सैयद गिलानी हुर्रियतमधून बाहेर

सैयद गिलानी हुर्रियतमधून बाहेर

नवी दिल्लीः जम्मू व काश्मीरमधील फुटीरतावादी संघटना हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख नेते सैयद अली शाह गिलानी यांनी सोमवारी ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून ते काश्मीरात नजरबंद आहेत.

९० वर्षांच्या गिलानी यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भात एक व्हीडिओ संदेश कार्यकर्त्यांना पाठवला असून त्यात त्यांनी हुर्रियतपासून आपण पूर्णतः बाजूला होत असल्याचे स्पष्ट केले आहे. गिलानी यांनी आपल्या राजीनाम्यामागची अनेक कारणेही लिखित स्वरुपात संघटनेला पाठवलेली आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमधील हुर्रियत कॉन्फरन्समधील काही सदस्य पाकिस्तानच्या सत्तेच्या जवळ जात असून एक समांतर राजकीय हालचाली पाकव्याप्त काश्मीरमधील हुर्रियतमध्ये सुरू झाल्या आहेत. संघटनेत असहकाराची भावना निर्माण होत आहे, शिस्तभंग होत आहे. अशा परिस्थितीत सर्व वास्तव लक्षात घेऊन संघटनेच्या कोणत्याही कारभारापासून आपण स्वतःला दूर ठेवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या पत्रात गिलानी यांनी, जम्मू व काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेश करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाविरोधात हुर्रियतच्या नेत्यांनी निष्क्रियता दाखवली, असाही आरोप केला आहे. आपल्या सहकार्यांनी त्यांना योग्य तो, पटेल तो निर्णय घ्यावा. माझी प्रकृती वयोमानाने कमजोर होत चालली आहे पण स्वतंत्र काश्मीरसंदर्भातील माझी प्रेरणा अखंड जागृत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत भारतीय साम्राज्यवादाशी मी लढत राहीन असेही त्यांनी म्हटले आहे.

गिलानी हे हुर्रियत कॉन्फरन्सचे आजीवन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पण २०१० पासून अनेक काळ ते नजरबंद आहेत.

२००३मध्ये काश्मीरमधील घटक दलांनी गिलानी यांच्याकडे हुर्रियतचे नेतृत्व दिले होते. गिलानी हा संघटनेचा आक्रमक, कट्टरवादी चेहरा होता. नंतर हुर्रियतने मौलवी मीरवाईज उमर फारुक हा मवाळ चेहरा पुढे आणला.

COMMENTS