झुंडीच्या मन-मेंदूचा ठाव

झुंडीच्या मन-मेंदूचा ठाव

फॅसिस्ट राजवटींना बळ देणाऱ्या झुंडींचे मानस उलगडून सांगणाऱ्या ‘नवी क्षितिजे’कार दिवंगत विश्वास पाटील यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या गाजलेल्या पुस्तकाची तिसरी आवृत्ती नुकतीच ‘साधना प्रकाशना’तर्फे प्रकाशित झाली. आजच्या झुंडींच्या वर्तनाचे, राजकीय-धार्मिक नेत्यांच्या कार्यशैलीचे नेमके विश्लेषण असलेल्या या लक्षवेधी पुस्तकातील उताऱ्यांचे हे संपादित अंश...

ज्यांची विचारशक्ती कमजोर असते, अशा व्यक्तींची कल्पनाशक्ती वाजवीपेक्षा जास्त तल्लख असते. तसेच ती कल्पनाशक्ती मुख्यत्वे प्रतिमांवर आधारित असते आणि ती परिणामकारकरीत्या काम करते. झुंडींची अवस्था नेहमी याच प्रकारची असते. झुंडीसुद्धा प्रतिमायुक्त कल्पनाशक्तीच्या जोरावर चालतात आणि त्यांच्यावरही कल्पनाशक्तीचा पगडा अधिक असतो. घटना, व्यक्ती वा अपघाताचा केवळ उल्लेख ऐकूनसुद्धा झुंडी उत्तेजित होऊ शकतात. अशा प्रसंगी झुंडींच्या मनच्श्रक्षूंपुढे जी चित्रे वा प्रतिमा उभ्या राहतात, त्या वास्तव म्हणाव्यात इतक्या हुबेहूब व जिवंत असतात. झुंडी मनन-चिंतन करू शकत नाहीत. कोठल्याही प्रश्नाचा बारकाईने वेध घेऊ शकत नाहीत. त्यामुळे झुंडी असंभवनीय अशाही गोष्टींवर विश्वास ठेवतात. उलट, एखादी घटना जितकी जास्त असंभवनीय तितकी झुंडींना ती अधिक आकर्षित करते आणि खरी वाटते. या विशिष्ट कारणामुळे घटनांची चमत्कृतिजन्य व दंतकथात्मक बाजूच फक्त झुंडींच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. संस्कृतीच्या अभ्यासकाला अभ्यास करताना पहिली गोष्ट ही जाणवते की, दंतकथा आणि लोकविलक्षण कथांच्या आधाराने प्रत्येक संस्कृती उभी आहे.

एखादी कृती घडवून आणायची असेल, तरी त्यासाठीसुद्धा प्रतिमांची भाषाच वापरावी लागते. झुंडींना भाषेची सूक्ष्मता कळत नाही. सूक्ष्म अर्थाच्या शब्दांपेक्षा ज्या नाटकी आवाहनांमध्ये प्रभावी प्रतिमांची भाषा वापरलेली असते, ती आवाहने झुंडींना चटकन आकर्षित करतात आणि झुंडींच्या बाबतीत अत्यंत परिणामकारक असतात. प्राचीन रोममधील खालच्या वर्गातील जनता पोटभर भाकरी आणि करमणूकप्रधान खेळ, नाटके व तमाशावर बेहद खूश असे. याच्यावरून काय तो तर्क काढा. सत्यापेक्षा सत्याचा आभास आणि नाटकी आवेश झुंडींना चटकन वश करतात. सत्य आणि असत्य यांच्यातील भेद झुंडींना कळत नाही. सत्य आणि असत्य हे दोन्ही झुंडी एकाच मापाने मोजतात.

जगज्जेत्यांचे आणि राष्ट्रांचे खरे सामर्थ्य शेवटी तेथील जनसमुदायाची कल्पनाशक्ती किती सतेज आहे, याच्यावर ठरते. झुंडींची कल्पनाशक्ती ताब्यात आली, तरच झुंडींवर नेतृत्व गाजवता येते. इतिहासामधील सगळ्याच्या सगळ्या मुख्य मुख्य घटना – उदाहरणार्थ – बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्म, महमदी धर्म या धर्मांचा उदय, धर्मसुधारणेची – रिफॉर्मेशनची चळवळ, फ्रेंच राज्यक्रांती इत्यादी इत्यादी घटना – या झुंडींच्या कल्पनाशक्तीवर उमटविल्या गेलेल्या खोल ठशांचे प्रच्छन्न वा उघड परिणाम होते. प्रत्येक युगातील आणि प्रत्येक देशातील राजपटू व निरंकुश हुकूमशहा तेथील जनसमुदायाची कल्पनाशक्ती हाच आपल्या सत्तेचा प्रमुख आधार मानतात. त्यामुळे जनसमुदायाच्या कल्पनाशक्तीला गंभीर धक्का पोहोचवणार नाही, याच बेताने ते आपली सत्ता वापरतात.

नेपोलियनचे पुढील उद्गारच पाहा. नेपोलियन म्हणतो – “कॅथॉलिक पंथ स्वीकारून मी व्हान्दीत युद्ध टाळू शकलो. मी मुस्लिम बनलो आणि मला इजिप्तमध्ये पाय रोवता आला. अल्ट्रामांतान धर्मपंथांचा स्वीकार केल्यामुळे इटलीतील धर्मगुरू माझ्या बाजूला आले आणि जर का ज्यू राष्ट्राचे प्रमुखत्व माझ्या हाती येते, तर मी सालोमनचे मंदिरसुद्धा पुन्हा उभारून दिले असते.” नेपोलियनचे वरील उद्गार ध्यानात घेतले की, त्याला झुंडीने मानसशास्त्र कसे उपजत कळत होते, याची खात्री पटते.

झुंडीच्या कल्पनाशक्तीवर कशा प्रकारे छाप पाडण्यात येते, हे सांगण्यापूर्वी प्रथम एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. झुंडींबरोबर वाद घालून, झुंडींच्या बुद्धीला आवाहन करून वा सत्य काय ते पटवून देऊन झुंडींच्या मनावर छाप पाडता येत नाही. जे-जे लोकविलक्षण त्याचे जिवंत चित्र झुंडीच्या मनच्श्रक्षूंसमोर साक्षात उभे करण्यात तुम्हाला यश आले, तरच झुंड तुमच्या बाजूला वळते. कारण हे वर्णन ऐकता-ऐकता झुंडीच्या चित्तवृत्ती उत्तेजित बनू लागतात आणि झुंड मनाने त्या चित्राबरोबर हळूहळू वाहत जाते. झुंडीच्या मनावर प्रभाव पाडण्यासाठी जे चित्र झुंडीसमोर उभे करायचे ते मोजके, काटेकोर आणि मनश्र्चक्षूंपुढे आणण्याच्या दृष्टीने साधे, सरळ असावे लागते. या प्रकारच्या चित्राचे उदाहरण द्यायचे तर – राष्ट्राने संपादन केलेला महान विजय, घडून आलेला एखादा अलौकिक चमत्कार वा एखादा भयंकर आणि हृदयाचा थरकाप करणारा गुन्हा हे विषय घेता येतील. या घटना मुळातच वेधक असल्याने झुंडीचे मन त्या घटनांच्या वर्णनामध्ये सहज पकडले जाते. दुसरी गोष्ट – झुंडीसमोर जे मांडायचे, ते अंतिम स्वरुपाचे असावे लागते. घटनेच्या पूर्वपीठिकेत झुंडींना रस नसतो. शेकडो छोटे-छोटे गुन्हे वा अपघातांचे वर्णन लोकमानसावर काहीच परिणाम करीत नाही; परंतु एकच मोठा गुन्हा वा मोठा अपघात लोकमानस खालपासून वरपर्यंत ढवळून काढू शकतो. मग भले, त्या छोट्या छोट्या गुन्ह्यांतून आणि अपघातांतून नष्ट झालेल्यांची संख्या व झालेल्या नुकसानीचा आकडा यांचे प्रमाण किती का मोठे असेना!

खुद्द वास्तव घटना जनमानसावर फारसा परिणाम करीत नाही; तर ज्या प्रकारे त्या घटना घडतात किंवा त्यांची माहिती जनतेसमोर येते, त्या विशिष्ट पद्धतीचा परिणाम त्यांच्यावर होतो. थोडक्यात असे म्हणता येईल की, विशेष फाफटपसारा न लावता चित्तवेधक पद्धतीने वर्णन केलेल्या घटना जनसमुदायाचे लक्ष वेधून घेतात. वर्णन केलेले चित्र मोजके असल्याने प्रभावी ठरते. लोकमानस संपूर्णपणे व्यापून टाकणे वा ते प्रक्षुब्ध बनविणे त्यामुळे शक्य होते. झुंडीच्या मनावर छाप पाडण्याची कला म्हणजे शेवटी झुंडीच्या मनावर सत्ता गाजविण्याची कला होय.

झुंडीची धार्मिक बैठक

आम्ही वर हे दाखवून दिले की, झुंडी तात्त्विक युक्तिवाद करू इच्छित नाहीत. त्यांच्यापुढे मांडण्यात आलेला विचार त्या एक तर पूर्णपणे स्वीकारतात अथवा पूर्णपणे नाकारतात. वाद घालायला झुंडी तयार नसतात; त्यांना विरोध खपत नाही. झुंडी सूचना ग्रहण करतात, तेव्हा त्या सूचनांच्या त्या गुलाम बनतात आणि त्या सूचना कृतीत उतरवण्याच्या मार्गाला लागतात. आपण तेसुद्धा पाहिले की – झुंडींना जर कोणी व्यवस्थितपणे हाताळले, तर झुंडी आदर्शासाठी प्राणार्पण करायला तयार होतात. तसेच झुंडींना मिळमिळीत वर्तन पसंत पडत नाही. झुंडी जी भूमिका घेतात, ती नेहमी टोकाची असते आणि झुंडींचे मनोविकार अत्यंत तीव्र असतात. त्यामुळे झुंडी क्षणात भक्तिभावाने वागतात, तर दुसऱ्या क्षणी शत्रुत्वभावाने. वरील विवेचनावरून झुंडींची विचारप्रक्रिया कशी चालते, याची बरीचशी कल्पना वाचकांना येऊ शकेल.

झुंडी काही विशिष्ट प्रकारचीच मते धारण करतात आणि त्याच्या समजुतीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असतात. या समजुतींचा आणि मतांचा बारकाईने अभ्यास केला, तर या समजुतींची व मतांची काही ठळक वैशिष्ट्ये दिसून येतात. मग या समजुती कोठल्याही कालखंडातील – उदाहरणार्थ, धार्मिक वा राजकीय विचारांच्या वर्चस्वाच्या वगैरे कालखंडातील- असोत; तिथे ही वैशिष्ट्ये दिसल्यावाचून राहात नाहीत. या वैशिष्ट्यांचे थोडक्यात वर्णन करायचे झाल्यास, या समजुतींची जात व ठेवण धार्मिक समजुतींसारखी असते, असे करता येईल. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर असे म्हणता येईल की, कालखंड धार्मिक मतप्रणालींच्या वर्चस्वाचा असो वा राजकीय मतप्रणालीच्या वर्चस्वाचा असो; या मतप्रणाली नेहमी धार्मिक मनोविकाराने ग्रासलेल्या असतात.

झुंडींच्या समजुतींचे आणि विचारांचे स्वरूप धार्मिक असते, असे आपण म्हटले. पण धार्मिक म्हणजे कसे, हे सांगितल्याशिवाय उत्तर पूर्ण होणार नाही. धार्मिक माणसे किंवा धर्मभावनेने पछाडलेली माणसे कशी वागतात, हे आपण पाहिले आहे. उदाहरणार्थ – धार्मिक माणूस कसल्या ना कसल्या उच्च शक्तीचे अस्तित्व गृहीत धरतो. त्या शक्तीची प्रार्थना करतो, उपासना करतो. त्या शक्तीला शरण जातो, तिची भीती बाळगतो. ही शक्ती आपणाला जगात कसे वागावे, कसे न वागावे, कोणाशी मित्रत्व करावे, कोणाशी शत्रुत्व करावे, याचे आदेश प्रत्यक्ष देते अथवा अन्य कुणाच्या मध्यस्थाने देते, असे मानतो आणि तसले आदेश अंधपणाने पाळण्याचा प्रयत्न करतो. त्या शक्तीकडून प्राप्त झालेल्या प्रमाणवचनांची कधीही शंका येत नाही, त्या प्रमाणवचनांचा प्रसार करण्यासाठी झटतो. जे कोणी ती प्रमाणवचने वा शिकवणूक मान्य करीत नाहीत, त्यांना शत्रू समजून त्यांचा काटा काढू पाहतो. मुख्य म्हणजे मनुष्यजातीची विभागणी शत्रुपक्ष आणि मित्रपक्ष अशा दोन गटांत करतो. जे कुणी त्याचा धर्मग्रंथ आणि तो ज्या देवाला भजतो, त्या नावाचा देव यांना पूज्य समजतात ते मित्रपक्षातले; जे पूज्य मानीत नाहीत ते शत्रुपक्षातले. शत्रुपक्ष भूतलावरून नाहीसा झाल्यावाचून मित्रपक्षाचा आणि त्यांच्या देवाचा व धर्माचा विजय होत नाही, असेसुद्धा हे धार्मिक लोक मानतात.

प्रत्यक्ष डोळ्यांना जो दिसत नाही तो परमेश्वर. एखाद्या देवतेच्या नावाने तयार करण्यात आलेली लाकडी वा दगडी मूर्ती, एखादा वीरश्रेष्ठ, राजकीय तत्वप्रणाली व सिद्धांतप्रणाली यांच्याबद्दल जी भावना अनेक माणसे धारण करतात, त्या भावनेमध्ये वर उल्लेखिलेले घटक हमखास आढळतात. म्हणून या भावनेला धर्मभावना असे नाव देण्यात काहीच वावगे नाही. कारण ही भावना आणि प्रत्यक्ष देव-देवतांच्या बाबतीत लोक जी व्यक्त करतात ती भावना, या दोन भावनांमध्ये काहीही फरक दिसून येत नाही. धर्मांधता हेच या भावनेचे सार आहे. अलौकिकता आणि अद्भुतता या दोन्हींचे मिश्रण तिथे पाहायला सापडते. राजकीय तत्त्वप्रणाली आणि विजयी राष्ट्रीय वीर दोन्हींच्या नावाने झुंडी सारख्याच प्रमाणात बेहोष होत असतात, कारण दोघांच्याही ठिकाणी झुंडींना अलौकिक सामर्थ्याचा साक्षात्कार होत असतो.

एखादी व्यक्ती देव-देवतांची पूजा-अर्चा करते म्हणून ती धार्मिक होय, एवढ्यापुरता धार्मिक शब्दाचा माझा अर्थ मर्यादित नाही; तर धार्मिक या शब्दातून मला बौद्धिक आणि भावनिक शरणागती सूचित करायची आहे. एखाद्या पक्षाच्या तत्त्वप्रणालीच्या, ध्येयाच्या वा व्यक्तीच्या पायी माणसे आपल्या निष्ठा वाहतात. आपली इच्छाशक्ती अर्पण करतात. तन-मन-धन वाहतात. तो विशिष्ट पक्ष, तत्त्वप्रणाली, ध्येय वा व्यक्ती त्यांच्या भक्तीचा व चिंतेचा विषय बनतो. त्यांच्या जीवनाचे ते एकमेव मार्गदर्शक सूत्र बनते. हा जो प्रकार आहे, त्याला अंधभक्ती हेच एकमेव नाव आहे. ही अंधभक्ती तत्त्वाच्या नावाने माणसाला त्याच्यासारख्या इतर माणसांचे बिनदिक्कत मुडदे पाडायला प्रवृत्त करते. आम्ही धार्मिक हा शब्द या विशिष्ट अर्थाने वापरीत आहोत.

दुसऱ्याच्या मताबद्दल पूर्ण असहिष्णुता आणि धार्मिक पिसाटपणा या दोन प्रवृत्ती म्हणजे धार्मिक भावनेच्या सहचरी होत, कारण या धर्मश्रद्धा किंवा या सिद्धान्तप्रणाली ‘आम्हीच फक्त खरे, इतर सगळे खोटे’ या विचाराने चालतात. इहलोकातील आणि परलोकातीलही सगळ्या सुखाच्या किल्ल्या फक्त आमच्याच कनवटीस आहेत, असे अशा लोकांना ठामपणे वाटते. एखाद्या मताच्या नावाने माणसे जेव्हा वेडी होतात, तेव्हा ती वर उल्लेखिलेली लक्षणे प्रकट करतात.

आंधळी भक्ती, कमालीची असहिष्णुता आणि हिंसक प्रचार हे सर्व या धार्मिक भावनेने बाह्य परिणाम होत. झुंडींचे विचार आणि समजुती यांचे स्वरूप नेहमी वर म्हटले तसे असते. म्हणूनच झुंडीच्या समजुती धार्मिक स्वरूपाच्या असतात, असे आपण म्हणू शकतो. जर एखाद्याला वीरपुरुष म्हणून झुंडींनी मान्यता दिही, तर देवाला भजतात तसे झुंडी त्याला भजतात. नेपोलियन हा पंधरा वर्षांइतका दीर्घ काळ झुंडींचा देव होता. अन्य कोणत्याही देवतेला एका वेळी इतके भक्त भेटले नसतील आणि अन्य कोणतीही देवता इतक्या मोठ्या संख्येने लोकांना हसवत मृत्युमुखी धाडू शकली नसेल.

जगात आज अनेक धर्म अस्तित्वात आहेत आणि अनेक राजकीय सिद्धान्तप्रणाही यशस्वी रीतीने राज्य करीत आहेत. या धर्मांचे संस्थापक आणि सिद्धान्तप्रणालींचे प्रवर्तक आपापले धर्म व सिद्धान्तप्रणाली प्रस्थापित करण्यात यशस्वी झाले होते, याचे कारण झुंडींच्या हृद्यात त्यांनी प्रवेश मिळवला होता. झुंडींचा उत्साह ते आपल्या बाजूला वळवू शकले होते. झुंडींची अंधभक्तीही ते जागृत करण्यात यशस्वी झाले होते. उत्साह आणि आवेश जागा झाला की, धर्माभिमानी आणि पक्षाभिमानी मंडळींना वाटू लागते की – आपण जो झेंडा खांद्यावर घेतला आहे, त्याचीच भक्ती करण्यात जीवनाचे सार्थक आहे. मनोमन स्वीकारलेल्या आदर्शाला ही मंडळी पूर्ण शरण जातात. हा अनुभव सार्वत्रिक आणि सार्वकालिक आहे. फुस्तेल द कुलाज हा इतिहासकार म्हणतो की – रोमन साम्राज्याचे आयुष्य हे खुद्द त्या साम्राज्याच्या सामर्थ्यावर अवलंबून नव्हते; तर त्या साम्राज्याविषयी एक प्रकारची जी अंधभक्ती नागरिकांच्या मनात वसत होती, त्या अंधभक्तीवरच अधिक प्रमाणात अवलंबून होते.

रोमन काळात महापुरुषांचे पुतळे मंदिरात बसवून त्यांची पूजा-अर्चा करण्यात येत असे. आज तो प्रकार होत नाही; परंतु आजदेखील महापुरुषांचे पुतळे उभे करण्यात येतात, त्या पुतळ्यांची छायाचित्रे घेतली जातात, तसबिरी बनविल्या जातात आणि महापुरुषांचे भक्त आपल्या घरात त्या तसबिरी मिरवतात. आजकालच्या थोर पुरुषांच्या नावाने साजरा होणारा भक्तिपंथ आणि प्राचीन काळातील तसलेच भक्तिपंथ या दोहोंत तादृश काहीच फरक नाही. म्हणूनच इतिहासाचे तत्त्वज्ञान जाणून घ्यायचे असेल, तर प्रथम झुंडींचे मानसशास्त्र अवगत करून घ्यावे लागते. झुंडीला इतर कोणल्याही गोष्टी मिळाल्या नाहीत, तरी झुंडीचे बिघडत नाही; परंतु पुढाऱ्यावाचून झुंडीचा जीव कासावीस होतो. पुढारी म्हणजे झुंडीचा जणू परमेश्वरच!

अंधश्रद्धांची सद्दी भूतकाळाबरोबरच संपली, असे कोणी समजू नये. भावना व विचार यातील हा झगडा आहे आणि तो चिरंतन आहे. या झगड्यात भावनांचा संपूर्ण पराभव होईल, अशीही आशा कोणी बाळगू नये. अर्थात देव-देवतांचे मुखवटे आणि नावे बदलत असतात, या सनातन नियमाप्रमाणे पूर्वी ज्या देव-देवतांच्या आणि धर्म-पंथांच्या नावाने झुंडीच्या मनावर गुलामगिरीच्या शृंखला अडकवल्या जात असत, त्या देव-देवतांची व पंथांची नावे आता झुंडी घेत नाहीत. परंतु, बौद्धिक गुलामगिरीचे जोखड गळ्यात अडकवून घेतल्यावाचून झुंडींना चैन पडत नाही. गेल्या दीड-दोनशे वर्षांमध्ये झुंडींची जितकी नवनवी पूजास्थाने निर्माण झाली तितकी त्याआधीच्या शेकडो वर्षांच्या काळात कधी झाली नव्हती. नव्या देव-देवतांच्या नावे जितके स्तंभ आणि पुतळे उभारले जात तितके ते पूर्वी कधीही उभारले गेलेले नाहीत. धर्म नावाची वस्तू नसेल, तर सामान्य जनतेचा जीव कासावीस होतो. या ना त्या स्वरूपात जनतेला धर्म आवश्यक असतो, असे म्हणण्यात नावीन्य नसले, तरी ते सत्य आहे.

कोठलाही राजकीय, सामाजिक आदी पंथ जनतेच्या मनात घर करून बसावा असे वाटत असेल, तर त्या पंथाला धार्मिक रंग देणे आवश्यक असते. धार्मिक म्हणजे वादातीत. एखाद्या पंथाचा रंग जेव्हा धार्मिक असतो, तेव्हा त्या पंथाच्या सत्यतेची शंका घेण्याची कुणाला हिम्मतच होत नाही. निरीश्वरवादाचे तत्त्वज्ञान समाजाच्या गळी उतरवले गेले, तर थोड्याच अवधीत निरीश्वरवादाचे रुपांतर नव्या असहिष्णू धर्मामध्ये घडून येऊन निरीश्वरवादाच्या नावाने लाखोंची कत्तल घडेल; निरीश्वरवाद हाच एक नवा धर्म, नवे पूजास्थान होईल.

युरोपातील धर्मसुधारणेची चळवळ – रिफॉर्मेशन, सेंट बार्थोलोम्यूचे हत्याकांड, फ्रेंचांची धर्मयुद्धे, इन्क्विझिशन, दहशतवादाचे फ्रेंच राज्य या घटना जरी वेगवेगळ्या दिसल्या, भिन्न वाटल्या तरी त्यांची जात समान आहे. कारण या घटनांमागे झुंडी होत्या आणि झुंडींच्या पाठिंब्यामुळे व सामर्थ्यामुळेच त्या घडून आल्या होत्या. झुंडच नेहमी नव्या धर्माच्या स्थापनेसाठी एका हातात समशेर आणि दुसऱ्या हातात पेटती मशाल घेऊन बाहेर पडत असते. अशी प्रचंड कृत्ये फक्त झुंडीच करू शकतात आणि त्या कृत्यांचा आधार समाजाच्या मनात खोलवर दडून बसलेल्या प्रेरणाच फक्त असू शकतात. सत्ताधारी मंडळी या घटनांचा फार तर वेग वाढवू शकतात, यापलीकडे काहीही अधिक त्यांच्या हाती असत नाही.

झुंडीचे मानसशास्त्र
साधना प्रकाशन, पुणे
विश्वास पाटील
किंमत- ३५० रुपये
संपर्क-०२० २४४५९६३५

COMMENTS