लखीमपुर खीरीमध्ये २ दलित बहिणींची बलात्कारानंतर हत्या

लखीमपुर खीरीमध्ये २ दलित बहिणींची बलात्कारानंतर हत्या

नवी दिल्लीः उ. प्रदेशातील लखीमपुर खीरी जिल्ह्यातल्या निघासन या गावात बुधवारी एका शेतात १७ व १५ वर्षांच्या दोन दलित बहिणींचे मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळले. या मुलींच्या आईने तीन तरुणांनी आपल्या मुलीचे अपहरण करून त्यांना ठार मारल्याचा आरोप केला आहे. हे तिघे जवळच्या गावातले होते. त्यांनी जबरदस्तीने आपल्या मुलींना मोटारसायकलवर बसवले, त्यांच्या मागे मी धावत गेले पण ते पसार झाले असे सांगितले. या घटनेनंतर या भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन निदर्शने केली. पोलिसांनी या प्रकरणी छोटू, जुनैद, सुहैल, हाफिजुल रहमान, करिमुद्दीन व आरिफ अशा सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या मते सर्व आरोपी व मुली एकाच गावातील असून चेतराम यांचा मुलगा छोटू पहिल्यापासून या मुलींना ओळखत होता. छोटूने तीन आरोपींशी मुलींची ओळख करून दिली होती. त्यानंतर मुलींनी त्यांच्यावर लग्न करण्याचा दबाव आणल्यानंतर आरोपींनी त्यांचा गळा घोटला व फाशी दिली.

अटकेत असलेले जुनैद व सुहैल यांचा या मुलींशी कथित प्रेमप्रकरण होते व या दोघांनीच दोन मुलींवर बलात्कार केला असे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघांनी आपण मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार मारल्याची कबुली दिली असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मूळ वृत्त

COMMENTS