनंदाच्या प्रतिक्रिया दिल्या तर पीटर हँडके यांच्या निवडीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ओल्गा तोकारझुक यांनी मागील तीन दशकांत लेखक म्हणून पोलंडमध्ये आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या दोन कादंबऱ्या इंग्रजी भाषेतही प्रसिद्ध झाल्या होत्या. अनेक बेस्ट सेलर पुस्तकांच्या लेखिका असणाऱ्या ओल्गा तोकारझुक पोलिश भाषेतील उत्तुंग प्रतिभेच्या लेखिका आहेत. अद्भुत आणि वास्तव यांची सरमिसळ करून विलक्षण ताकदीची संहिता निर्माण करण्याची त्यांची शैली जगभर वाखाणली जाते. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती २०१८साली मिळालेल्या बुकर पुरस्काराने. २००७ साली आलेल्या ‘फ्लाइट्स’ (Flights) या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. बुकर मिळाल्यानंतर, “मला कधीकधी वाटतं, माझी पुस्तकं याआधीच इंग्रजीत भाषांतरीत झाली असती तर, माझं आयुष्य एका वेगळ्याच वाटेने गेलं असतं. कारण इंग्लिश ही जगभर बोलली जाणारी भाषा आहे आणि एखादं पुस्तक जेव्हा इंग्रजी भाषेत प्रकाशित होतं तेव्हा ती वैश्विक घटना ठरते,’ अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ओल्गा लेखिका असण्याबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या आहेत. २०१५ साली मुक्त आणि सहिष्णू पोलंड ही एक दंतकथा आहे असं त्यांनी सरकारला बजावलं होतं. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. मात्र या गोष्टीने डगमगून न जाता आपलं लिखाण आणि सामाजिक कार्य त्या पुढे नेत आहेत. नोबेल पुरस्कारासाठी त्यांची निवड होणं सर्वथा योग्य असल्यानं सर्व स्तरावरून त्यांच्या निवडीचं स्वागतच होत आहे.

पीटर हँडके यांच्या निवडीवर तीव्र नापसंती व्यक्त करतानाच त्यांच्या साहित्यावर आणि साहित्यिक कर्तृत्वावर कुणीही आक्षेप घेतले नाहीत. मात्र स्रेबेनिया इथं घडलेल्या हत्याकांडाबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उभे करण्यात आले. स्लोवेनियन वंशाचे पीटर हँडके कट्टर राष्ट्रवादी समजले जातात. स्रेबेनिया येथे घडलेल्या मुस्लिम हत्याकांडासाठी स्वतः मुस्लिम समुदायच जबाबदार आहे. त्यांनी स्वतःच हे हत्याकांड घडवून आणले आहे आणि त्याचा दोष मात्र सर्ब लोकांना दिला असे खुलेपणाने म्हटले होते. त्यावर मोठाच वाद उफाळून आला होता. त्यानंतर सलमान रश्दीनी हँडके यांना ‘या वर्षीचा जागतिक मूर्ख’ असे संबोधले होते. आता २० वर्षांनंतर पीटर हँडके यांच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर रश्दीनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, “मला यावर काही बोलायचे नाही. मात्र मागे केलेल्या वक्त्यव्यावर मी कायम आहे.’

लेखकाचे साहित्यिक कर्तृत्व मोठे असले तरी, त्याची व्यक्ती म्हणून राजकीय/ सामाजिक भूमिका दूषित असेल तर ती नजरेआड करायची का? असा पेच त्यातून उभा राहिल्याचे दिसले. लेखक कवीने कलावंत आणि व्यक्ती म्हणून स्वतःची फारकत करून घेणे म्हणजे अटळपणे आत्महत्या करणे असे एका प्रसिद्ध रशियन कवीने म्हटले आहे. गेल्या वर्षी पुरस्कार जाहीर न करण्यामागेही अशाच प्रकारचे कारण घडले होते. मात्र आता नोबेल समितीला चूक टाळता आली असती असा सूर जगभरच्या बुद्धिजीवी वर्गातून उमटत होता.

पीटर हँडके यांच्या निवडीचा निषेध करतानाच जगभरच्या बुद्धिजीवींनी नोबेल समितीने दुहेरी फसवणूक केली आहे अशी टीका केली. काही दिवसांपूर्वीच नोबेल समितीने यापुढे युरोपकेंद्रीत उमेदवारांसाठी आग्रही राहणार नसल्याचे आणि अधिकाधिक महिलांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. मात्र दोन्ही बाबतीत समितीने फसवणूक केली अशी टीका समितीवर केली आहे. यावर्षीच्या विजेत्यांमध्ये दोन युरोपिअन विजेत्यांचा समावेश आहे तर मागील १२० वर्षात नोबेल पुरस्कार पुरस्कार मिळवणाऱ्या ओल्गा तूकरझुक या केवळ १५व्या महिला आहेत. काही दिवसांपूर्वीच नोबेल समितीने दिलेली दोन्ही वचने न पाळून फसवणूक केली आहे अशी टीका नोबेल समितीवर होत आहे.

स्वीडिश अकॅडमीने मात्र पीटर हँडके यांची पाठराखण करत, त्यांच्या निवडीवर कायम असून फेरविचार करणार नसल्याचे सांगितले आहे. पीटर हँडके यांनी काही वादग्रस्त विधाने केली आहेत मात्र हत्याकांडाचे समर्थन केलेले नाही आणि त्याला पाठिंबाही दिलेला नाही. तसेच पीटर हँडके यांच्या लिखाणात मानवी हक्कांबद्दल असमानता आणि समाजाबद्दल जाणीवपूर्वक घृणा पसरविणारे घटक आढळून आले नसल्याचेही स्वीडिश अकॅडमीने म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0