डोनल्ड ट्रंप यांना निवडून येण्यासाठी भारतीय मतांची आवश्यकता आहे. ३०४ इलेक्टोरल मत देणारं टेक्सर राज्य पदरात पाडणं ट्रंपना आवश्यक आहे. टेक्ससमधे २.७ लाख भारतीय मतं आपल्या खिशात पडावीत यासाठीच ट्रंपनी तिथं हावडी मोदी कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाचा उत्तरार्ध अमदाबादेत नमस्ते ट्रंप या कार्यक्रमानं घडवून आणला.
डोनल्ड ट्रंप यांना निवडून येण्यासाठी भारतीय मतांची आवश्यकता आहे. ३०४ इलेक्टोरल मत देणारं टेक्सर राज्य पदरात पाडणं ट्रंपना आवश्यक आहे. टेक्ससमधे २.७ लाख भारतीय मतं आपल्या खिशात पडावीत यासाठीच ट्रंपनी तिथं हावडी मोदी कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाचा उत्तरार्ध अमदाबादेत नमस्ते ट्रंप या कार्यक्रमानं घडवून आणला.
ट्रंप भारतात येऊन गेले. भारतात येण्यापूर्वी भारतीय माणसांना अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी आवश्यक व्हिसा तरतुदी त्यानी कडक करून भारतीयांना नाराज केलं. त्या तरतुदी सैल केल्याची घोषणा त्यांनी केली नाही. भारतीय मालावर त्यानी लावलेल्या जकाती आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन मालावर भारतानं लावलेल्या जकाती हा मारामारीचा घुमसत असलेला मुद्दा त्यानी गुलदस्त्यात ठेवला. सीएए संदर्भात ट्रंप मोदींची बाजू घेतील असं काही लोकं कुजबुजत होते, तेही घडलं नाही. भारत अमेरिका व्यवहारात अडचणीच्या ठरलेल्या कुठल्याही गोष्टीवर ते चकार शब्दही बोलले नाहीत. काश्मिरबाबत ट्रंप पाकिस्तानला ठोकतील असं लोकांना वाटलं होतं, ते घडलं नाहीच उलट पाकिस्तान सुधारत आहे असं ते बोलले.
भारतीयांच्या पदरात काय पडलं तर ३०० कोटींची हेलिकॉप्टरं. तीही दान किंवा सवलतीच्या दरात मिळालेली नाहीत, बाजारातल्या किमतीतच भारताला विकत घ्यायची आहेत.
भारत हा एक ग्रेट देश आहे, त्यात विवेकानंद हा एक ग्रेट माणूस होऊन गेला, भारतात ग्रेट बॉलीवूड आहे, त्यात ग्रेट नट आहेत, भारतात ग्रेट क्रिकेटर्स आहेत, भारतात आपले नरेंद्र मोदी हे एक ग्रेट मित्र आहेत हे ट्रंपनी सांगितलं. ते सारं भारताला जणू माहित नव्हतं आणि खूप संशोधन करून ते ट्रंप यांनी सांगितलं.
खूप खर्च करून ट्रंप भारतात कशासाठी आले?
ट्रंप यांचा एक गेम होता. ट्रंपना होऊ घातलेल्या नव्हेंबरातल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अमेरिकन भारतीयांची मतं हवी आहेत.
अमेरिकेत सुमारे ४२ लाख भारतीय आहेत आणि त्यापैकी २७ लाख भारतीय मतदार आहेत. सामान्यतः भारतीय माणसं डेमॉक्रॅटिक पक्षाला मतं देत असतात, ट्रंप रिपब्लिकन आहेत. ट्रंप लोकप्रिय असले तरी त्याना निर्णायक बहुमत मिळवण्यासाठी घाम गाळावा लागतोय. त्याना भारतीय मतं हवी आहेत.
अमेरिकेत गेलेले पहिले भारतीय म्हणजे आनंदीबाई जोशी आणि विवेकानंद. १८८३ साली आनंदीबाई जोशी डॉक्टर होण्यासाठी अमेरिकेत गेल्या. १८९३ साली हिंदू धर्माबद्दल बोलायला विवेकानंद अमेरिकेत गेले. दोघेही आपापली कामं आटोपून भारतात परतले. आजचे भारतीय आनंदीबाई किंवा विवेकानंदांचे वंशज नाहीत. आजचे भारतीय हे १९५० नंतर अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या भारतीयांचे वंशज आहे. सुरवातीला शिख अमेरिकेत गेले, नंतर इतर भारतीय. गुजराती, मराठी, आंध्र प्रदेशी इत्यादी माणसं अमेरिकेत स्थायिक आहेत. बहुतांश भारतीय शिकले सवरलेले, व्यावसायिक आणि ऊच्च मध्यमवर्गीय आहेत. बहुतांशांचं सरासरी उत्पन्न वर्षाला एक लाख डॉलरच्या घरात आहे.
अमेरिकेत स्थायी झालेली माणसं आर्थिक समृद्धीसाठी अमेरिकेत गेली आहेत. शिकल्या सवरलेल्या लोकांना अमेरिकेत चांगल्या नोकऱ्या मिळतात. भारताच्या तुलनेत त्या नोकऱ्यांत जास्त पैसे मिळतात.
अमेरिकेत उत्पन्न कराची गंमत आहे. तिथं अनेक राज्यं लोकांना आकर्षित करण्यासाठी इन्कम टॅक्स अगदी कमी करतात. टेक्सस या राज्यात तर उत्पन्न करच नाही. त्यामुळं अनेक भारतीयांना त्या राज्यात जायचं असतं. त्यामुळंच म्हणा किंवा इतर कारणांमुळं म्हणा टेक्ससमधल्या ह्यूस्टन आणि डलस या शहरात भरपूर भारतीय आहेत. म्हणूनच त्या दोन शहरात सुमारे अडीच लाख भारतीय मतदार आहेत.
टेक्सस हे राज्य मोठं गंमतीचं आहे. एकेकाळी या राज्यात ८० टक्के माणसं गोरी अमेरिकन होती. काळाच्या ओघात काळे, लॅटिनो आणि भारतीय माणसं टेक्ससमधे जात राहिली. आता टेक्ससमधली गोऱ्यांची संख्या ५१ टक्क्यावर घसरली आहे, काही दिवसात तिथं गोरे ३७ टक्के होतील, गोरेतर अमेरिकनांची संख्या वाढेल.
गोरे व गोरेतर यांच्या बदलत्या प्रमाणामुळं टेक्सस राज्यात तणाव असतात. गोरे लोक काळे आणि लॅटिनोंच्या विरोधात दंगली करतात, त्यांना उणेपणानं वागवतात. त्या मानानं गोऱ्या अमेरिकनांचा भारतीयांवर कमी राग असतो. कारण भारतीय सुखवस्तू असतात, अमेरिकनांइतकेच धनिक असतात आणि राजकारणापासून दूर असतात. सामान्यतः असंही म्हणतात की भारतीय माणसं स्वतःला काळे व लॅटिनोंपेक्षा श्रेष्ठ समजतात, त्यांच्यात मिसळत नाहीत. त्यामुळंच गोरे लोक भारतीयांना अधिक जवळ करतात.
टेक्ससमधलं लोकसंख्येचं रूप जसजसं बदलत गेलं तसतसे काळे आणि लॅटिनो डेमॉक्रॅटिक पक्षाच्या जवळ गेले. त्यामुळंच म्हणा किंवा इतर कारणांमुळं म्हणा टेक्ससमधलेच नव्हे एकूणच अमेरिकेतले भारतीय डेमॉक्रॅटिक पक्षापासून दूर गेले, रिपब्लिकन पक्षाचे समर्थक झाले. २००८ मधे ९१ टक्के भारतीयांनी ओबामाना मत दिलं. २०१२ मधे ती टक्केवारी ८४ वर गेली. २०१६ च्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना ७७ टक्के भारतीयांनी मतं दिली. त्याच निवडणुकीत ट्रंप यांना २० टक्के भारतीयांनी मतं दिली.
२०१६ च्या निवडणुकीत शिकागोच्या सल्ली कुमार या उद्योगीनं ट्रंप यांना १० लाख डॉलरची देणगी दिली आणि अबकी बार ट्रंप सरकार ही घोषणा दिली. त्या निवडणुकीत प्रथमच काही लोक ”ट्रंपजी आम्ही हिंदू तुमच्यावर प्रेम करतो”, असे फलक हातात घेऊन उभे होते.
अमेरिकेतल्या भारतीयांत ९० टक्के हिंदू असल्यानं ट्रंपच्या लेखी भारतीय म्हणजे हिंदूच आहेत. ट्रंप यांनी हे वास्तव लक्षात घेतलं आणि २०१९ मधे ह्यूस्टनमधे एक महामेळावा भरवला आणि मोदींना आमंत्रण दिलं. हावडी मोदी अशी घोषणा होती. मोदी आणि ट्रंप दोघानी जाहीरपणे आपली जवळीक दाखवली, मिठ्या घातल्या, एकमेकांचं कौतुक केलं. ट्रंप यांची एकूण राजकीय समज पहाता त्याना हिंदू मुसलमान यांच्यात भाजप निर्माण करत असलेली तेढ लक्षात येणं कठीण आहे. त्याना काहीही करून टेक्सस आणि अमेरिकेतल्या भारतीयांची मतं हवी आहेत, त्यासाठी त्याना मोदींचा वापर करून घेतला.
हावडी मोदी हा नाटकाचा पहिला अंक होता. नमस्ते मोदी हा दुसरा अंक अमदाबादेत पार पडला. अमदाबादमधलं ट्रंपांचं भाषण म्हणजे आपण अमेरिकेची कशी प्रगती केली याचा आढावा होता. आपल्यामुळं अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्वी कधीही नव्हती इतकी गतीमान झाली, अमेरिकन लष्कर पूर्वी कधीही नव्हतं इतकं बलवान झालं असं ट्रंप म्हणाले. अमदाबादच्या खेळमैदानात गोळा केलेल्या लोकांना त्यातलं काहीही समजण्यासारखं नव्हतं. पण ते भाषण अमेरिकन लोकांसाठीच असल्यानं भारतीयांना ते समजण्याची आवश्यकताही नव्हती.
भारतानं शेदोनशे करोड खर्च केले, तेवढेच पैसे अमेरिकेनं खर्च केले. पैसे भारतीय आणि अमेरिकन जनतेचे होते. त्यातून दोन्ही ठिकाणच्या जनतेचं घटकाभर मनोरंजन झालं येवढंच. तेही नीटपणे केलं नाही. ट्रंप आणि मोदी दोघांनी फुगडी घालायला हवी होती. ट्रंप, मेलानिया, इवांका, कुशनर, मोदी, शहा, इराणी, फडणवीस यांनी गरबा करायला हवा होता. तसं घडलं असतं तर कार्यक्रमाला भरपूर स्पॉन्सर मिळाले असते आणि बराचसा खर्चही भरून निघाला असता.
ह्यूस्टनमधलं हावडी मोदी आणि अमदाबादेतलं नमस्ते ट्रंप हे रिअॅलिटी शो होते. सारा देखावाच होता. ट्रंप आणि मोदी यांना टीव्ही पडद्याचं असलेलं आकर्षण सुप्रसिद्ध आहे. ते आणि कॅमेरा यांच्यामधे कोणीही आलेलं त्यांना चालत नाही. मोदी तर प्रत्येक जाहीर प्रसंगी डिझायनर कपड्यात असतात, एकदा घातलेल्या कपड्यात ते पुन्हा दिसत नाहीत. दोघंही बेधडक खोटं बोलत असतात. दिसणं आणि खोटेपणा हेच तर रिअॅलिटी शोचं वैशिष्ट्यं.
मनुष्यं आता नागरीकं राहिली नाहीयेत, ती आता दर्शकं झालीयत, ग्राहकं झालीयत. ट्रंप आणि मोदीनी ते बरोब्बर ओळखलंय हेच खरं.
COMMENTS