अक्षीचा किनारा, लाटा, सकाळची वेळ आणि पक्षी हे अफलातून जमून आलेलं मिश्रण आहे. अलिबागमध्ये येणारा हा पक्ष्यांनी बहरलेला किनारा माझ्यासारख्या पक्षीवेड्या लोकांसाठी पुन्हा पुन्हा जाण्यासारखी जागा आहे.
जानेवारी महिन्यातली काहीशा थंडीनं सुरू झालेली सकाळ, अक्षीचा समुद्रकिनारा स्थलांतरित पक्ष्यांच्या कलकलाटाने भरून गेलेला असतो, कोवळं ऊन नुकतंच लाटांशी खेळायला लागलेले असत. असं सगळं काही आलबेल असताना हळूहळू जोरदार लाटा किनाऱ्यावर आदळतात आणि इतकावेळ कलकल करणारे ‘व्हिस्कर्ड टर्न्स’, ‘लिटील टर्न्स’, ‘गल्स’चे थवे शाळेतल्या बाई आल्यावर इतकावेळ धिंगाणा घालणारी लहान लहान पोरं धांदल उडून पळावीत तसे भर्रर्रदिशी उडतात. निळंशार असलेलं आकाश काही क्षणांसाठी काळ्या पांढऱ्या ठिपक्यांची रांगोळी बनतं, थोड्याच अंतरावर सगळे थवे पुन्हा उतरतात आणि पुन्हा त्यांची खाण्यासाठी झुंबड उडते. अक्षीचा किनारा, लाटा, सकाळची वेळ आणि पक्षी हे अफलातून जमून आलेलं मिश्रण आहे. अलिबागमध्ये येणारा हा पक्ष्यांनी बहरलेला किनारा माझ्यासारख्या पक्षीवेड्या लोकांसाठी पुन्हा पुन्हा जाण्यासारखी जागा आहे.
तर इथे मी दोनच दिवसांसाठी आले होते आणि मग हे सगळे पक्षी, सुंदर दृश्य मनापेक्षा जास्त कॅमेरात भरून घ्यायचा माझा आटापिटा चालला होता.
कॅमेरा माझ्यासाठी तसा काही नवीन नाही. इतर वाईल्डलाईफ फोटोग्राफर्स प्रमाणे पक्ष्यांचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढणं मलाही आवडत. विशेषतः जर तो मी आजवर कधीही न पाहिलेला पक्षी असेल तर फोटो जास्तच महत्त्वाचा असतो. माझ्याही पक्षीनिरीक्षणाची सुरुवात दुर्बिणीने किंवा नुसत्या डोळ्यांनी तासनतास पक्षी पाहणे आणि त्यांची ओळखणं करणे यानेच झाली होती पण जसजसे आपण कॅमेऱ्यात पक्षी कैद करण्यावर भर देत जातो तसतसा पक्षीनिरीक्षण हा साधा सोपा आनंद देणारा छंद दुरावत जातो. नवीन पक्षी दिसण्याचा जो अविस्मरणीय आनंद असतो तो कुठेतरी मागे पडून हरवत जातो. मग फक्त नवीन फोटो जमा करण्याची चढाओढ उरते.
पण या समुद्रकिनाऱ्याने आणि इथल्या एका पक्ष्याच्या जोडीने, कॅमेरा बाजूला ठेऊन हे विविधरंगी पक्षी, त्यांच्या हालचाली, त्यांच्या उडण्याच्या पद्धती नुसत्या डोळ्यांनी न्याहाळण्यात सुद्धा निखळ आनंद आहे याची मला पुन्हा एकदा आठवण करून दिली.
तर झालं असं की, मी इथे येताना एका खास पक्ष्याचा फोटो हवाच हा उद्देश मनात ठेऊन आले होते. ‘ऑयस्टरकॅचर’ किंवा मराठीत ‘शंखिनी’, ‘घोंगील फोड्या’ अशी त्याची नावं. आकाराने साधारण तित्तिरापेक्षा मोठा असा हा पक्षी ह्याचा फोटो मिळाला तर आणि तरच मी स्वतःला भाग्यवान मानणार होते. कारण हा पक्षी मी आजवर कधीच पहिला नव्हता. त्यामुळे आम्हा पक्षीनिरीक्षकांच्या भाषेत ज्याला लाइफर म्हणतात तसा हा पक्षी असणार होता.
पण ‘ऑयस्टरकॅचर’नं मात्र वेगळंच काहीतरी ठरवलं होत. इथं पोचल्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ‘टेरेक सॅण्डपायपर’, ‘ग्रेट नॉट’, विविध प्रकारचे ‘गल’ यांचे मनसोक्त फोटो काढून झाल्यावरही आम्हाला या पट्ठ्यानं काही दर्शन दिलंच नव्हतं, पण मी आशावादी माणसाप्रमाणे उद्या दिसेलच की! या विश्वासावर होते.
अन अचानक काही तरी झालं, कॅमेऱ्याचं काहीतरी बिनसलं. लेन्सच बंद पडली असेल, कुठे वाळूच गेली असेल एक ना दोन, हरतऱ्हेचे सल्ले माझ्या पक्षीनिरीक्षक सोबत्यांनी दिले, पण मला वाईट वाटायचं काय राहतंय. मी शेवटी फुरंगटून बसलेच. आणि मग सुरू झाली खरी जादू , मी इतकावेळ दुर्लक्ष केलेली प्रत्येक गोष्ट आता दिसायला लागली.
संध्याकाळ होत आली होती अन ओहोटीची वेळ असल्यानं समुद्र जरासा आत सरकला होता, ‘टर्न्स’चा थवा उडताना त्यांचा पंख फडफडण्याचा आवाज आणि थोडी दुरून येणारी समुद्राची गाज एकत्र होऊन वेगळीच धून निर्माण करत होते. आता लाट आली कि भन्नाट पळणारे छोटे ‘सॅण्ड प्लोव्हर’ पाहताना चेहर्यावर हसू फुटायला लागलं होतं. काळपट-राखाडी पाणी मिश्रित वाळूवर ‘लिटील स्टिंट’ अन इवल्याशा ‘केंटीश प्लोव्हर्स’ची पांढरी पोटं चमकत होती किंचित अंधारात जसे काही पांढरे दिवे लागलेत असा भास होत होता.
जणू काही इतकावेळ हे सगळं माझ्या कॅमेऱ्याआड लपून बसलं होत. मला आधी का नाही दिसलं हे सगळं?
मग दुसऱ्या दिवशीची सकाळ काही औरच होती. मी माझी दुर्बीण अन फक्त माझे डोळे घेऊन किनाऱ्यावर पोचले. सूर्य अजूनही कोवळा लालसर होता. वाळू आणि पाणी चंदेरी रंगात चमकत होत. किनाऱ्याजवळच्या सुरुच्या राईत दिसलेल्या किरमिजी रंगाची पाठ, अशक्य जांभळ्या रंगाचा गळा असणाऱ्या “क्रिम्सन बॅक्ड सनबर्ड” ने दिवसाची रंगभरी सुरुवात करून दिली होती. लगतच्याच एका झाडावर पोपटी हिरव्या रंगाचे अन निळ्याशार शेपट्या असलेले “वेडे राघू” (ब्लू टेल्ड बी ईंटर) बसले होते.
आता कसली घाई नव्हती अन कुठलाच पक्षी पटकन पाहून तो कॅमेऱ्यात साठवण्याचा अट्टाहास नव्हता. आता मला दिसत होते ते या पक्ष्यांच्या पंखावर उधळलेले लाखो रंग, आणि किनारा तरी नुसता काळा-पांढरा कुठे होता. ‘टेरेक सँडपायपर’चे नारंगी पाय, टरुडी टर्नस्टोन’चा मातकट- विटकरी काळा रंग, काही ‘सी-गल’च्या पिवळ्या बाकदार चोची, पंखावर राखी-काळ्या-पांढऱ्या रंगांची नक्षी कोरलेल्या छोट्या ‘स्टिंट’चा उन्हात उठून दिसणारा थवा, कुठल्या जगात होते मी, खरंतर या रंगांमुळेच तर मी पक्षीनिरीक्षणाच्या प्रेमात पडले होते. या पक्ष्यांच्या नाजूक, नाचऱ्या, मोहक हालचाली, त्यांच्या विचित्र आणि विशेष खाण्याच्या सवयी, निसर्गात प्रत्येक पक्ष्याचं स्वतःच असणारं स्थान आणि एवढ्या नाजूक पंखाच्या बळावर त्यांचे लांबलांबचे प्रवास या बद्दलच कुतूहलच तर मला या पक्ष्यांकडे ,निसर्गाकडे खेचून आणत. हे विसरलेच होते मी!
या विचारांच्या जत्रेतनं मला माझ्या सोबत्यांच्या हाकांनी बाहेर काढलं. दुर्बिणीतून पाहिल्यावर समोर किनाऱ्याजवळ चक्क एक ‘ऑयस्टरकॅचर’ची जोडी नुकतीच उतरली होती. कसला सुंदर शाईसारखा घट्ट काळा रंग होता त्यांचा! पांढरी पोटं दुरून चमकत होती, तांबडे पाय, नारंगी लालसर चोच आणि पक्ष्यांच्या गर्दीत उठून दिसेल एवढा आकार. लांबचा प्रवास करून आल्यावर त्यांची खाण्याची लगबग चालली होती. य पक्ष्याला त्याच नाव त्याच्या खाण्याच्या सवयीवरून मिळालंय. शिंपले किंवा कालवं फोडून खाण्यासाठी त्याची चोच पुढच्या बाजूला काहीशी बोथट असते.
दोनच पक्षी पण केवढी धडपड केली होती मी ते पाहायला आणि आता समोर आलेत तेव्हा माझ्या मनात फक्त समाधान होत. त्यांना पहायला माझे दोन डोळे अन माझी दुर्बीणच पुरेशी होती.
तेव्हा पुन्हा नव्याने जे रंग गवसले ना ते अजूनही कायम आहेत. म्हणूनच अजूनही स्वतःला पक्षी “निरीक्षक” म्हणवून घेण्यात अजूनही अभिमानच वाटतो मला.
समुद्राचे रंग तर झाले पण माळरानच किंवा ज्याला इंग्रजीमध्ये ग्रासलँड म्हणतात त्याच गाणं ऐकलंय का कधी तुम्ही? मी म्हणेल मी ऐकलंय आणि इतरवेळी ज्या माळरानाला रिकामी पडलेली जागा किंवा नुसतंच गवत माजलेली जागा असं म्हणून हिणवलं जातं. त्या जागेला पक्ष्यांच्या दृष्टीने त्यांची राहण्याची जागा, कित्येक प्राण्यांचा अधिवास समजलं जातं हे मला एका पक्ष्याच्या भूल पाडणाऱ्या, मंतरलेल्या आवाजानं शिकवलं.
“पावसाळी दुर्लाव”, ‘वर्षांलावा” किंवा “रेन क्वेल” असं या पक्ष्याचं नांव. पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलै महिन्यात या पक्ष्यांतला नर विट, विट, विट..विट असा विलक्षण आवाज काढतो. विलक्षण अशासाठी की पावसाने माळरानावर हिरवं गवत माजलेलं असत आणि हा कोंबडीच्या पिल्लापेक्षा आकारानं थोडाच मोठा असलेला पक्षी या गवतामध्ये बेमालूम लपून जातो. याच्या असण्याची खूण म्हणजे फक्त याचा आवाज, जो कुठून येतो आहे , जवळून की दुरून हे काही केल्या कळत नाही.
मी जेव्हा पहिल्यांदा हा आवाज ऐकला त्यानंतरचे अख्खे दोन पावसाळी दिवस हा पक्षी शोधण्यात घालवावे लागले होते मला. पण मग जेव्हा त्याला बघितलं तेव्हा काळ्या रंगाचा गळा अन सोनेरी, काळपट रेषाळ पिसांचा हा छोटासा चेंडू अगदी आवडून गेला. त्याच्या असण्यानं मला माळरानावरचे चंडोल, टिटव्या, लावा, वटवटे यांची गाणीसुद्धा नव्याने ऐकायची सवय लागली. आता उन्हाळा असो किंवा पावसाळा मला याच रिकाम्या पडलेल्या माळरानांवर गवताचं, खुरट्या झुडपांचं, इथल्या पक्ष्यांचं अन प्राण्यांचं अव्याहत, अविरत चालणार गाणं ऐकायला येत.
मला वाटतं निसर्गात असे कितीतरी अधिवास (हॅबिटॅट) असतात जिथे आपल्याला माहिती असते त्यापेक्षा जास्त रंग आणि गाणी असतात. गरज असते ती फक्त डोळे आणि कान उघडे ठेवण्याची.
हर्षदा कुलकर्णी, पक्षीनिरीक्षक आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफर आहेत. NatureNotes
ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन’ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास खालील फॉर्म भरा.
COMMENTS