४७ ते १९ एक शुष्क आवर्तन आहे माझ्यासाठी त्या समाज, सरकार आणि देशाचं ज्यानं लुबाडलं माझ्या अगणित बांधवांना आणि पूर्वजांना. या मातीत मिसळलेल्या त्यांची आण मला अडवून आहे, मीही इथंच पाय रोवून राहीन त्या पिकाच्या न मातीच्या साथीनं मातीत मिसळेपर्यंत !
दोन शिकारी ईस्टर्न युरोप मध्ये शिकारीला बाहेर पडले आणि परतले नाहीत…
पुढे ४० हजार वर्षांनी त्यांचे अवशेष आजच्या माणसाला रोमोनिया मधल्या हाडांच्या गुहेत सापडले… थिअरी सांगते ते मेले त्या नंतर बर्फ पडला असावा आणि मुडदे प्रिझर्व झाले असावेत.
मग ऊन आणि मग पाऊस… या चक्रात अडकलेले ते शांत कदाचित उकरून काढल्या नंतर झाले असतील…
मानवाने शिकरीविना जगण्याचा मार्ग शोधून काढलेला थिजलेल्या हाडांने पाहिल्यावर…
गारा पडल्या की काटा येतो मग…
काय सांगावं कोसळत्या बर्फात उध्वस्त पिकाला बघत हुबारलेले आमचे अवशेष सापडतील हजारो वर्षांनंतरच्या शेतीविना जगणार्या मानवाला, डोक्याला हात लावून बसलेल्या नदीकाठचा नाग शेडनेटच्या लिलावात काढल्याल्या ढोल्याच्या पांडा सहीत !
थंड झालेली झिजलेली आमची हाडं कदाचित तेव्हा तृप्त होतील आमचा एखादा शिल्लक वंशज या शारीरिक कष्टाच्या चक्रातून सुटलेला बघून..
……
शेतीचा शोध उगम उत्क्रांती हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे असं वारंवार अधोररखीत केलं जातं, एखादं पुस्तक येतं सेपियन सारख आणि भारतातील त्यातल्या त्यात राज्यातील हुषार लोक शेतीविरोधात पुरावा मिळाल्याच्या अविर्भावात गप्पा मारू लागतात. युवाल आणि इतर काही संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे असं आहे याला त्यांची कारणं वेगवेगळी आहेत. पण ही विचारसरणी शेतकऱ्यांना दोष देत नाही तर शेतकऱ्यांना शोषित मानते. किंबहुना आजचा अस्तित्वात असलेला संपूर्ण माणूस हा शेतकऱ्याचा वंशज तरी आहे किंवा शेतकरी तरी. ही पुस्तकं जगभर सहज उपलब्ध झाल्यामुळे, अनुवादित झाल्यामुळे किंवा हे विचार जग जवळ आल्यामुळे सार्वत्रिक झाले आणि त्याकारणाने भारतातील त्यातल्या त्यात महाराष्ट्र या अतिविद्वान लोकांच्या प्रदेशात येथील महान अडनचोटांनी शेतकऱ्याला मानवद्रोही ठरवत मानवी आरोग्याच्या पतनास सर्वस्वी शेतकरी जबाबदार धरत शेतकऱ्याला पावलोपावली ठोकायला सुरुवात केली. कित्येक विचारधारेणुसार मानवी अस्तित्व हे पृथ्वीच्या ह्रासास कारणीभूत आहे मग तुम्ही आत्महत्या करणार आहात का? किंवा हे मत मांडणारे पर्यावरणवादी स्वतःपासून जीव देऊन सुरुवात करतात का?
पण ८-१० विविध सजीव प्रजाती या स्वतःच अन्न उगवून खातात म्हणजे कल्टीवेट करून म्हणजेच शेती करून. माणूस सोडून विविध प्रजाती आहेत ज्या लाखो वर्षांपासून एकाच प्रकारचं पीक घेऊन सर्वाईव्ह करतायत.
त्यामुळे फ्रॉड काय असेल तर कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन, अक्कल येणे!
निइंडरथाल टिकला असता तर काळाच्या ओघात शेतीचा शोध त्यांनाही लागला असता किंबहुना अन्न उगवून खाता येतं ही थोडीफार आयडिया असणारी ही मानवप्रजाती होती, तिनेही शेती केली असण्याची शक्यता आहे जिला छंदी म्हणता येईल असं कॉलिन टज सांगतो. प्रोटो फार्मिंगच्या आधी हॉबी फार्मिंग अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. निइंडरथाल हा माणूस इतर मानव प्रजातींपेक्षा जास्त वनस्पती खात होता.
४० हजार वर्षांपूर्वी ऑर्गनाईझ्ड ऍग्रीकल्चरल बिहेवीयर आढळून आल्याने टज पटवून देतो. २३ हजारवर्षांपूर्वी ट्रायल प्लांटेशन झालेले पुरावे हावर्ड आणि बर्लिन यांच्या संयुक्त विद्यमानाने काम करणाऱ्या इतिहास तज्ञांनी शोधून काढले आहेत.
माणसाला नीच बनवायला, पृथ्वीच्या –हासाला, शेती नाही तर मानवी मेंदू मध्ये झालेली उत्क्रांती कोग्निटिव्ह रेव्होल्युशन कारणीभूत आहे.
….
शेती आणि शेतकरी ही संपूर्णतः नैसर्गिक आणि अत्यंत जुनी व समृद्ध जीवनपद्धती आहे.
डुम्स डे नंतर माणसाकडे ध्येयं नसतील कुठलीच, जिवंत राहण्याशिवाय. आज ‘डु वि रिअली निड फार्मर्स’ हा प्रश्न उपस्थित केला जातोय, भारतात सामुहिकरीत्या शेतकरी नष्ट करण्यासाठी सक्षम पावले उचलली जात आहेत.
डुम्स डे म्हणजे फार काही वेगळा असेल असं वाटत नाही, मानवाचा मानवाशी शेवटचा संघर्ष!
दीड लाख वर्षांखाली निएंडर वॅली मध्ये सेपियन्स आणि निएंडरथाल यांच्यात तुंबळ हाणामारी झालेली, मानवाच्या प्रगत अशा जमातीने म्हणजे सेपियन्सने निएंडरथाल या जमातीवर हल्ला केला, त्यामध्ये त्यांची पीछेहाट झाली व त्यातून वाचलेले नाईलच्या दिशेने पळाले, निएंडरथालने या मानवी प्रजातीस जाण्यास मार्ग दिला.
आजचा शहरी भाग हा त्याच प्रगत सेपियनच्या वृत्तीचा आहे आणि शारीरिक क्षमतेवर जगणारा शेती आधारित कृषक समाज हा त्या निएंडरथालच्या वृत्तीचा!
दीड लाख वर्षांपूर्वी सेपियन पळालेला आणि पुढे तब्बल एक लाख वर्षे निएंडरथालने या पृथ्वीवर स्वतःचं साम्राज्य अबाधित ठेवत काळरेषेवर स्वतःच नाव कोरलं.
काळाच्या बदलत्या धावत्या आलेखानुसार एक लाख नाही, पण एक हजार वर्षे तरी अजूनही या इथल्या कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची भूमीपुत्रांची आहेत. येणारा काळ तो संघर्ष उघडा करेल, प्रगतीच्या झेंड्यांना पेलणारे हातही याच कष्टकऱ्यांच्या पिकांवर पोसलेले आहेत हे लक्षात यायच्या आधी उशीर झालेला असेल.
कदाचित पुढे हजार वर्षांनी होईल मानवाविना शेती, कदाचित या उत्क्रांतीत गाडले जाऊ. पण आज नाही, उद्या नाही आणि पुढचे हजार वर्षे तरी नाहीच नाही.
हा संघर्ष चालू झालेला आहे, या प्रगत मानवाकडून होणारी कृषक समाजाच्या कष्टाची हक्कांची लूट ही एक प्रकारची हिंसाच आहे आणि याचा पुढचा अध्याय हा शारीरिक हिंसेत असेल कदाचित. भविष्याच्या उदरात काय साठलेलं आहे हे आज फक्त एखाद्या काळातीत प्रवाशालाच माहीत असावं. पण एका स्थिरस्थावर वळणावर त्या विध्वंसानंतर सगळी सगळी ध्येयं संपतील तेव्हा थांबलेला माणूस पोटातली भुकेची आग भागवण्यासाठी इतिहासातून शेतीची पाळंमूळं खोदून काढण्यात पिढ्या खर्ची घालील.
तो शिल्लक राहिलेला माणूस अन्नासाठी दिशा भटकेल..
तो शिल्लक राहिलेला माणूस अन्नासाठी दिशा भटकेल…
……
सातबाऱ्यावरच्या नावाविषयी असूया असलेला समाज या शहरांनी जोपासला. जमीनीचं फेरवाटप झालेलं आहे लोकहो, आता दोन अंकी शिल्लकीत आहेत त्या आमच्या मागच्या ३ पिढ्यांनी पोट मारून तुकडा तुकडा जोडून जतन केलेल्या.
शेतसाऱ्यापासून शिक्षणकर प्रत्येक गोष्ट या शेतकऱ्याकडून वसूल केली जाते. मालकी हक्काला निर्बंध असलेली शेतजमीन ही एकमेव मालमत्ता (?) आहे. बंगले येणे, प्लॉट, इमारती ते उद्योगांसाठी जमिनी हे निर्बंधात आलं नाही कधी.
फुकटा म्हणणारे, करबुडवा म्हणणारे, ते करचोर म्हणणारे, याच शहरांनी जोपासले. कुंडीतल्या शेतीचं नुकसान झालं म्हणून मलाही कर्जमाफी द्या म्हणणारी स्त्री, ते पिकांवर बंदी घाला म्हणणारे तज्ञ याच उपऱ्या शहरांची पैदास.
कोण भरतं नेमका कर? रिटर्न फाईल करणारे? की लाखो करोडो रुपयांचे कृषी-औजारं-कृषीपंप ते पाईप-ड्रीप-खतं-बियानं खरेदी करणारे? कुंडीत फिरवता नांगर? की बागेत लाखो करोडो रुपयांचं ड्रीप करता? हे मार्केट कोणावर चालतं?
इथल्या अभियंत्यांना रोजगार कोणामुळे आहे? कार्डवर शॉपिंग करणाऱ्या बायानो तुमच्या कार्डवर असणार्या अंकांना पैसा म्हणून किंमत कोणामुळे येते?
सगळं भुईसपाट करून शहरातल्या रस्त्यांसहित सगळं सगळं उखडून काढत सगळं एका बाजूला करून व्हावं समसमान वाटप.
जमीनि कोलून देऊ.
कसला टॅक्स न कसलं काय
गावांच्या पत्र्यांच्या कुडांच्या नशिबाला काय आलं?
लाख मातीत टाकलं तरच ४ हजार मिळणार नाहीतर घंटा.
दर वर्षीची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वेगळी
शिकवायची प्रायॉरिटी ठिवून आतडं जाळून एखादा शिकवतो अन त्याच्यावरही समाज हसतो काय शिकवलं तर डीएड-बीएड !
अरे भेंचोद, तुम्ही ऑप्शन ते ठेवले समोर, समाज म्हणून तुम्ही कुठला वाटा उचलला, सरकार प्रशासन म्हणून काय उपलब्धता दिल्या?
मग त्या बापानं जे अव्हेलेबल होतं त्यातलं कायतर पकडलं, त्यामागं शिकवणं ही भूमिका होती, त्याला तुच्छ म्हनणाऱ्यांची पोटं कधी कण्यांनी भरली नाहीत ना लुगडी साड्या ईजरी ईगरल्या नाहीत.
संधीच उपलब्ध करून दिली नाहीत, इन्फ्रा स्ट्रक्चर पासून साध्या दिव्यांपर्यंत, मेडिकल, दवाखाना ओपीडी पासून शाळेपर्यंत एक गोष्ट नाही. कुणाच्या बोकांडी गेला खतं बियाणं औजारं पाईपं मोटरा ते शेतसारा पाणीपट्ट्या ते वाहानांवर भरलेला हजारो करोड प्रत्येक वर्षाचा टॅक्स?
कुठं गेला साखरेपासून प्रत्येक पिकं एक्स्पोर्ट होईन देशाला मिळवून दिलेलं अरबोंचं परकीय चलन? कुणाच्या संपन्नतेसाठी वापरलं गेलं?
काय दिलं ४७ ते १९ नं या संपूर्ण वर्गाला?
त्या देशाच्या संकल्पनेत बसतो कुठं हा सगळाच्या सगळा वर्ग?
लाकडं तोडली म्हणून आत घालता कधी, उद्या हे लोक ही-हीच खतं वापरली म्हणूनही जेल मधी सडवतील. आणि पकडून टाकणाऱ्यांच्या नजरा काय हो, बहुतेक दूरच्या कुठल्या ग्रहावरनं येत असावेत, नैतिकता बैतीकता तिथंच निजवून. शोमध्ये पोरांसमोर वर्दीचं कर्तव्य म्हणून त्याला लाठीचार्ज करावा लागतो, गोळ्या घालाव्या लागतात म्हणणारा इंग्लिश एक्सेन्टमध्ये मराठी बोलणारे मातीतनं गेल्याचा दाखला देणारे बायका पोरांवर सरकारी आदेशानुसार हल्ला करतील काय?नासलेल्या आत्म्याचं सडकं शरीर असलेल्या या संपूर्ण आर्थिक समाजबांधनीनुसार झालेल्या समाजाचं मूळ कधी मातीत होतं यावर आता मला विश्वास बसत नाही.
……
देशाचा एक प्रवास आहे ४७ ते १९
समाज म्हणून त्यात शेतकऱ्याचं स्थान काय?
प्रोफेशन म्हणून शेतीचं स्थान काय?
उद्योग म्हणून शेतीला कोणती धोरणं लावली उद्योगांची?
करिअर म्हणून शेती-शेतकरी या वाटा का समृद्ध झाल्या नाहीत?
त्या तुडवायची ईच्छा कधीच मेली नाही.
आजही आत्मा शेतीत असतो माती सोडून गेलेल्याचा. वेळ का यावी? का शेती भागवू शकत नाही?धंदेवाल्याची पोरं त्याच धंद्यात शिरतात मग आम्हालाच वाटा का वाकवाव्या लागतात? किंवा संपूर्ण समर्पण शेतीत केलं तर का ठिगळं घालून मिरवावं लागतं?
६० ते ७०च्या दशकातील शेतमालाचे भाव व इतर किमती यांच समसमान असलेलं गुणोत्तर आत्ताच का व्यस्त झालं?
का भाज्य लहान झाला भाजका पेक्षा?
का गणित ढासळलं पोटाचं अन कष्टाचं ?
फक्त आणि फक्त शेती वर का भागू शकत नाही?
आर्टिस्टची इच्छा असते कॅनव्हास एकरूप असावा, विकत घेणाऱ्याच्या इच्छेवर त्याला आवडत नाही पटत नाही रंगाचे ताशेरे ओढायला.
माती हिरव्या रंगाने रंगवणारे चित्रकार आहोत आम्ही, नाही आवडत जोडधंद्याच्या अट्टाहासाची मिसळ.
संपूर्ण डेडिकेशन ने करायचं म्हंटलं तरी धोरणं लुबाडतात सरकारची
नागवतात
समाज मजा बघतो
लिहिलेलं दुःख वाचून आनंद घेतो
समाजभाग म्हणून समाजाने काय दिलं या वर्गाला माझा प्रश्न आहे.
लोकशाहीच्या बुरख्याखाली इथून तिथून निवडून येणाऱ्या सरकार ते विरोधक या सर्व संसदीय बिगरसंसदिय नेते पुढारी वगैरेंनी काय दिलं या वर्गाला हा प्रश्न आहे.
माझी आत्मीयता मातीशी आहे, म्हणून मी इथं आहे. असेल सातबारा कारण त्याला पण विकून विस्थापन करायचा पर्याय मलाही होता आणि आहे पण त्या वाटेवर माझ्या पिढ्या गेल्या नाहीत ना मी जाईन पण ते फक्त या मातीच्या प्रेमाखातर.
I repeat मातीच्या प्रेमाखातर, या मातीला काल्पनिक नकाशावर विभागणाऱ्या, नाव देणाऱ्या, राज्य-देश या संकल्पनांनी माझ्या मनात कधीच घर केलं नाही.
४७ ते १९
एक शुष्क आवर्तन आहे माझ्यासाठी
त्या समाज, सरकार आणि देशाचं
ज्यानं लुबाडलं माझ्या अगणित बांधवांना आणि पूर्वजांना.
या मातीत मिसळलेल्या त्यांची आण मला अडवून आहे,
मीही इथंच पाय रोवून राहीन त्या पिकाच्या न मातीच्या साथीनं मातीत मिसळेपर्यंत !
….
क्रमशः
आकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.
COMMENTS