राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार?

राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीचा गुंता पवार सोडवणार?

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड करण्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी हे खूप टाळाटाळ करत असल्याने आता या प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा

पीएमसीतून १० हजार रु. काढण्यास परवानगी
काबूलमध्ये अडकलेले १७० भारतीय मायदेशी परत
मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये यासाठी….

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची निवड करण्यात राज्यपाल भगतसिंह कोशियारी हे खूप टाळाटाळ करत असल्याने आता या प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच लक्ष घालण्याचा पवित्रा घेतला आहे.

महाविकास आघाडी सरकार तर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ जणांची नावाची यादी राज्यपाल कोशियारी यांना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात देण्यात आली आहे. नियमानुसार २१ दिवसात राज्यपालांना त्यावर निर्णय घेणे अपेक्षित असते. पण आज तब्बल दोन महिने उलटूनही कोशियारी याबाबत काहीही निर्णय घेत नाहीत.

या सर्व प्रकारावर शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हे असले वागणे राज्यपाल पदावरील व्यक्तींनी वागणे बरे नव्हे असे सांगत गेल्या ५० वर्षीच्या इतिहासात असे पहिल्या वेळी घडत असून असा राज्यपाल ही पहिला आहे असे परखड मत व्यक्त केले आहे. लोकशाही व्यवस्थेत आणि घटनेनुसार राज्यपाल कोशियारी यांनी घेतलेली ही भूमिका योग्य नाही असे परखड मतही पवार यांनी व्यक्त केले आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला भेटण्यास आणि इतरांना भेटण्यास राज्यपालांना वेळ आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना भेटण्यास राज्यपाल कोशियारी यांना वेळ नसल्याचा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्य आधारस्तंभ आहेत. ज्या ज्या वेळी सरकार खूप अडचणीत येते त्यावेळी पवार हे आपले ब्रह्मास्त्र काढून त्यातून मात करतात. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्य नियुक्ती वरून कोशियारी यांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने शरद पवार यांनी त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनाच फोन करून लॉक डॉउन काळातही विधान परिषद निवडणूक घेण्यास मान्यता मिळविली होती.

गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या १२ जणांच्या यादीवर अनेक जण उच्च न्यायालयात गेले आहेत. याबाबत न्यायालयाने केंद्राच्या अटर्नी जनरलला नोटीस बजावली आहे. आणि या प्रश्नी कायद्यातील अस्पष्टता तसेच राज्यपाल व राज्य मंत्रिमंडळाचे अधिकार याबाबत भूमिका स्पष्ट करावी असे आदेश दिले आहेत. ही नोटीस बजावूनही एक महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. केंद्राच्या अटर्नी जनरल नेमका काय अभिप्राय देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडीला कायम विरोध करायचाच या भूमिकेतून राज्यपाल कोशियारी यांनी आपल्या अधिकारात समांतर प्रशासन व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे नेहमीच ठाकरे आणि कोशियारी यांच्यात कडवटपणा निर्माण झाला आहे. ठाकरे यांनी दिलेली विधानपरिषदेवरील १२ जणांच्या यादीला संमती न देण्याचे कोशियारी यांचे धोरण हे याचे प्रतीक आहे.

आता या प्रश्नी शरद पवार यांनी थेट लक्ष घातले असल्याचे सूत्रांकडून समजते. जर राज्यपाल आपला हेकेखोरपणा सोडणार नसतील तर पवार हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालतील असेही समजते. मोदी आणि पवार यांचे असलेले चांगले संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे पवार यांनी हा प्रश्न हाती घेतला असल्यास तो वरिष्ठ पातळीवरून निश्चित सुटेल असा आशावाद व्यक्त होत आहे. १२ जणांच्या या यादीला ‘१२ मतीकर’ शेवटी न्याय देतील अशी मिश्किल प्रतिक्रिया एका वरिष्ठ मंत्र्याने या निमित्ताने बोलताना व्यक्त केली.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0