ज्यो बायडन आणि सलमान मूठभेट कशासाठी?

ज्यो बायडन आणि सलमान मूठभेट कशासाठी?

१५ जुलै २०२२ला अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन सौदी अरेबियात गेले. तिथं त्यांनी सौदी अरेबियाचे राजपुत्र बिन सलमान यांच्याशी वाटाघाटी केल्या. बिन सलमान रा

बायडन यांनी मूलगामी अजेंडा राबवणे अत्यावश्यक
‘हाऊडी मोदी’ : मोदींसाठी लाभदायक, पण भारतासाठी?
इराण –अमेरिका तणावामुळे आखाती युद्ध घडेल का?

१५ जुलै २०२२ला अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन सौदी अरेबियात गेले. तिथं त्यांनी सौदी अरेबियाचे राजपुत्र बिन सलमान यांच्याशी वाटाघाटी केल्या. बिन सलमान राजपुत्र असले तरी खरं म्हणजे राजेच आहेत, तेच सगळा कारभार हाकत असतात. वडील जिवंत आहेत म्हणूनच ते राजपुत्र आहेत एव्हढंच.

बायडन यानी आपल्या निवडणुक प्रचार मोहिमेत बिन सलमान यांना बहिष्कृत करू असं म्हटलं होतं. ज्याला बहिष्कृत करायचं म्हणत होते त्याच्याशीच हात मिळवणी? हात मिळवणी नाही म्हणता येणार. हात एकमेकाच्या हातात घेण्याऐवजी मुठी एकमेकावर आदळल्या, मूठभेट घेतली. तांत्रीकदृष्ट्या बायडन म्हणू शकतात की त्यांनी हातमिळवणी केलेली नाही.

बिन सलमान बहिष्कृत होणार होते कारण त्यांनी जमाल खाशोग्गी या एका पत्रकाराचा इस्तंबूलमधे खून घडवून आणला होता.

खाशोग्गी हे सौदी पत्रकार अमेरिकेतल्या वॉशिग्टन पोस्ट या दैनिकात स्तंभ लिहीत असत. खाशोग्गी एकेकाळी बिन सलमान यांच्या पुरोगामी कार्यक्रमाचं कौतुक करत असत. पण ते पुरेसे पुरोगामी नाहीत असं खाशोग्गी म्हणू लागले आणि बिन सलमान यांची खाशोग्गीवर खप्पामर्जी झाली.

काही कागदपत्र गोळा करण्यासाठी इस्तंबूलच्या दूतावासात या असं खाशोग्गीना  सांगण्यात आलं होतं. दूतावासात गेल्यावर त्यांना मारण्यात आलं. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले, हाडं रसायनांत विरघळवण्यात आली. सर्व मागमूस पूर्णपणे नाहिसा करण्यात आला. आधीच नियोजन केलं होतं. खाशोग्गी यांच्याच आकाररूपाचा एक तोतया तिथं हजर होता. खाशोग्गींना मारल्यानंतर हा तोतया इस्तंबूल शहरात फिरला. त्याच्या फिरण्याचं चित्रीकरण करण्यात आलं.

खाशोग्गीना मारलेलं नाही. ते दूतावासात गेले,तिथलं काम आटोपून बाहेर पडले, शहरात फिरले असं या चित्रीकरणाच्या आधारे सांगण्यात आलं. शहरात फिरल्यानंतर ते नाहिसे झाले, त्यांचा पत्ता लागत नाही असं सौदी सरकारनं सांगितलं.

युरोप, अमेरिकेतल्या वृत्तपत्रांनी तपास केला आणि खुनाचा कट बिन सलमान यानी कशा रीतीनं रचला होता याचा वृत्तांत प्रसिद्ध केला. एका धनाढ्य देशाचा प्रमुख म्हणून बिन सलमानची गय केली नाही.

बोंब झाली.

जमाल खाशोग्गी या

जमाल खाशोग्गी या

पण उपयोग काय? बिन सलमानची सौदी अरेबियावर एव्हढी पकड होती, आहे, की सौदीत कोणी हूं का चूं केलं नाही. पेपर, पोलीस,न्यायव्यवस्था, धर्मपोलीस, मुल्ला मंडळी, कोणीही एक चकारशब्द काढला नाही.

ट्रंप आणि बिन सलमान यांच्यात फार प्रेमाचे संबंध होते. त्यामुळं ट्रंप यांनी तसं काही घडलेलं असेल असं वाटत नाही म्हणून विषय संपवला.

बिन सलमान यांचं क्रोर्य थरकाप उडवणारं असल्यानं त्यांच्यावर बहिष्कार घालण्याची भाषा केली तर आपली चार मतं वाढतील असा हिशोब करून ज्यो बायडननी बिन सलमानवर टीका केली.

युक्रेनवर रशियानं आक्रमण केल्यावर चित्र एकदम बदललं. रशियानं पश्चिमेला निर्यात होणाऱ्या रशियन तेलात कपात केली. युरोपीय देश युक्रेनला मदत करत राहिले तर तेल पुरवठा बंद करू अशी धमकी पुतीन यांनी दिली. युरोपातल्या देशांची तेलाची ६० टक्के गरज रशिया भागवतो. त्यामुळं युरोप थंडीनं गोठून मरेल अशी भीती निर्माण झाली.

सौदी जगातला सर्वात मोठा तेल निर्माता देश आहे. तेंव्हा सौदीला लोणी लावून युरोपची तेलाची गरज सौदीनं भागवावी, अमेरिका-युरोपशी दोस्ती ठेवावी हे सांगण्यासाठी बायडन रियाधला गेले. कारण बिन सलमान रशिया आणि चीनशी दोस्ती वाढवण्याची खटपट करत होता.

बिन सलमान इतका बिनधास्त माणूस होता की युक्रेन युद्ध, तेल टंचाई या बाबतीत बायडन यानी फोन केला तर फोनही घेत नसे. इतका उद्धटपणा बिन सलमाननी केल्यावरही त्याचे पाय धरणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवून, अपमान गिळून, बायडन रियाधला गेले.

जगात उदारमतवादी मूल्यं ज्योपासली गेली पाहिजेत, लोकशाही आणि स्वातंत्र्य जपलं गेलं पाहिजे असं परदेश धोरण असणाऱ्या अमेरिकेचे अघ्यक्ष बिन सलमान या गुन्हेगार आणि अमानवी क्रूर माणसाला भेटायला गेले.

अमेरिका आणि युरोपीय देशांचं बळ कमी झालंय. अमेरिका ठरवेल त्या अटी मान्य करत बिन सलमान किंवा कोणीही धटिंगण त्यांच्या पायाशी येईल अशी आज अमेरिका-युरोपची ताकद राहिलेली नाही. एकेकाळी म्हणजे १९९० मधे जी-सात देश जगाच्या एकूण उत्पादनाच्या ६६ टक्के उत्पादन करत होते. २०२१ साली तो टक्का ४४ वर आला आहे. आर्थिक ताकद वापरून कोणाला वाकवू असं अमेरिका म्हणाली तर ते शक्य दिसत नाही. युक्रेन युद्ध लांबलं आणि रशियानं तेल पुरवठा बंद केला तर युरोपचं (पर्यायानं अमेरिकेचं) काय होईल याचा विचारही करवत नाही इतकी भीषण अवस्था निर्माण होऊ शकते.

अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात १९३५ पासून मित्रत्वाचे संबंध आहे. सौदी तेल उद्योगात अमेरिकेची गुंतवणूक आहे. बदल्यात अमेरिका सौदी अरेबियाला शस्त्रं पुरवते. सौदी आणि इस्रायल यांच्यात वितुष्ट असताना अमेरिकेनं दोघांशीही मैत्री जमवली होती. ओबामा यांच्या काळात काही काळ सौदी अरेबियाबरोबर तणाव निर्माण झाले होते, कारण ओबामा इराणशी संबंध सुधारू इच्छीत होते. इराण-सौदी यांच्यातलं वितुष्ट (शिया-सुन्नी) पुरातन असल्यानं सौदी नाराज होते. पण ट्रंप राजवट सुरु झाल्यावर ट्रंपनी सौदीशी जवळीक पुन्हा प्रस्थापित केली होती.

सौदीत लोकशाही नाही. सौदीत स्त्रियांना अधिकार नाहीत. सौदीत कर्मठ वहाबी पंथाच्या तालावर समाजव्यवस्था नाचते. हे सारं आजचं नाही, जुनंच आहे. तरीही अमेरिकेनं सौदीबरोबर संबंध टिकवले कारण त्यात अमेरिकेचं हित होतं. आजही सौदीला दुखवणं अमेरिकेला आणि युरोपला परवडणार नसल्यानं बिन सलमान यांची धटिंगणगिरी निमूट मान्य करणं अमेरिकेला भाग होतं.

तेच, ज्यो बायडन यांनी केलं.

पाकिस्तानमधे लष्करशाही होती, तिथं अनेक धटिंगणांनी राज्य केलं. सारे धटिंगण अमेरिकेचे मित्र राहिले. कारण अमेरिकेला आशियामधे पाय ठेवायला जागा हवी होती. तालिबानला अमेरिकेनंच सत्ता आणि शस्त्रं दिली. कारण तालिबान रशियाला अफगाणिस्तानातून हुसकावून लावणार होतं.

बिन सलमानना ज्यो बायडन भेटले हा अमेरिकेच्या दीर्घ काळापासून चालत आलेल्या परराष्ट्र नीतीचाच भाग आहे.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0