डेमॉन गॅलगट यांच्या ‘द प्रॉमिस’ला बूकर पारितोषिक

डेमॉन गॅलगट यांच्या ‘द प्रॉमिस’ला बूकर पारितोषिक

दक्षिण आफ्रिकी लेखक डेमॉन गॅलगट यांनी ‘द प्रॉमिस’ या कादंबरीसाठी बूकर पारितोषिक प्राप्त केले आहे. यापूर्वीही बूकरच्या लघुयादीत स्थान प्राप्त केलेले रिचर्ड पॉवर्स यांच्यासह कसदार प्रतिस्पर्ध्यांमधून गॅलगट यांची या पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. ५०,००० पाउंड्स (५८,७५० युरोज) असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. गॅलगट यांनी वयाच्या १७व्या वर्षी पहिली कादंबरी लिहिली आणि २०१५ मध्ये आर्क्टिक समर या त्यांच्या आठव्या पुस्तकासाठी त्यांना संडे टाइम्स फिक्शन पारितोषिक प्राप्त झाले.

“हे पारितोषिक प्राप्त झाल्यामुळे मी चकीत झालो आहे. येथवर पोहोचण्यासाठी दीर्घ प्रवास केला आहे आणि तरीही येथे पोहोचण्यास मी पात्र नाही असे मला वाटते,” अशी नम्र प्रतिक्रिया गॅलगट यांनी व्यक्त केली. त्यांनी हे पारितोषिक आफ्रिकेतील सर्व साहित्यिकांना अर्पण केले. “आमच्या विस्मयकारी खंडातून सांगितल्या गेलेल्या सगळ्या कहाण्यांच्या वतीने मी हे पारितोषिक स्वीकारतो,” असे ते म्हणाले.

गॅलगट यांच्या नवीन कादंबरीत दक्षिण आफ्रिकेतील एका श्वेतवर्णीय शेतकरी कुटुंबाची चार दशकांत घडणारी गोष्ट सांगितली आहे. समुदायात झालेल्या एका मृत्यूमुळे या कथेमध्ये अनेक वळणे येतात. संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबासाठी काम करणाऱ्या एका कृष्णवर्णीय स्त्रीला आपल्या मालमत्तेतील एक घर देण्याचा वायदा (प्रॉमिस) घरातील कर्ती स्त्री मृत्यूपूर्वी मागते. मात्र, आईची ही इच्छा पूर्ण करायची की नाही यावरून मुलांमध्ये संघर्ष निर्माण होतो. वर्णभेद नाहीसा झाल्यासारखा वाटत असला तरी तो अद्याप आहे हा या कथेचा पाया आहे, असे गॅलगट यांनी यापूर्वी सांगितले होते.

गतकाळाचा वारसा’

बीबीसीच्या लंडनमधील रेडिओ थिएटरमध्ये झालेल्या सोहळ्यात बूकर पारितोषिकाच्या परीक्षक मंडळाच्या अध्यक्ष (चेअर ऑफ द बूकर प्राइझ जजेस) इतिहासकार माया जॅसनॉफ म्हणाल्या की, अंतिम यादीत निवडलेल्या सर्व सहा कादंबऱ्यांमध्ये “नवोन्मेषाची जाणीव” आहे आणि त्या सगळ्या “चौकटी मोडणाऱ्या” आहेत. या कादंबऱ्यांमध्ये वर्तमानाचे भान आहे आणि गतकाळाच्या वारशाशीही त्या संवाद राखून आहेत.”

“गॅलगट यांची द प्रॉमिस ही कादंबरी  ‘असामान्य कथा, समृद्ध विषयवस्तू, दक्षिण आफ्रिकेचा गेल्या ४० वर्षांतील इतिहास’ या सगळ्याचा मिलाफ साधते,” असे त्या म्हणाल्या.

या समारंभात, २०२० मध्ये, ‘शगी बेन’साठी  बूकर पारितोषिक प्राप्त करणारे डग्लस स्टुअर्ट आणि डचेस ऑफ कॉर्नवॉलशी यांच्यात संभाषणही झाले. दरवर्षी होणारे हे संभाषण कोविड साथीमुळे नियोजित वेळी होऊ शकले नव्हते. १९९१ साली म्हणजेच तीस वर्षांपूर्वी बूकर प्राप्त करणारे नायजेरियन कवी व कादंबरीकार बेन ओक्री यांची बीबीसीच्या समिरा अहमद यांनी मुलाखत घेतली. या पारितोषिकामुळे आपले आयुष्य कसे बदलले हे ओक्री यांनी सांगितले.

बूकर पारितोषिकाच्या अंतिम यादीतील अन्य पाच लेखकांची माहिती पुढीलप्रमाणे:

पॅट्रिशिया लॉकवूड

पॅट्रिशिया लॉकवूड

१. पॅट्रिशिया लॉकवूड या अमेरिकेतील कवयित्री व लेखिकेचा ‘नो वन इज टॉकिंग अबाउट थिस’ या पुस्तकासाठी प्रथमच बूकर लघुयादीत समावेश करण्यात आला. लॉकवूड यांच्या कादंबरीत इंटरनेट युगातील अनोखे नाट्य चितारलेले आहे.

नदीफा मोहामेद

नदीफा मोहामेद

२. नदीफा मोहामेद बूकर पारितोषिकाच्या लघुयादीत स्थान मिळवणाऱ्या पहिल्या

ब्रिटिश सोमाली कादंबरीकार ठरल्या आहेत. द फॉर्च्युन मेन या त्यांच्या तिसऱ्या कादंबरीसाठी त्यांचा बूकर लघुयादीत समावेश करण्यात आला होता. १९५२ मध्ये खुनाच्या प्रकरणात गोवल्या गेलेल्या व फाशीची शिक्षा झालेल्या मेहमूद मट्टन या पित्याची काल्पनिक कथा यात आहे.

रिचर्ड पॉवर्स

रिचर्ड पॉवर्स

३. अमेरिकी लेखक रिचर्ड पॉवर्स यांची बूकर लघुयादीत स्थान मिळवण्याची ही दुसरी वेळ होती. १३ कादंबऱ्या नावावर जमा असलेल्या पॉवर्स यांचा बेविल्डरमेंट या कादंबरीसाठी लघुयादीत समावेश करण्यात आला होता. यापूर्वी २०१८ मध्ये त्यांच्या द ओव्हरस्टोरी या कादंबरीला पुलित्झर पुरस्कार प्राप्त झाला होता. बिविल्डरमेंट ही शास्त्रज्ञ वडील आणि त्यांच्या लाडक्या मुलाची कथा आहे.

अनुक अरुदप्रगासम

अनुक अरुदप्रगासम

४. श्रीलंकन तमिळी लेखक अनुक अरुदप्रगासम यांना त्यांच्या ए पॅसेज नॉर्थ या दुसऱ्या कादंबरीसाठी बूकर लघुयादीत स्थान प्राप्त झाले होते. ए पॅसेज नॉर्थ ही कथा श्रीलंकेतील ३० वर्षे चाललेल्या नागरी युद्धातील विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर घडते.

मॅगी शिपस्टेड

मॅगी शिपस्टेड

५. अमेरिकी कादंबरीकार मॅगी शिपस्टेड यांना ग्रेट सर्कल या कादंबरीसाठी बूकर लघुयादीत स्थान मिळाले होते. त्यांची २०१२ मध्ये प्रसिद्ध झालेली पहिली कादंबरी सीटिंग अरेंजमेंट्स खूपच नावाजली गेली होती व गाजलीही होती. ग्रेट सर्कल या कादंबरीत एक आद्य स्त्री वैमानिक व अनेक वर्षांनंतर तिची भूमिका पडद्यावर साकारणारी अभिनेत्री यांच्या आयुष्यांतील छेदांचा वेध घेण्यात आला आहे.

COMMENTS