ऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात

ऐतिहासिक विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचची फेडररवर मात

आंतरराष्ट्रीय टेनिस रँकिंगमध्ये अव्वल स्थान असणाऱ्या सर्बियाच्या नोवोक जोकोविचने रविवारी विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या क्रमांकाच्या रॉजर फेडररच

टेनिसचा अनिभिषिक्त सम्राट
सेरेना विल्यम्सचे निवृत्तीचे संकेत
महान टेनिसपटू रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा

आंतरराष्ट्रीय टेनिस रँकिंगमध्ये अव्वल स्थान असणाऱ्या सर्बियाच्या नोवोक जोकोविचने रविवारी विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात दुसऱ्या क्रमांकाच्या रॉजर फेडररचा ७-६ (७-५), १-६, ७-६ (७-४), ४-६, १३-१२ (७-३) अशा सेटने पराभव केला. विम्बल्डनच्या इतिहासात अत्यंत उत्कंठावर्धक असा हा अंतिम सामना ४ तास ५७ मिनिटे चालला. हा एक विक्रमच आहे.

२००८मध्ये फेडरर व नदाल या दोहोंमधील विम्बल्डनचा अंतिम सामना ४ तास ४८ मिनिटे चालला होता. तो विक्रम रविवारी फेडरर-जोकोविच यांच्यातील सामन्याने मोडला. या सामन्यातील ५ वा व निर्णायक सेट १०० मिनिटांहून अधिक चालला. केवळ विम्बल्डनच नव्हे तर टेनिसच्या इतिहासात फेडरर असा एकमेव खेळाडू ठरला की ज्याच्या नावावर दोन अंतिम सामने प्रदीर्घ चालले.

३७ वर्षाच्या फेडररसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची होती. ही स्पर्धा त्याने जिंकली असती तर त्याच्या नावावर नववे विम्बल्डन विजेतेपद झाले असते शिवाय ग्रँडस्लॅमची संख्या २१ झाली असती. पण अखेरच्या सेटमधील त्याच्या काही चुका त्याला विजेतेपदापासून दूर घेऊन गेल्या.

जोकोविच व फेडरर हे दोन दिग्गज टेनिसपटू आमनेसामने असल्याने हा सामना चुरशीचा असणार ही शक्यता जगभरातल्या कोट्यवधी टेनिसप्रेमींची होती पण हा सामना इतका प्रदीर्घ काळ आणि तोही छातीचे ठोके चुकवणारा असेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पहिले चार सेट झाल्यानंतर या सामन्यातील रंगत वाढत गेली. नंतर नंतर सेंटर कोर्टवरचे वातावरणही गंभीर होत गेले. अखेरच्या दोन सेटमध्ये तर या दोनही खेळाडूंनी अत्यंत दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केल्याने एका ऐतिहासिक टेनिस सामन्याची इतिहासात नोंद झाली.

अखेरच्या सेटमध्ये तर फेडरर व जोकोविचमध्ये एकेक गुणांसाठीचा संघर्षतर पाहण्यासारखा होता. हा सामना कोण जिंकणार याच्या शक्यताही नंतर गळून पडल्या. दोघांच्याही बाजूला पारडे जड होते. हा सामना घडाळ्याच्या लंबकासारखा चालला होता. फेडररने दोन चॅम्पियनशीप गुण मिळवले असतानाही जोकोविचचा आत्मविश्वास ढासळला नव्हता. त्याने अखेरपर्यंत चिकाटी ठेवली होती. पुढे चिकाटी व अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत त्याने फेडररकडून अक्षरश: सामना खेचून आणला आणि अखेर विजेतेपद मिळवले.

जोकोविचने हे पाचवे विम्बल्डन विजेतेपद, तर १६ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. फेडररच्या नावावर २० ग्रँड स्लॅम, तर नदालच्या खात्यात १८ ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

छायाचित्रे – सौजन्य ‘द हिंदू’.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 3