‘झुलवा’ कारांचा उपेक्षित लेखन-संसार

‘झुलवा’ कारांचा उपेक्षित लेखन-संसार

आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवन मांडणारे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. त्यांचा आणि त्यांच्या लेखन प्रवासाचा आढावा घेणारा 'दिव्य मराठी'ने प्रसिध्द केलेला हा लेख.

उत्तम बंडु तुपे यांच्या कथा-कादंबऱ्यांतून दक्षिण महाराष्ट्रातील माण खटाव तालुक्यांच्या भवताल ओतप्रोत आलेला आहे. त्या तालुक्यात फिरताना मराठी वाचकाला उत्तम बंडु तुपे यांची आठवण येतेच येते. माणदेशातील खेडी, माणदेशातील दुपार-संध्याकाळ, उन्हाच्या झळा, खुरटी राने, उजाड मुलूख आणि माणदेशाची म्हणून असलेली बोली भाषा तुपे यांच्या लिखाणात सहजपणे डोकावते.

तुपे हे मराठीतील सशक्त ग्रामीण कादंबरीकार. मुळा रोड खडकी पुणे, हा त्यांचा  पत्ता. आम्ही गेलो तेव्हा, खोलीचा पडदा लावलेला. माझ्यासोबत असलेल्या दीपक चांदणे यांनी हाक दिली.

‘आप्पा’ ‘कोण आहे, आत या.’ आतून आवाज आला. आम्ही आत गेलो. पत्र्याला टांगलेला पंखा चालू होता. भिंतीला लागून असलेल्या खाटेवर त्यांच्या पत्नी झोपलेल्या. आम्ही गेल्यावर उठून बसल्या. आप्पा भारतीय बैठक मारून लिहीत बसलेले. खोलीच्या भिंतीवर पुरस्कारांच्या फ्रेम टांगलेल्या. त्यात राज्य पुरस्कारही होते. आप्पांनी उठून पसारा दूर सारत आम्हाला जागा करून दिली. त्या छोट्याश्या खोलीत दाटीवाटीने बसून आम्ही आप्पांशी बोलायला लागलो.

‘काय लिहिताय सध्या?’

‘मातगत’ कादंबरी सुरू आहे.’ आम्ही गप्प होतो. त्यांच्या लक्षात आले. या पोरांना मातगत शब्द समजलेला नाही. ते लगेच म्हणाले. ‘१९५० पासून १९९० पर्यंत शेतीत जे बदल झालेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तो आत्महत्येकडे वळाय लागलाय. याचा मी शोध घेतोय. मातगत म्हणजे मातीची गत.’

मग आप्पा आमच्याशी बोलताना स्वतःविषयी सांगायला लागले. ‘आमच्या माणदेशात इंग्रज सरकारच्या विरोधात बाज्या बैजाचं बंड होतं. माझे वडीलही त्या बंडात होते. त्या लोकांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं. त्या बंडकरी लोकांचा गोरगरीब लोकांना खूप आधार वाटायचा. माझ्या वडिलांचे नाव तसं श्रीपती, पण ते बंडात गेल्यामुळे बंडु झालं. आमचं गाव तसं खटाव तालुक्यातलं एणकुल. पण या बंडानंतर वडिलांच्या मित्राने त्यांना श्रीगोंदा तालुक्यातील घायपतवाडीला नेले. माझं बालपण तिकडंच गेलं. त्याच परिसरात मी तिसरी शिकलो. तिसरीनंतर मला रानात गुर राखावी लागली. यादरम्यानच मी टुरिंग टाकीत जाऊन  चित्रपट बघत होतो. त्यातली गाणी एकून मलाही गाणी लिहावी असं वाटायला लागलं. मग गुरांमागं असतानाच मी गाणी, लावण्या लिहायला लागलो. चालीत बसवायला लागलो. तिथंच मला लिखाणाची आवड निर्माण झाली. त्यानंतर मी पोट भरण्यासाठी पुण्याला आलो. पुण्यात पोटासाठी अनेक कष्टाची कामे केली. याच काळात मला कराडचे रंगराव पाटील भेटले. त्यांना मी लिहिलेल्या लावण्या, गाणी दाखवली. ते म्हणाले, ‘उत्तम असलं काही लिहू नकोस. त्यापेक्षा कथा लिही.’ त्यांनी मला त्यांच्याकडे असलेले दिवाळी अंक वाचायला दिले. त्यातल्या कथा मी वाचल्या. मग मला कथा म्हणजे काय ते समजलं. मी खेड्यातून आलो होतो. माझ्याकडे अनुभवाला तोटा नव्हता. मी अनेक प्रसंग पाहिले होते. माणसं पाहिली होती. ते सगळं लिहावं असं वाटायला लागलं. मग मी लिहायला लागलो. कथा छापायला पाठवायला लागलो. तेव्हा ‘सत्यकथे’चा बोलबाला होता. माझ्या कथा ‘सत्यकथे’त छापून आल्या. वेगवेगळ्या दिवाळी अंकातून आल्या. नाव झालं.बक्षीस मिळाली. थोडफार मानधनही मिळायला लोगलं. मी पुन्हा माझी नोकरी सांभाळून मिळालेल्या वेळात लिहायला लागलो. चित्रपटकथाही लिहिल्या. ‘भस्म’ या चित्रपटाला राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले.

चित्रपटसारख्या क्षेत्रातही या तिसरी शिकलेल्या माणसानं भरारी मारली. पण या क्षेत्रातील काही वाईट अनुभवही त्याच्या वाट्याला आले. ते म्हणाले “माझ्या ‘भस्म’ या चित्रपटाला राज्यसरकारचे १३ पुरस्कार मिळाल्यानंतर तो चित्रपट दिल्लीत स्पर्धेसाठी गेला. तिथं असणाऱ्या सगळ्या चित्रपटात आमचा चित्रपट सर्वोत्कृष्ट होता. पण निवड समितीत असणाऱ्या एका मोठ्या दिग्दर्शकानं आमची फिल्म मुद्दाम लपवून ठेवली. त्यामुळे आमचं नुकसान झालं. चित्रपट महोत्सव झाल्यावर त्यांनी फिल्म सापडली असं जाहीर केलं. आमच्या चित्रपटाला बक्षीस मिळू नये म्हणून हा डाव खेळला गेला. आमच्यावर अन्याय केला.’

तुपे यांनी देवदासींच्या जीवनावर लिहिलेल्या ‘झुलवा’ या कादंबरीची मराठीत खूप चर्चा झाली. ‘झुलवा’वर नाटकही आलं. झुलवात देवदासी प्रथा, अंधश्रद्धा, रुढी, परंपरेतून स्त्रियांचं होणारं शोषण ताकदीन मांडलं आहे. या कांदबरीची नायिका जगन शेवटी या प्रथा परंपरेच्या विरोधात बंड करते. घरातला देव्हारा नदीत फेकून देते. त्या अर्थाने बंडखोर नायिका तुपे यांनी ‘झुलवा’तून समोर आणली आहे. रुढीच्या टाचेखाली चिरडल्या जाणाऱ्या समूहाला या कादंबरीतून तुपेंनी जोखड झुगारून देण्याला विचार दिला आहे.

झुलवा, खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ, माती आणि माणसं यासह अनेक कादंबऱ्या लिहून खेड्यातील लोकांच्या समजूती, त्यांचे प्रश्न, व्यवस्थेकडून त्यांच होणार शोषण, या सगळ्या गोष्टी मराठीत साहित्य आणणाऱ्या उत्तम बंडु तुपे यांचं आजवरचं आयुष्य खडतर गेलं आहेच, पण वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांना झोपडपट्टीतील छोट्याशा घरात राहून हालाखीचं आयुष्य कंठावं लागतंय. त्यांना घर मिळावं म्हणून त्यांच्या एका मित्राने सरकारकडं अर्ज केला होता. त्या अर्जाच काय झालं? याची चौकशी करण्यासाठी तुपे मुंबईला मंत्रालयात गेले. पण तिथल्या क्लार्कने अपमानस्पद वागणूक दिल्यामुळं त्यांनी तो प्रस्ताव परत स्वतःकडे घेतला. पुन्हा कधीही घर मिळावं म्हणून ते सरकारकडे गेले नाहीत.

वीस वर्षापूर्वी घडलेली ही गोष्ट आहे. या घटनेनंतरही त्याच घरात बसून त्यांनी लिखाण केलं. कोणाबद्दल कसलीही तक्रार न करता, ते निष्ठेनं आपलं काम करत राहिले. आजही करत आहेत.

ते म्हणतात, ‘पूर्वी बरं होतं, लोक वाचायचे, पण आता टीव्हीसारखी अनेक माध्यमं आली. लोक आता पूर्वीसारखं वाचत नाहीत. त्यामुळं पुस्तक छापायला प्रकाशक धजावत नाहीत. पूर्वी लेखकाला चांगली रॉयल्टी मिळायची, आता मिळत नाही.

एरवी, लेखकाच्या खोलीबाबत (स्टडीरूम) खूप चर्चा झाली आहे. लेखकाची खोली कशी असावी, खिडकीतून काय दिसावं? आत फोटो कोणते असावेत? कोणती पुस्तक असावीत? या विषयी काही लेखकमंडळीनी भरभरून लिहिलं आहे. एका परिसंवादतही लेखकाची ‘लिहिण्याची खोली’ याबद्दल ऐकल होतं. पण उत्तमआप्पाचं सगळं एकत्रच आहे. मनात आलं की आप्पा लिहायला सुरुवात करतात. थोडा कंटाळा आली की, जवळच असणाऱ्या कॉटवर झोपतात. जिथं लिहायला बसतात, तिथंच जेवतात. जेवल्यावर ताट बाजूला करून लिहायला सुरूवात. लेखकाची खोली हे प्रकरण आप्पांच्या आयुष्यात अद्याप तरी आलेलं नाही. लिहायला लागल्यापासून आप्पा त्याच छोट्या खोलीमध्ये दाटीवाटीत बसून लिहित आहेत. आतल्या घरात त्यांना मिळालेल्या पुस्तकांच्या फ्रेम आहेत. मानचिन्ह तिजोरीत ठेवली आहेत. आप्पा त्यांची बायको आणि मुलगा तिघे त्या घरात राहतात. एखादा पाहुणा आल्यावर त्याला मुक्काम कर असं म्हणायचही धाडस त्यांना होत नसेल!

आप्पाना भेटायला जाताना दीपक चांदणेंशी  मनमोकळं बोलत होतो. पण येताना सगळं पाहून गप्प बसलेलो. कारण जाताना माझ्या मनात ‘मुळा रोड खडकी’ या घराबद्दल विशिष्ट प्रतिमा होती. प्रत्यक्षात माणदेशाचा हा लेखक एवढ्याशा खुराड्यात राहून वयाच्या ८५ व्या वर्षीही शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी ‘मातगत’ कादंबरी लिहितोय. स्वतःच्या परिस्थितीबद्दल कसलीही तक्रार न करता लेखननिष्ठा जोपासतोय. पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत लिहणाऱ्या या लेखकाबद्दल वाचकांना कसलीही माहिती नाही. वाचकांना झुलवा माहीत आहे. पण ‘झुलवा’ कार कोणत्या अवस्थेत आयुष्याची संध्याकाळ घालवतोय, हे माहीत नाही.

(‘दिव्य मराठी’च्या रसिक पुरवणीमध्ये ३० एप्रिल २०१७ रोजी आलेला हा लेख साभार )

COMMENTS