टोनी मॉरिसन : वेदनेचं महाकाव्य लिहिणारी लेखिका

टोनी मॉरिसन : वेदनेचं महाकाव्य लिहिणारी लेखिका

टोनी मॉरिसन यांचे ग्रंथ ज्या भाषेत पोहचले, त्या साऱ्या भाषेतील वाचकांनी, मॉरिसन जणू आपल्या स्वत:च्या भाषेत लिखाण करत असाव्यात इतक्या सहजपणे त्यांना स्वीकारलं. त्यांना प्राप्त झालेला १९९३ सालचा नोबेल पुरस्कार हे त्यांच्या सर्वदूर पसरण्याचं आणखी एक कारण. नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत. ‘बिलव्हेड’ या त्यांच्या बहुचर्चित कादंबरीला मराठी वाचकांनीही आपलेसे केले आहे.

‘एनआरसी’सारखी ट्रम्प यांची योजना रद्द
२२ हजार भारतीयांचे अमेरिकेकडे शरणागतीचे अर्ज
प्लीज – माझा श्वास कोंडतोय..

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काश्मीरमधून ३७० कलम आणि ३५अ कलम हटविल्याच्या बातम्या आणि पश्चिम महाराष्ट्रातून महापुराने घातलेल्या थैमानाच्या बातम्या चहूबाजूंनी येऊन आदळत असतानाच, आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक अस्वस्थ करणारी बातमी आली. या घटनेने जगभरचे अनेक साहित्यिक आणि साहित्यप्रेमी हळहळले. ‘टोनी मॉरिसन’ या प्रसिद्ध अमेरिकन लेखिका कालवश झाल्याची ती बातमी होती. टोनी मॉरिसन यांनी सारं लिखाण इंग्रजीतून केलं असलं तरी, भाषांतराच्या माध्यमातून त्यांचे ग्रंथ जगभरच्या अनेक भाषांत पोहचले आहेत.

टोनी मॉरिसन यांचे ग्रंथ ज्या भाषेत पोहचले, त्या साऱ्या भाषेतील वाचकांनी, मॉरिसन जणू आपल्या स्वत:च्या भाषेत लिखाण करत असाव्यात इतक्या सहजपणे त्यांना स्वीकारलं. त्यांना प्राप्त झालेला १९९३ सालचा नोबेल पुरस्कार हे त्यांच्या सर्वदूर पसरण्याचं आणखी एक कारण. नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेल्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला होत. ‘बिलव्हेड’ या त्यांच्या बहुचर्चित कादंबरीला मराठी वाचकांनीही आपलेसे केले आहे. दलित साहित्यामधून, वंचित समूहांच्या वेदनेचा पल्ला जाणून असणाऱ्या मराठी वाचकांना ‘टोनी मॉरिसन’ यांचं लिखाण अत्यंत प्रभावी आणि समानधर्मी वाटलं नसल्यास नवल. त्यांना नोबेल पुरस्कार प्रदान करताना नोबेल कमिटीने म्हटले, “आपल्या कादंबऱ्यांमधून दूरदृष्टी आणि काव्यमय लेखणीच्या साहाय्याने त्यांनी अमेरिकन जीवनातील वास्तवाच्या एका महत्त्वाच्या पैलूला जिवंत केले.”

नोबेल पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात मॉरिसन यांनी आपल्या जीवनातील भाषेचं महत्त्वाचं स्थान उलगडून दाखविलं आहे. त्या म्हणतात, “आपलं मरण अटळ आहे. कदाचित हाच आयुष्याचा अर्थ असेल. पण आपण भाषेची निर्मिती करतो. आपल्या जीवनाचं मूल्यमापन त्यावरून ठरत असतं.” भाषेचं सामर्थ्य टोनी मॉरिसन किती स्पष्टपणे जाणत होत्या हेच यावरून सिद्ध होतं.

‘टोनी मॉरिसन’ या अशा मोजक्या लेखकांपैकी एक होत्या, ज्यांचं लिखाण साहित्य समीक्षक आणि सामान्य वाचक यांच्याकडून सारख्या प्रेमानं स्वीकारलं गेलं. भूत आणि वर्तमानकाळात सतत हेलकावणाऱ्या त्यांच्या कादंबऱ्यातील स्वप्नवत कथानक, अनेकरेषीय आणि काळाची सरमिसळ असलेलं असं आहे. बहुपेढी आणि प्रसंगी क्लिष्ट होत जाणाऱ्या त्यांच्या निवेदनात नायकासह अनेक पात्रांच्या, भूताखेतांच्या, जनावरांच्या आवाजांची सरमिसळ होऊन एक सामुहिक कोरस त्या निर्माण करतात. त्यामुळे वास्तव आणि अतिवास्तव यांच्यामधील सीमारेषा पुसट करत एक स्वप्नवत सृष्टी त्या वाचकांच्या दृष्टीसमोर उभे करतात.

टोनी मॉरिसन यांच्या नावावर अनेक कादंबऱ्या आणि ग्रंथ जमा असले तरी, त्यांना मुख्यत: ओळखलं जातं ते, ‘बिलव्हेड’ या श्रेष्ठ कादंबरीच्या निर्मात्या म्हणून. अमेरिकन यादवी युद्धानंतरच्या दशकभराचा वृत्तांत कथन करणारी ही कादंबरी एकोणीसाव्या शतकातील एका सत्य घटनेवर आधारित आहे. अनेक पात्रं, घटना बआणि शहरं यांना सामावून घेणाऱ्या या कादंबरीची ‘सीदी’ ही कृष्णवर्णीय स्त्री नायिका आहे. सीदी ‘केंटकी’ इथं मळ्यावर काम करणारी गुलाम आहे. तिच्या सभोवतालच्या साऱ्याच कृष्णवर्णीयांसारखंच तिलाही लहानपणीच गोऱ्यांना विकण्यात आलं आहे. ‘गार्नर’ कुटुंबियांचं ‘स्वीट होम’ हेच आता तिचं कायमचं घर झालं आहे. तिथेच तिचं ‘हॉल’सोबत लग्न झालं आहे आणि ‘स्वीट होम’मध्येच तिला तीन मुलंही झाली आहेत. ‘स्वीट होम’मध्ये ती गुलामच असली तरी तिच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या घटना तिथेच घडल्या आहेत. मालक गार्नरकडून तिला चांगली वागणूक मिळाली आहे. तिथे तिला मर्यादित असं स्वातंत्र्यही आहे. त्यामुळे कितीही कष्टप्रद जीवन जगावं लागत असलं तरी सीदीला ‘स्वीट होम’ विषयी ममत्व आहे.

पण गार्नर साहेबांच्या अचानक मृत्यूनंतर शेतावर आलेल्या जुलमी शाळा मास्तरला तोंड देण्याचं सामर्थ्य ना तिच्यात आहे, ना तिचा नवरा हॉलमध्ये आहे, ना शेतावर काम करणाऱ्या अन्य गुलामांत आहे. ‘स्वीट होम’मधील अन्य गुलामांसारखेच तिच्याही मनात आता पळून जाण्याचे विचार येऊ लागले आहेत. स्वातंत्र्याच्या आकांक्षेने तिच्या मनात आपले पंख हळूहळू पसरवायला सुरवात केली आहे. हॉलने इतर गुलाम साथींच्या मदतीने पलायनाचा बेत आखला आहे; मात्र शाळा मास्तरला त्यांच्या योजनेचा सुगावा लागतो. हॉल पळून जाऊ नये म्हणून शाळा मास्तर त्याला गोळी घालतो. सीदीला हॉलची ठाऊक असलेली ही शेवटची गोष्ट. त्यानंतर हॉलचं काय झालं? तो पळून गेला की तिथेच राहिला? तो जिवंत तरी आहे काय? सीदीला काही ठाऊक नाही. पुढच्या आयुष्यात सीदीला ते समजतही नाही.

सीदी मुलांना घेऊन सुटायच्या प्रयत्नात असतानाच शाळा मास्तरचा पुतण्या आणि त्याचे साथी सीदीला पकडतात. तिच्यावर पाशवी बलात्कार करतात. सीदी त्यातूनही सुटून जीवाच्या आकांताने पळू लागते. पण स्वातंत्र्याकडे घेऊन जाणारी वाट सीदीसाठी फार यातना देणारी आहे. सीदी गर्भवती आहे. पोटात वाढणारं बाळ घेऊन स्वातंत्र्याची दीर्घ वाट तिला पार करायची आहे. तब्बल २८ दिवस सीदी त्या वाटेवरून चालत राहते. चंद्राच्या कलेचं एक वर्तुळ पूर्ण करायला लागणारा हा काळ सीदीला गर्भार पोट, सोबत लहानगी लेकरं घेऊन मागावर येणाऱ्या गोऱ्यांना चुकवत, पळून आलेल्या गुलामांना पकडून देणारे गोरे हंटर यांना हुलकावण्या देत काढायचा आहे. सीदी तिच्या दोन मुलांना आणि दोन वर्षांच्या रांगत्या लेकीला पुढे पाठवते. आधीच गर्भारपणामुळे तिचा वेग फार मंदावला आहे. तिचे दिवस भरत आले आहेत. अपार वेदनांनी कळवळत सीदी रस्त्याच्या कडेला पडली आहे. पुढं पाउल टाकण्याचं त्राणही तिच्या अंगात उरलेलं नाही. अशा परिस्थितीत एका भटक्या गोऱ्या मुलीनं तिची प्रसूती केली. ‘एमी डेन्व्हर’ तिचं नांव. एमी सीदीच्या मदतीला देवदूतासारखी आली आहे. सीदी तिच्या नवजात मुलीचं नांव एमीच्या नावावरून डेन्व्हर असंच ठेवते.

सीदीचा हा २८ दिवसांचा प्रवासही एका महाकादंबरीचा विषय आहे. ‘बिलव्हेड’ हृदय पिळवटणाऱ्या अशा अनेक कथांना पोटात घेणारी कादंबरी आहे. नवजात डेन्व्हरला घेऊन सीदी तिच्या सासूच्या घरी जाऊन पोहोचली आहे. पण दुर्दैवाने तिची पाठ सोडलेली नाही. काही दिवसांनी गोरे तिच्या दारात सैतानासारखे येऊन उभे ठाकतात. सीदीला धडकी भरते. भूतकाळच्या जखमांतून आताशा कुठे सावरू पाहत असलेली सीदी पुन्हा गुलामीच्या कल्पनेनेच हादरून जाते. ज्या गोऱ्यांनी तिची सारी स्वप्नं धुळीला मिळविली. तिचं हृदय तोडून मोडून टाकलं. त्या अभद्र गोऱ्यांची पुन्हा गुलामी करायची, स्वत: गुलाम बनून जगायचं, लेकरांना गुलामीत ढकलायचं ही कल्पनाच सीदीला सहन होत नाही. तिचं गत आयुष्य झरकन तिच्या नजरेसमोर उभं राहतं. जीवघेणे कष्ट, उपासमार, मानहानी, चाबकाच्या फटक्यांनी सोलून निघालेली पाठ, पाशवी बलात्कार, वेदनांच्या किती तऱ्हा सीदीने भोगल्या. अखंड वेदनेचे एक राक्षसी चक्र सीदीने पुरं केलं होतं. त्याच चक्रात लहानग्या लेकराला ढकलायचं? सीदी जीवाचा आकांत करून घेते. सीदीचं शरीर, तिचं मन, तिचा आत्मा जीवघेण्या वेदनांनी पिळवटून निघतो. सीदी दोन वर्षांच्या रांगत्या लेकीला मांडीवर घेते आणि तिच्या मानेवरून करवत फिरवते. अविरत चालू पाहणाऱ्या एका दुष्टचक्राला थांबवू पाहते. जीवाच्या आकांताने ओरडते.

सीदीच्या हातातील तीच करवत ‘टोनी मॉरिसन’ वाचकांच्या काळजावरून फिरवतात. वाचकाचं भावविश्व विद्ध करतात. एक अखंड माणूस हजार तुकड्यात विखरून टाकतात. न्याय म्हणजे काय? अन्याय म्हणजे काय? नैतिक/ अनैतिक म्हणजे काय? गुन्हा घडतो म्हणजे काय होते? पाप-पुण्य म्हणजे काय? सीदीने तिच्या लेकीची हत्या केली की एका दुष्टचक्रातून तिला सोडवलं? जीवघेण्या प्रश्नांची एक मालिकाच ‘टोनी मॉरिसन’ वाचकासमोर उभं करतात. वाचकाच्या माणूसपणाला आवाहन करतात आणि त्या प्रश्नांतूनच त्याला सावरायला अवकाश उपलब्ध करून  देतात. ‘टोनी मॉरिसन’ यांचं सारंच लिखाण वेदनेचं महाकाव्य साक्षात उभं करणारं आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0